साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग ५)
रा.ना.जोशी सर आणि प्र.रा.जोशीबाई रा.ना.( सरांचं त्यावेळचं वापरलं जाणारं संबोधन) सर आम्ही शाळेत असताना काही वर्षे मुख्याध्यापक होते.ते अतिशय भरभर बोलायचे.त्यामुळे अगदी लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकायला लागायचं.कडक, शिस्तशीर म्हणून आम्हाला त्यांचा दरारा वाटायचा. एक वेगळी आठवण म्हणजे एके दिवशी बहुधा जादा तासासाठी म्हणून आम्ही शाळेत आलो होतो.हवा देखील ढगाळ अशी पडली होती. काहीतरी निमित्ताने आम्ही मुलांनी दंगा केला. रा.ना.सर शाळेतच होते.ते आले आणि आम्हा सर्वांना त्यांच्या रुळाने ( पु.लं.च्या शब्दात) " परमेश्वराने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या (पार्श्व)भागावर" चांगले फटके दिले होते.( माझ्या आठवणीप्रमाणे मला माध्यमिक शाळेत शिक्षा झाल्याच्या मोजक्या दोनतीन प्रसंगांपैकी हा एक). आम्ही दहावीत असताना ते आम्हाला इतिहास,भूगोल शिकवायला होते.परिच्छेद वाचून त्यातले मुख्य शब्द, सारांशरूप वाक्य कसं ओळखायचं , लक्षात ठेवायचं हे त्यांनी शिकवल्याचं आठवतं. बोर्डाच्या परीक्षेआधी आम्हा दोघातिघांची काही विशेष तयारीदेखील त्यांनी करून घेतली होती. जोशी बाईदेखील ( हो! हो! बाईच! त्यावेळी शाळेतील ...