ट्यूब्ज कापून वापरूया
'काय चेंगटपणा चालू आहे'. घरातील संपत आलेली टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, फेस वॉश इ.च्या ट्यूब्ज कापून वापरायला सुरूवात केली की हे वाक्य काही वेळा ऐकू येतं. असं बोलणाऱ्याला वाटतं की काय हा पैसा वाचवण्याचा प्रकार चालू आहे. पण जरा बारकाईने विचार केला की याचा परिणाम आणि प्रमाण लक्षात येईल. विविध गोष्टींसाठीच्या ट्यूब कापून त्यातील गोष्टी पुढे अनेक दिवस वापरता येतात. यात पैसा वाचतो हे तर सहज लक्षात येतं. पण मुद्दा दृष्टिकोनाचादेखील आहे. भारतीय विचारानुसार एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा शक्य तितका अधिकात अधिक उपयोग केला पाहिजे. यामागे संसाधनांचा पुरेपूर उपयोग होत असतो. या दृष्टीकोनाबरोबरच नुकसान किती होतं याचं गणितदेखील पुढे दिलेल्या माहितीवरून सहज लक्षात येईल.आमच्या महाविद्यालयात दैनंदिन जीवनातील वस्तू वापरून वैज्ञानिक प्रयोग/खेळणी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तिने कापून वापरलेल्या टूथपेस्टच्या ट्यूबपासून प्रयोग करून दाखवताना अचानक विचारले की तुमच्यापैकी कितीजण अशा पद्धतीने ट्यूब कापून वापरतात? या प्रश्नानंतर चार साडेचारशे व्यक्तिंनी भरलेल्या सभागृहात मोज...