रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद - भगिनी निवेदिता

गुरूला दिवसा पहावे आणि रात्रीही पहावे

अनेक वेळा तथाकथित आध्यात्मिक साधू, बुवा यांनी लोकांची फसवणूक केली असे लक्षात येते. त्या वेळेला जर बारकाईने माहिती घेतली तर असे आढळून येते की फसवल्या गेलेल्या लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवला.

                                                                ( रामकृष्ण परमहंस )
याबाबत रामकृष्ण परमहंस यांची एक आठवण अतिशय उद्बोधक आहे. एकदा त्यांच्या एका शिष्याच्या लक्षात आले की गुरुदेव रामकृष्ण परमहंस रात्रीचे उठून बाहेर निघाले आहेत. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. तो लपत-छपत त्यांच्या मागे गेला आणि ते कुठे जात आहेत हे पाहू लागला. झाले असे होते की रामकृष्णांना शौचासाठी बाहेर जायचे होते. त्यामुळे ते बाहेर पडले होते आणि ते बाहेर जाऊन परत येताना त्यांना हा शिष्य भेटला. त्यावेळेला ते त्याला म्हणाले, " गुरूला दिवसा पहावे गुरूला रात्री पाहावे ". ज्या व्यक्तीला आपण गुरू म्हणून मान्यता देणार आहोत त्याचे रात्रंदिवसाचे आचरण काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.

                                                             ( स्वामी विवेकानंद )
याबाबत रामकृष्णांचे विश्वविख्यात शिष्य स्वामी विवेकानंद यांचेदेखील उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद म्हणजेच त्यावेळेचे नरेंद्र यांची पहिली भेट नोव्हेंबर १८८१ मध्ये झाली आणि रामकृष्णांचे निधन १५ ऑगस्ट १८८६ च्या मध्यरात्री झाले. या काळात नरेंद्राने आपल्या गुरूंची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा पाहिली याचे दाखले त्यांच्या चरित्रात मिळतात आणि या परिक्षांनंतरच नरेंद्रला रामकृष्णांची थोरवी मान्य झाली आणि त्याने त्यांचा गुरू म्हणून स्वीकार केला.

                                                         ( भगिनी निवेदिता )
याच गुरू-शिष्यांच्या मालिकेत पुढे भगिनी निवेदिता विवेकानंदांच्या शिष्या बनल्या . या गुरू आणि शिष्येमध्ये तिखट चर्चा, कडाक्याचे वाद विवाद होत असत. अनेकदा स्वामीजी संतापत असत. भगिनी निवेदिता स्वामी विवेकानंदांच्याबरोबर भारत भ्रमणाला निघाल्यानंतर या गोष्टी वारंवार होऊ लागल्या. यातून भगिनी निवेदिता अतिशय निराश झाल्या. तेव्हा एका ज्येष्ठ महिलेने स्वामीजींना समजावून सांगितले. त्यानंतर स्वामीजी म्हणाले, " मी आता काही दिवस एकांतात जंगलात जाणार आहे. येताना मी आपल्या सर्वांसाठी शांती घेऊन येइन." जेंव्हा काही दिवसानंतर स्वामीजी परत आले तेव्हा त्यांचे निवेदितांच्या बरोबरचे वागणे पूर्णपणे बदलून गेले.ते अतिशय शांतपणे निवेदितांना सर्व गोष्टी समजावू लागले. निवेदितांनी सहवासातून, चर्चेतून आपल्या गुरूंची थोरवी जाणून घेतली आणि आपल्या भक्तिभावाचे समर्पण त्यांच्या पायाशी केले.
गुरू-शिष्य परंपरेतील या जोड्यांची उदाहरणे नेहमीसाठीच मार्गदर्शक आहेत. गुरु म्हणून एखाद्या व्यक्तीचा स्वीकार करताना आंधळा विश्वास कामाचा नाही, भोळे भाबडेपणाही कामाचा नाही तर तिथे आपल्या बुद्धीची, विचारांची कसोटी लावली पाहिजे. ही कसोटी लावल्यास फसगत होण्याची शक्यता राहत नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख