माणूस आणि निसर्गाचे सहजीवन

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक श्री गणेश मूर्तीचे पूजन होते. श्री गणेशाची मूर्ती उंदीर असल्याशिवाय पूर्ण झाली असे मानले जात नाही. मानव आणि अन्य प्राण्यांच्या सहजीवनाचे हे एक भारतीय उदाहरण आहे असे समजता येईल. अशाचे प्रकारे श्री शंकराच्या पिंडीसोबत नंदी, श्री शंकराच्या मूर्तीसोबत साप, श्री विष्णुच्या मूर्तीबरोबर गरुड, श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबरोबर गाय आणि कुत्रे आवश्यक मानले गेले आहेत. या प्राण्यांबरोबर देवी लक्ष्मीचे वाहन घुबड, देवी सरस्वतीचे वाहन हंस हीदेखील उदाहरणे आहेत. याचबरोबर पूजेसाठी वेगवेगळी पानेफुलेदेखील आवश्यक मानली गेली आहेत. ही प्रामुख्याने वैदिक हिंदू संस्कृतीमधील उदाहरणे आहेत. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) पृथ्वीच्या पाठीवर मानवीजीवन हजारो वर्षांपासून सुरू आहे. पृथ्वीवर जशा अन्य प्राण्यांच्या जाती होत्या तशाच मानवप्राण्यांच्याही जाती होत्या. माणसाच्या जातींपैकी होमो सेपिअन्स या जातीने अन्य जातींना संपवले. यासाठी शक्त...