आचार्य अत्रे : विनोदी साहित्यिक
विनोदी लिहिणे हे खूप सोपे आहे अशी बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु विनोदी लिहिणे हे खूप अवघड असते असे आचार्य अत्रे आणि इतर अनेक साहित्यिकांनी वारंवार सांगितले आहे. आचार्य अत्रे यांना विनोदी लेखन सहजपणे जमत गेले याचे रहस्य त्यांच्या मूळच्या खोडकर स्वभावात आहे असे आपल्याला म्हणता येईल. शाळेमध्ये शिकत असताना सुट्टी मिळावी म्हणून उंदीर मारून शाळेत नेऊन टाकणे, दृष्टी अधू असलेल्या शिक्षकांच्या शेजारी उभे राहून वर्गात वाकुल्या दाखवणे, गुरुजींच्या उपरण्याचे टोक कापणे या आणि अशा पद्धतीच्या अनेक खोड्या त्यांनी केल्या यातून अनेक वेळा हशा पिकला तर काही वेळा आचार्य अत्रे यांना याबद्दल मारदेखील खावा लागला. ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) परंतु मूळ विनोदी खोडकर स्वभाव केवळ एवढेच असून चालत नाही. तर आचार्य अत्रे म्हणतात तसे , "ज्याला जीवनातील ताल आणि तोल समजतो तोच विनोदी लिहू शकतो." याचबरोबर जीवनाचा असलेला वैविध्यपूर्ण अनुभव हीदेखील आचार्य अत्रे यांची भक्कम जमेची बाजू आहे. त्या आधारावर त्यांना विनोदी लेखन करता आले. हे लेखन अतिशय लोकप्रिय झाले. ...