ही तर देवीची कृपा
भारतात सगुण उपासनेची दीर्घ परंपरा आहे. त्यामध्ये देवीची उपासना करणारे अनेक जण आहे. भारतामध्ये ५२ ठिकाणी देवीची शक्तीपीठे आहेत अशी श्रद्धा आहे. याशिवाय ठीक ठिकाणी ग्रामदेवतेच्या रूपामध्ये देवीची उपासना चालते. श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीची उपासना करणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी विसाव्या शतकामध्ये लक्षणीय कार्य केले अशांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचेही नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या 'माझी जीवनगाथा' या आत्मचरित्रात देवीच्या कृपेचे काही अनुभव लिहिले आहेत. यापैकी एक अनुभव असा. केशव सोळा सतरा वर्षाचा असताना १९०२ मध्ये त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला आणि इंग्रजांच्या न्यायालयात नोकरी करून निवृत्त झालेल्या त्यांच्या आजोबांच्या म्हणजे तात्यांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनावर जीवन जगण्याचा खडतर प्रसंग त्यांच्या कुटुंबियांवर आला. ते पनवेल येथे राहत होते. केशवाने त्यावेळची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण व्हावे यासाठी त्यांच्या वडिलांचे स्नेही दत्...