पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट
काही दिवस हे अतिशय आनंद देऊन जातात. त्यातलाच एक आजचा दिवस! बारीपाडा , जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले श्री. चैत्रामभाऊ पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आज ते पुण्यामध्ये आले होते. हे निमित्त साधून आमच्या म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चैत्रामभाऊंची भेट झाली. त्यामुळे आजच्या दिवशी अतिशय आनंद झाला.
( आजचे छायाचित्र मध्यभागी श्री. चैत्रामभाऊ पवार, डावीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे मा. सदस्य श्री रवींद्र शिंगणापूरकर, चैत्रामभाऊंच्या उजवीकडे माझ्या पूर्वी धुळे जिल्ह्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे आमच्या महाविद्यालयातील श्री विनायक खाडे यांच्या शेजारी चैत्रामभाऊंचे सहकारी डॉ. सूर्यवंशी)
१९९९ ते २००१ ही दोन वर्षे मी धुळे जिल्ह्यात संघाचा प्रचारक म्हणून काम करीत होतो. त्यावेळी वेगवेगळ्या निमित्ताने बारीपाड्याला काही वेळा जाणे झाले. त्यानिमित्ताने सुरुवातीला चैत्रामभाऊंची ओळख झाली आणि परिचय वाढला. तेव्हापासूनच त्यांच्या कामाची माहिती मला होती.
दुर्गम डोंगरामध्ये वसलेले बारीपाडा हे अतिशय शंभर सव्वाशे घरांचे चिमुकले गाव! या गावांमध्ये राहणारे चैत्रामभाऊ शिकत असताना वनवासी कल्याण आश्रमाचे डॉक्टर आनंद फाटक यांच्या संपर्कात आले. आपण आपल्या गावातच राहून स्वतःच्या विकासाबरोबरच गावासाठी देखील काम केले पाहिजे हा संकल्प त्यांच्या मनामध्ये घट्ट रुजला. एम.कॉमपर्यंतचे शिक्षण घेऊनदेखील नोकरीसाठी शहरात जायचं नाही. हे त्यांनी पक्क ठरवलं आणि आपल्या काही सहकार्यांना बरोबर घेऊन गावासाठी काम करणे सुरू केले.
गावांमधील जंगल तोडले जाऊ नये याच्यासाठी कुऱ्हाड बंदी, लाकडाची मोळी आणायला बंदी, पावसाचे पाणी वाहून जाऊ नयेयाच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधणे, नवनवीन वृक्षांची लागवड करणे, गावातील रोजगार लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील यासाठी नवनवीन उपक्रम करणे, गावातच प्राथमिक शिक्षणाची सोय झाली पाहिजे यासाठीची खटपट असे प्रकल्प त्यांनी सुरू केले. १९९१ पासून गेली ३४ वर्षे ते हे काम अथकपणे करीत आहेत. या सगळ्या कामाचा परिणाम म्हणून गाव आता दुष्काळमुक्त झालं आहे. सधन झालं आहे. आपल्या परिसरात असलेल्या वनाची ते डोळसपणे राखण करतं तर आहेच परंतु त्यातून नवनवीन प्रकारचे उद्योग करून धनसंचय देखील करीत आहे. या गावाचे चित्र आता पूर्ण पालटले आहे. जल, जंगल, जन, जनावर आणि जमीन यांना समोर ठेवून सर्व कामे सुरू आहेत. या गावाची प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या ४४ गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चैत्राम भाऊ देशातील सात राज्यांमध्ये अशाच प्रकारची कामे सुरू व्हावीत यासाठी प्रवास करीत असतात.
या सगळ्या परिवर्तनामध्ये पहिल्यापासून स्थिर बुद्धीने, चिकाटीने कार्यरत असलेले चैत्रामभाऊ अतिशय नम्र, मितभाषी, निरहंकारी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी असलेले आहेत. या सगळ्या सद्गुणांचा सुंदर समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला दिसतो. अगदी सर्वसामान्यांसारखे दिसणारे वाटणारे चैत्रामभाऊ यांनी असामान्य कार्य करून दाखवले आहे. त्यामुळे 'मार्गाधारे वर्तावे| विश्व मोहरे लावावे |अलौकिक नोहावे| लोकांप्रती||' ही संत ज्ञानेश्वर माऊलींची उक्ती त्यांच्या बाबतीत सार्थ झालेली दिसते.
एवढे सगळे परिवर्तन झाले त्यामागे मी एकटा नसून आम्हा सर्व गावकऱ्यांचे एकत्रित प्रयत्न आहेत हे त्यांच्या बोलण्यात वारंवार येते. यालाच पाय जमिनीवर असणे असे म्हणतात.
आज त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांचे बोलणे झाले. रूढार्थाने चैत्रामभाऊ वक्ते नाहीत. परंतु कार्य करणाऱ्या माणसाच्या शब्दांचा नेहमीच प्रभाव पडतो. तसाच प्रभाव चैत्राम भाऊंच्या वक्तव्याचा होतो. पद्मश्री पुरस्कार ही सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाला मिळालेली पावती आहे अशीच त्यांची भावना आहे. या सगळ्या प्रवासात कल्याण आश्रम संघ यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून अनेक वेळा मार्गदर्शन मिळाले, प्रोत्साहन मिळाले, सहकार्य मिळाले हे त्यांनी सांगितले. गावच्या योजना सांगताना ते म्हणाले की, " प्रत्येक वेळी सरकारच आपल्यासाठी काही करील असा विचार न करता आम्ही स्वतःहून गावामध्ये जंगलासाठी सुरक्षारक्षक ठेवला." 'गाव करील ते राव काय करील' ही जी जुनी म्हण आहे. त्याचेच अत्यंत या बोलण्यातून आले.
आता गावामध्ये ४६५ हेक्टर जमिनीवर जंगल वाढले आहे. त्यामध्ये ४३५ प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांचा समावेश आहे. या सगळ्या वनसंपत्तीची किंमत काय असा प्रश्न पडल्यावर त्यांनी या विषयाशी संबंधित विद्यार्थी, प्राध्यापक यांची मदत घेऊन त्याचा आकडा काढला. तर तो आकडा ३००० कोटी रुपये इतका आहे हे त्यांनी सांगितल्यानंतर चैत्रामभाऊंनी त्यांना असे विचारले की , " या झाडांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जंगलामध्ये आढळतात, काही प्राणी आढळतात त्यांचे आयुष्य याची किंमत , या झाडांमुळे मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत याच्यात धरली तर किती आकडा होईल ?" या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. परंतु 'सर्वाभूती परमेश्वर' आहे ही भारताची प्राचीन शिकवण त्यांच्या या बोलण्यातून अनुभवायला मिळते.
अशा प्रेरणादायक व्यक्तीसोबत आजचा काही काळ घालवता आला ही अतिशय आनंदाची गोष्ट! चैत्रामभाऊंसारखी माणसे ही एकाच तेजाने सतत प्रकाश देत असतात. जणू समाजरुपी देवघरात तेवणारा नंदादीपच! हा नंदादीप अनेकांना प्रेरणा देतो आहे. त्याच्यासारखेच नंदादीप गावोगाव उभे राहत आहेत. गावोगावच्या नंदादीपांनी उजळलेली अशी गावे भारताला पुन्हा एकदा तेजांकित करतील.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
खूप छान लेख आहे सर
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteछान प्रेरणादायी लेखन केलं आहे सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteचैत्राम भाऊंचे हार्दिक अभिनंदन. भाऊंच्या कार्यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल गाडे सर धन्यवाद.
ReplyDeleteडॉक्टर नमस्कार
Delete