पुस्तक परिचय :- शहामतपनाह बाजीराव
लेखक :- कौस्तुभ कस्तुरे
राफ्टर पब्लिकेशन्स मुंबई
शहामतपनाह या शब्दाचा अर्थ शौर्य गाजवणारा किंवा शौर्यस्थान असा होतो. थोरले बाजीराव यांचा मोठा शत्रू निजाम उल मुल्कने या शब्दाने त्यांचे वर्णन केले आहे. या पुस्तकात आपल्याला प्रामुख्याने
बाजीरावांनी केलेल्या लढायांचे वर्णन ऐतिहासिक संदर्भासह वाचायला मिळते.
बाजीरावांच्या पराक्रमी कारकीर्दीतील महत्वाचे प्रसंग असे आहेत.
फेब्रुवारी १७२८ मध्ये वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पालखेड येथे निजाम उल मुल्क याच्यावर मोठा विजय मिळवला. अतिशय चपळाईने वेगाने हालचाल करून निजामाला कोंडीत पकडले होते.
माळवा या प्रांतामध्ये विजय प्राप्त करत असताना स्वत:च्या सरदारांवर ठेवलेला विश्वास दिसून येतो. स्वतःचे विशेष शिक्के राणोजी शिंदेेंना वापरायला दिले. वेळ प्रसंगी मल्हारराव होळकर यांना ते शिक्के वापरण्याची परवानगी दिली होती. माळव्यात प्रत्यक्ष नियंत्रण ठेवता येणार नाही हेेे लक्षात घेऊन मुत्सद्दीपणे होळकर, शिंदे, पवार ,बुळे, बुंदेले यासारख्या सरदारांकडे राज्यकारभार वाटून दिला. या सगळ्यातून बाजीरावांचे विकेंद्रीकरणाचे धोरण लक्षात येते.
निजाम उल् मुल्क याची सातारा दरबारात चालू असलेली कारस्थाने, अष्टप्रधान मंडळातील प्रतिनिधी, सुमंत यांची त्याला छुपी साथ याबद्दल वाचायला मिळते.
सेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांनी शाहू महाराजांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे डभई, गुजरात येथील लढाई (१ एप्रिल १७३१) झाली आणि बाजीराव यांचा विजय झाला.
मार्च ते मे १७२९ या काळात छत्रसाल बुंदेले यांना अतिशय चपळाईने मदत करून महमदशहा बंगश याला पराभूत करण्यास मदत केली. ऋणी छत्रसाल यांनी आपल्या विस्तारित राज्यातील एक तृतीयांश भाग बाजीराव यांना दिला.
औशाजवळ रूईरामेश्वर येथे २७ डिसेंबर १७३२ रोजी सर्व प्रकारे खबरदारी घेत निजाम उल् मुल्क यांची घेतलेली भेट सुरक्षितपणे पार पडली.
अनेक दशके अजिंक्य राहिलेल्या जंजिऱ्यावरची स्वारी(मे - डिसेंबर १७३३), या स्वारीत अष्टप्रधान मंडळातील प्रतिनिधींच्या कुटील कारवाया, इंग्रजांच्या कुटील हालचाली यावर मात केली. पराक्रम गाजवला. शाहू महाराजांच्या सूचनेनुसार विजयी तह केला.पुढे जंजिऱ्याच्या मोहिमेत चिमाजी आप्पांनी पराक्रम गाजवला. त्यांनी सिद्दीसात याला लढाईत ठार केले.
आई राधाबाई यांच्या १७३५ मधील तीर्थयात्रेसाठी सहकाऱ्यांनी तर मदत केलीच पण बाजीरावांचे विरोधक असणारे सवाई जयसिंह, बंगश, दिल्लीचा बादशाह या सर्वांनी मदत केली. यातून त्यांचा शत्रूंना असलेला धाक दिसून येतो.
