छ. शिवराय : चिरकालासाठी प्रेरणास्रोत
"शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला | दहा दिशांच्या हृदयामधुनि अरुणोदय झाला || " ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ! हीच आहे ती पवित्र मंगल प्रेरणादायक तिथी! संवत्सर होते आनंद नाम संवत्सर आणि शालिवाहन शके १५९६. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार दिनांक होता ६ जून १६७४. ( यावर्षी हा दिनांक २० जून २०२४ हा आहे.) याच दिवशी शिवराय सिंहासनाधीश्वर झाले. वेदमंत्रघोषात त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला. या पवित्र भारतभूमीचे भाग्य पुनरपि उदयाला यावे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जो अविरत संघर्ष चालला होता त्याचा जणू हा सुवर्णबिंदूच! ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार) छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व, चरित्र, कर्तृत्व, विचार हे चिरकाल प्रेरणा देणारे आहे. शिवरायांनी जे ध्येय ठरवले होते ते केवळ महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशापुरते सीमित नव्हते तर त्यामागे अखिल भारतीय दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की ध्येय नेहमी उत्तुंग ठेवा. परिश्रमांची पराकाष्ठा करा. कल्पकता नाविन्याची कास धरा. हे सर्व गुण सर्व कालात अनुकरणीय आहेत. मध्ययुगातील धर...