समस्यापूर्ती
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या आजोळी मानाजीनगर(पणदरे जवळ) तालुका बारामती इथे जात असू. त्याकाळात दूरचित्रवाहिन्या, मोबाइल यासारखी साधने नव्हतीच. अशावेळी वेळ घालवण्यासाठी मैदानी खेळांबरोबर पत्ते खेळणे, गप्पा मारणे हे पर्याय होते. अशा वेळी आम्ही हुमान (कोडं) घालणं करत असू. सहज त्याची आठवण झाली. त्यातील काही कोडी अजून आठवतात. प्रश्न:- इथंच आहे पण दिसत नाही. उत्तर:- वारा प्रश्न:- वारा त्याला पाच दारा (दारं) उत्तर:- पावा (पाच छिद्रे असलेला) प्रश्न:- हुमान हुमनं नाकात टुमनं उत्तर:- नथ प्रश्न:- एवढंसं कार्ट घर पुरं राखतं उत्तर:- कुलूप प्रश्न:- आधी लाल लाल मग गोल गोल मग थैय्याक थैय्या उत्तर:- लाल मिरच्या गोल उखळात कुटणे प्रश्न:- सूपभर लाह्या त्यात चांदीचा रूपया उत्तर:- आभाळात असणारा चांदण्यातील चंद्र अशा समस्यापूर्तीची परंपरा खूप जुनी आहे. उदाहरणार्थ पूर्वी राजदरबारामध्ये कवींना चवथा चरण देऊन त्यावरून श्लोक रचणे अशी एक प्रकारे परीक्षा होत असे. संस्कृत भाषेतील समस्यापूर्तीचे हे एक उदाहरण भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः । कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥ अर्थ जेवण...