शब्दांविना संवाद
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीमध्ये 'शब्देवीण संवादु' असा उल्लेख येतो. माणसाला संवाद साधण्यासाठी स्वाभाविकपणे भाषेचा म्हणजेच शब्दांचा वापर करावा लागतो. परंतु काही वेळा शब्दांशिवाय देखील संवाद होतो. संवाद म्हणजे काय तर एकमेकांकडे असलेली माहिती ,विचार ,भावभावना एकमेकांकडे पोहोचवणे. या देवाणघेवाण करण्याला संवाद म्हणतात. या संवादाबद्दल अनेक प्रकारची चर्चा होत असते. संवाद कौशल्याच्या दृष्टीने शब्दातून संवाद किंवा आणि शब्दांशिवाय संवाद म्हणजे कृती किंवा हावभाव यातून संवाद असे त्याचे दोन प्रकार सांगितले जातात. एकूण होणाऱ्या संवादामध्ये दोन्हीही प्रकारांचा समावेश होतो आणि दोन्हीही प्रकारांचे प्रमाण लक्षणीय आहे. काही वेळा माणसे मौन राहतात. परंतु अशा मौन अवस्थेत देखील कधीतरी अशी काही घटना घडते की साधारणपणे निःशब्द राहणारेदेखील बोलू लागतात. गीत रामायणामधील ' राम जन्मला ग सखी राम जन्मला' या गीतामध्ये शब्दप्रभू ग .दि. माडगूळकर यांनी 'मौनालाही स्फुरले भाषण' असे राम जन्माच्या वेळचे वर्णन केले आहे. यातून त्या प्रसंगाचा झालेला परिणाम प्रभ...