जानेवारी १७३६, राजपुताना येथील मोहिमेत जंगी स्वागत झाले. दिल्लीच्या मोगलांशी सख्य न करणारे उदयपूरचे महाराज जगतसिंह यांना मोठा सन्मान देऊन बाजीरावांनी स्वतः त्यांच्यावर चवऱ्या ढाळल्या. तर दिल्लीच्या मोगलांच्या बाजूने असणाऱ्या जयपूरच्या सवाई जयसिंह यांच्याबरोबर बाणेदारपणे वर्तन केले.
एप्रिल १७३७ , अचानकपणे दिल्लीवर छापा मारून दहशत पसरवली. ज्या दिल्लीच्या बादशाहाच्या कैदेतून आग्रा येथून छ.शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली, त्याच दिल्लीच्या बादशहाला भयभीत केले. बादशाहाच्या काव्याला भुलून त्याच्या भेटीसाठी जाऊ नका, दगाफटका होऊ शकतो असे छ.शाहू महाराजांनी आवर्जून बाजीरावांना सुचवले.
२५ डिसेंबर १७३८ भोपाळच्या किल्ल्यामध्ये कोंडीत पकडून निजामाला शरणागती पत्करण्यास आणि तह करण्यास भाग पाडले. या लढाईदरम्यान बाजीरावांनी धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांचा सल्ला मान्य करून निजामाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात वेळ व शक्ती न घालवता तह केला. मराठी दौलतीचा फायदा करून घेतला.
१७३७-१७३९ या काळात चिमाजी अप्पा यांनी वसई मोहीम फत्ते केली आणि स्वराज्याला जोडली. इंग्रजांनी घाबरून तह केला.या लढाईत फडके यांनी ढिलाई केली तेंव्हा त्यांच्यावर कठोर कारवाई करायला बाजीरावांनी सांगितले. याच मोहिमेत बाजीरावांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी बाजी भीवराव रेठरेकर यांचा मृत्यू झाला. रेठरेकर यांच्या मातोश्रींना सांत्वन पण पत्र लिहिले आणि आता "मीच तुमचा बाजी" अशा शब्दात धीर दिला. यातून सहकाऱ्यांना जपण्याची वृत्ती लक्षात येते.
जानेवारी ते फेब्रुवारी १७३९ या काळात नादीरशहाच्या भारतावरील स्वारीच्या वेळी अटकाव करण्यासाठी जाता येत नाही आले नाही याबद्दल बाजीरावांना हळहळ वाटली. परचक्र हे सर्वांवर आहे हे लक्षात घेऊन जगतसिंहाचा दूधभाऊ नागराज यांना पत्र लिहून बाजीराव विरोधक सवाई जयसिंह यांच्यासह सर्व राजपूत आणि मराठे सर्वांनी एकत्र येऊन परचक्राविरूद्ध लढूया असे सुचवले.
फेब्रुवारी १७४० सर्व सरदारांच्या सैन्याचे योग्य नियोजन करून निजाम उल् मुल्क याचा मुलगा नासिरजंग याचा पराभव केला.
अनेक लढायांमध्ये विजय मिळवला तरी बाजीराव यांच्यावर मोठे कर्ज होते.त्यासाठी ते छ.शाहू महाराज, शाहू महाराजांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांच्याकडे विनंती करत असत.
या पुस्तकात इसवी सनापूर्वी लिहिले गेलेल्या, 'आर्ट ऑफ वार' या चिनी रणनीतीकार सन त्झु याच्या पुस्तकातील विवेचन आणि बाजीरावांची युद्धपद्धती यांच्यातील सारखेपणा तपशीलवारपणे दाखवून दिला आहे.
पुस्तकात मूळ कागदपत्रांतील मजकूर अनेक ठिकाणी दिला आहे. तो वाचताना मराठी भाषेमधील शब्द त्या काळात कसे होते याचीदेखील माहिती होते.उदाहरणार्थ
भासण (भाषण), ताबिन (ताब्यात), गोस्टी (गोष्टी ), समंध (संबंध), धणी (धनी), येश (यश),इ.
थोरल्या बाजीरावांच्या लष्करी कौशल्याची माहिती करून घेण्यासाठी हे एक चांगले पुस्तक आहे.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment