मनाचं आजारपण स्वीकारूया..
"सर, मी कुठे आहे ते मला समजत नाही." पार्थ (नाव बदललं आहे.) म्हणाला. "जवळपास कोणत्या पाट्या दिसत आहेत ते मला सांग. असं कर, तू रिक्षा करून होस्टेलला ये." मी म्हणालो. मनाचं आजारपण असलं की माणूस शरीराने धडधाकट असूनदेखील व्यवस्थित राहू शकत नाही. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या आजारपणाचे अजून दोन अनुभव मला आले. पार्थ हा पुण्याजवळच्या एका गावातील हुशार मुलगा. त्याचे काका डॉक्टर होते. त्यांच्याकडे बघून यानंदेखील डॉक्टरच व्हायचं असं घरच्यांनी ठरवून टाकलं आणि आमच्या महाविद्यालयात त्याला अकरावीला प्रवेश घेऊन दिला. परंतु इथल्या अभ्यासक्रमाशी, परिस्थितीशी जुळवून घेताना त्याला खूप अडचणी येऊ लागल्या. पहिले सहा महिने व्यवस्थित गेले. परंतु दुसऱ्या सत्रात अचानक एके दिवशी घरच्यांना लक्षात आलं की पार्थ फोन उचलत नाही आणि त्याच्या जोडीदाराला तो कुठे गेला आहे हे पार्थने सांगितलं नाही. पालकांनी मला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. मी पार्थला फोन केला. चांगली गोष्ट झाली म्हणजे त्यानं माझा फोन घेतला. मी त्याला सांगितलं की, " तू मला भेटायला लगेच ये. तू कुठे आहेस?" असं विचा...