साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ८ )

 प.अ.वीरकरबाई

शाळेतील दिवस हे मंतरलेले असतात याची जाणीव शाळा सोडल्यानंतर होते.शाळेत असताना अनेक चांगले शिक्षक मिळाले हे भाग्यच असं आता लक्षात येतं. अनेक शिक्षक अनेक कारणांनी आवडायचे.हिंदी विषय शिकवणाऱ्या वीरकरबाई आवडायच्या त्यांच्या शिकवण्यामुळे.शिकवता शिकवता जणू आयुष्याचे धडेच त्या द्यायचा. त्यांनी शिकवलेला प्रतिक्रिया ही जीवन की कसौटी है हा धडा तर माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे.राष्ट्रभाषा सभेच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या निमित्ताने होणारे तास मला नेहमीच आवडायचे.
आम्ही शाळेत असताना एकट्या राहणाऱ्या वीरकरबाई नेहमी त्यांचा आब राखून असायच्या. त्यांच्याबद्दल नेहमी आदर वाटायच्या. शाळेत असताना एक वर्षी बहुधा १९८६ मध्ये त्यांनी मला शाळेच्या हिंदी दिनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख ( बहुधा अध्यक्ष) केलं होतं.त्यावेळचे माझं सादरीकरण त्यांना आवडलं होतं. त्यांनी आवर्जून कौतुक केलं होतं.
नोव्हेंबर २०१९ मध्ये बाईंची भेट झाली. तेव्हा त्या साताऱ्यात बहिणीकडे राहत होत्या. त्यांचे स्मरण चांगले होते.व्यक्ती,घटना त्यांना चांगल्या आठवत होत्या .बरोबरीचे अनेक सहकारी क्रमाने काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख त्यांना जाणवत होतं. त्यांना भेटल्यानंतर खूपच आनंद झाला. शाळेचे ते आनंदी दिवस पुन्हा आठवले.छान वाटले.
१० मे २०२० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.



( फोटो बाईंच्या बहिणीच्या नातवाने काढला आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये बाईंची भेट झाल्यावर या स्मरणरंजनमालेची कल्पना सुचली.)

वीरकरबाई , तुमची परत एकदा आठवण झाली!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्री मा.डॉ.रमेश पोखरियाल यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा बुधवार दिनांक १८/११/२०२० चा कार्यक्रम ठरला आणि तयारी सुरू झाली. मंत्रीमहोदयांसाठी कार्यक्रम हिंदी भाषेत करायचे ठरले. त्याप्रमाणे नियोजन होऊन तयारी पुढे सुरू झाली. हिंदी कार्यक्रमाच्या तयारीसाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या माजी प्रमुख डॉ.नीला बोरवणकर आणि विभागातील सध्याचे प्राध्यापक , कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ.बाबासाहेब गव्हाणे यांची चांगली मदत झाली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मी आभार प्रदर्शन करायचं असं ठरलं. त्याप्रमाणे तयारी केली आणि कार्यक्रमात (अर्थातच) हिंदीतून (बोरवणकर मॅडमना मसुदा दाखवून त्यांच्या सूचनांनुसार निश्चित केलेले) आभार प्रदर्शन केले. त्यानंतर अनेक जणांनी त्याबद्दल आवर्जून चांगला अभिप्राय दिला.

शाळेत असताना १० पर्यंतच हिंदी शिकलो ( तेही५- ७ वी १०० गुणांचं आणि नंतर ५० गुणांचं ) पण ८-१० वीच्या वर्षात वीरकर बाईंनी चांगली तयारी करून घेतली. राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षांच्या निमित्ताने अधिक तयारी झाली.

बाईंचं मनापासूनचं शांतपणे शिकवणं, त्यांचे उच्चार , पाठाबाबत अधिकची माहिती यातून संस्कार झाले. त्यातून बाईंनी मी नववीत असताना दिलेली हिंदी दिनाच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय संधी. हे पेरलं गेलेलं आजही उपयोगी पडतं. बाईंचे संस्कार आजीवन कायम राहतील. बाईंची वेगवेगळ्या निमित्ताने आठवण होत असते. ( दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी बाईंचं निधन झालं.)




वीरकरबाईंना सविनय प्रणाम!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने

वीरकरबाई , तुमची परत एकदा आठवण झाली!

सुधीर गाडे, पुणे
May be an image of 2 people, including Sudhir Gade

5 Comments


Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख