पुस्तक परिचय 'मी कसा झालो?'
अंगभूत गुण आणि कर्तृत्व, योगायोग, मिळालेल्या संधी आणि त्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी केलेली धडपड अशा अनेक गुणांनी ज्यांचे आयुष्य विविधरंगी झाले अशी व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या गळ्यात सत्काराचे हार पडले तसे तुरुंगात जाण्याची वेळदेखील आली. स्तुतीसुमनांचा वर्षाव आणि शिव्याशापांचा भडिमार अशा दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दंतकथा वाटाव्यात अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. या आयुष्याची वाटचाल कशी झाली याचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे 'मी कसा झालो?'. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) १३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ असे जवळपास सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्या आयुष्यतील १९५३ पर्यंत झालेली वाटचाल सांगणारे हे पुस्तक आहे. तोपर्यंत आचार्य अत्रे यांनी काव्य, विडंबन, शिक्षण, नाट्य, राजकारण , चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. अशा बहुपेडी आयुष्याची ओळख करुन देणारे अवघड काम या पुस्तकात सहजपणे पूर्ण झाले आहे. माणस...