प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !
'अजून लढाई संपलेली नाही कारण अजून मी जिंकलो नाही.' अशा प्रकारचे वाक्य अवचित कोठेतरी वाचायला मिळते आणि त्यातून लिहिणाऱ्याची जिद्द प्रकट होते.
हे वाक्य आठवायचे कारण म्हणजे नुकतेच सलग दोन दिवस शनिवार आणि रविवार आठ आणि नऊ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवशी आमच्या म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात दोन सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांच्या भेटी घडल्या. त्यांच्या आयुष्याचा प्रवास ऐकताना हे वाक्य त्यांनी खरे करून दाखवले हे लक्षात आले. त्यातील पहिला विद्यार्थी हा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्री. दिग्पाल पल लांजेकर हा होय! तर दुसरा विद्यार्थी भारतीय सैन्यामध्ये मेजर असणारा श्री. विशाल कटोच हा होय! दिग्पाल यांच्याशी संघ स्वयंसेवक या नात्याने जवळचा संबंध आला. तर विशाल महाविद्यालयाच्या वसतिगृहात तीन वर्षे राहत होता. त्यामुळे त्याच्याशी संबंध आला. या दोघांच्याही प्रयत्नांचे अनुभव ऐकायला मिळाले.
दिग्पाल यांची घरची परिस्थिती खडतर होती. जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच प्रसिद्ध कलाकार कै. विनय आपटे यांच्याशी संबंध आला. त्यांनी आपुलकीने अनेक गोष्टी दिग्पाल यांना शिकवल्या. दिग्पाल यांच्या डोळ्यांसमोर एक भव्य दिव्य स्वप्न होते ते म्हणजे छ. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आठ चित्रपटांची निर्मिती करायची. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा फर्जंद या चित्रपटाची कथा लिहिली. कथा लिहून तर तयार झाली पण आता ती पडद्यावर आणण्यासाठी निर्माता हवा. अनेक संपर्क, संबंध यातून वेगवेगळ्या माणसांची भेट घेणे चालू केले. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रस्थापितांपैकीही बहुतेकांनी तर नाउमेद केले. पण दिग्पाल यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
कुणाकडूनही चित्रपट निर्मितीसाठी पैसे मिळू शकतील असे समजले की संबंधित व्यक्तिला जाऊन भेटायचे. त्यांना कथा वाचून दाखवायची असा क्रम सुरू झाला. या प्रयत्नात ग्रामीण भागातील एका श्रीमंत माणसाकडे जाणं झालं. गावापर्यंत जाणारी एस.टी.बस चुकली म्हणून सोळा किलोमीटर पायपीट करून त्यांच्या घरी पोचले. सर्व घर गोळा झालं. कथावाचनाने सर्वजण भारून गेले. पण उत्तर मात्र, "सांगतो." असं मिळालं. साधा चहादेखील मिळाला नाही. "परत जायची काय व्यवस्था ?" तर "अमुक एका ठिकाणापर्यंत पोचा मग एस.टी.,गाडी असं कोणतंतरी वाहन मिळेल ." हे उत्तर. दरवाजात गाड्या उभ्या असूनही त्यांचा काही उपयोग नाही. परत १६ किलोमीटर पायपीट. जवळच्या टपरीवर थोडंफार खाऊन परत परतीचा प्रवास.
शहरातील एका धनवंताची गोष्ट तर अजून निराळी. त्याच्या घरी एका रविवारी वाचन झालं. ते आवडलं. 'पण एवढा पैसा मी एकटा घालू शकणार नाही म्हणून भागीदाराला बोलावतो. पुढच्या रविवारी परत या. परत वाचन करून दाखवा.' असं एक , दोन नाही तब्बल आठ रविवारी घडलं. दर रविवारी अजून एका भागीदाराची भर पडे. शेवटी थोडं रागावून स्पष्ट विचारलं तर उत्तर मिळालं, "आम्ही पैसे घालणार नाही पण तुमचं वाचन जबरदस्त होतं ते ऐकण्यासाठी बोलावलं." असं उत्तर मिळालं.
अशी १० -२० - ३० नाही तर तब्बल २४९ वाचन झाली. प्रत्येक वेळी वेगळा अनुभव. पण दिग्पाल यांनी प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी २५० व्या वाचनाने निर्माता मिळाला. पैसे उभे राहिले. चित्रपट आला. गाजला. आतापर्यंत पाच चित्रपट पूर्ण झाले. उरलेले यथावकाश होतील.
( वसतिगृहाच्या कार्यक्रमात मेजर विशाल कटोच यांचा सत्कार, सोबत डॉ. विनायक पवार)
दुसरे विद्यार्थी मेजर विशाल हे हिमाचल प्रदेशातील पालमपूर या एका छोट्याशा गावातील. बीएस्सी करण्यासाठी महाविद्यालयात आणि वसतिगृहात प्रवेश घेतला. सैन्यात जाण्याचे स्वप्न होते म्हणून एनसीसीतही भाग घेतला. महाविद्यालय आणि वसतिगृहात सर्व कार्यक्रमात अतिशय उत्साहाने भाग घेत असत. पुण्यात राहायचं तर मराठी शिकायला पाहिजे. त्यासाठी खटपट केली थोडंफार मराठी शिकले. एनसीसीतही चमकदार कामगिरी केली पण सैन्यात निवड झाली नाही. रिलायन्स कंपनीत नोकरी मिळाली पण ध्येयाचा विसर पडला नव्हता. त्यामुळे नोकरी करत करत अभ्यास सुरू ठेवला. सैन्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरला. परीक्षा दिली पण अनुत्तीर्ण झाले. परत नव्या उत्साहाने परीक्षेची तयारी केली परत परीक्षा परत अपयश. असं एक दोन नाही तेरा वेळा घडलं. पण प्रयत्न सोडले नाही. शेवटी चौदाव्या प्रयत्नात यश मिळाले. सैन्यात भरती झाले. प्रशिक्षण पूर्ण करून सीमेवर रुजू झाले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करण्याची कामगिरी मिळाली. त्यात शौर्य दाखवून अनेक दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवले. त्या शौर्याबद्दल सेना मेडल देऊन विशाल यांचा १५ जानेवारी २०२३ रोजी सन्मान करण्यात आला. जम्मू काश्मीर बरोबरच पंजाब, अरूणाचल प्रदेश याही ठिकाणी विशाल यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. चेन्नई येथील सैन्याच्या प्रशिक्षण शिक्षण संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दक्षिण सुदानमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. सध्या डिफेन्स ॲंड स्ट्रटेजिक स्टडीज या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
दिग्पाल आणि विशाल या दोघांचीही क्षेत्रे वेगवेगळी आहेत. पण त्यात यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कधीपर्यंत? तर यशस्वी होईपर्यंत! त्या दोघांचीही कामगिरी बघून प्रसिद्ध कवितेच्या ओळी आठवतात.
लहरों से डरकर नौका पार नहीं होती।
कोशिश करने वालों की हार नहीं होती।
दोघांचाही प्रवास प्रेरणादायक आहे. धडपडणाऱ्या तरुणांना मार्गदर्शक आहे.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
कष्ट आणि अथक प्रयत्न त्याशिवाय यश संपादन होत नाही.. सुंदर लेख लिहिला आहे आहे सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteखूपच मनाला भावणारी गोष्ट आहे
ReplyDeleteहोय.
Deleteसंघर्ष आणि यश
ReplyDeleteबरोबर
Deleteखूपच छान लिहलं आहे sir
ReplyDeleteप्रयतने वाळूचे कण रागडित तेल ही गळे
Deleteसुंदर लेख
धन्यवाद 🙏🙏
Deleteशेवटी चौदाव्या प्रयत्नात यश मिळाले. लहरों से डरकर नौका पार नहीं होती।कोशिश करने वालों की हार नहीं होती। खूपच सुंदर लेख आणि लेखाला साजेल आसा संदर्भ देतात सर तुम्ही. सर तुमचे लेख सुंदर आहे.....
ReplyDelete