सहृदय स्वामी विवेकानंद
" संन्याशाला हृदय असू नये का? " भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर १८९० मध्ये भारतभ्रमणासाठी कोलकाता येथून बाहेर पडले. या प्रवासात असताना ते काशीमध्ये पोहोचले. तेथे प्रमदादास मित्र या विद्वान व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. त्यांच्याशी स्वामीजींच्या दीर्घ चर्चा होत. काशीमध्ये असताना रामकृष्ण परमहंस यांचे गृहस्थ शिष्य बलराम बसू यांच्या निधनाची बातमी स्वामीजींना कळाली. स्वामीजी भावविव्हल झाले. शोक करू लागले. त्यावेळी प्रमदादास मित्र स्वामीजींना म्हणाले , "स्वामीजी , तुम्ही तर संन्याशी आहात . तुम्ही का शोक करता?" त्यावर स्वामीजी उत्तरले , "संन्याशाला हृदय असू नये का?" दीनदुःखितांचे कष्ट पाहून स्वामीजी नेहमीच भावनाविवश होत. पण दुःख पाहून केवळ भावनाविवश होणे हे स्वामीजींचे वैशिष्ट्य नाही. अमेरिका युरोप येथील पहिल्या दौऱ्यानंतर कोलकाता येथे आले. त्यानंतर १८९८ मध्ये कोलकाता येथे प्लेगची साथ आली. या साथीत स्वामीजींनी आपले गुरुबंधू, शिष्य यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य केले. बेलूर येथे मठासाठी जमीन विकत घेत...