संत तुकाराम आणि आजची परिस्थिती
गेली अनेक शतके महाराष्ट्राच्या मनाची मशागत करणाऱ्या वेगवेगळ्या पंथ, संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संप्रदायात संत बहिणाबाई यांचा " ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस " हा उल्लेख असणारा अभंग प्रसिद्ध आहे.
या अभंगांमध्ये ज्यांचे वर्णन वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून केले आहे त्या संतश्रेष्ठ तुकाराम यांचे अनेक अभंग हे समाजाला शाश्वत मार्गदर्शन करणारे आहेत. महान व्यक्तिंच्या जीवनात काही भाग ते जेव्हा जगत असतात त्या काळासाठी असतो. तर त्यांची शिकवण ही चिरकालिक असते असे लक्षात येते. संत तुकाराम यांच्याबद्दल देखील हेच म्हणता येईल. त्यांच्या शिकवणुकीतील काही गोष्टींचा विचार करूया.
माणसाच्या आयुष्यासाठी पैसा ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. परंतु हा पैसा किंवा धन हे चांगल्या मार्गाने मिळवावे आणि ते मिळवल्यानंतर केवळ आपल्यासाठी आहे असा न विचार करता समाजाचा देखील विचार करावा हे संत तुकारामांनी सांगितले आहे. ते म्हणतात
" जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी "
आपल्या आजूबाजूला देखील समाजामध्ये अशी माणसे दिसतात की जी अतिशय प्रामाणिकपणे आपला नोकरी-व्यवसाय करून पैसे कमावतात आणि समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेने त्या पैशाचा उपयोग समाजाच्या कामासाठी करतात. माझ्या परिचयाचे एक जण अनेक वर्षे मोठ्या पदावर प्रामाणिकपणे काम करून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर आपल्याजवळ असलेल्या धनापैकी मोठा भाग त्यांनी समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या काही संस्थांना दिला. उद्योगजगताचे उदाहरण बघायचे असेल तर आपल्या देशात टाटा उद्योगसमूह नीतीमूल्ये सांभाळून आपला व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीपासून प्रसिद्ध आहे. जसा जसा आपल्या देशात कोविड १९ या विषाणूचा प्रसार वाढू लागला तेव्हा टाटा उद्योगसमूहाने खूप मोठी रक्कम पंतप्रधान मदत निधीला दिली. त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने समाजाच्या गरजेसाठी मदत केली. ही दोन्ही उदाहरणे संत तुकारामांचा विचार प्रत्यक्षात कसा आचरणात आणला जातो यासाठी आदर्श आणि अनुकरणीय आहेत.
व्यक्तिला आयुष्यात प्रगती करायची असेल तर त्याला नेहमी स्वतःच्या क्षमता, स्वतःच्या इच्छा ,आकांक्षा या समजावून घेणे आवश्यक असतं. या गोष्टी समजावून घेतल्या की मग वेगवेगळ्या प्रसंगातदेखील ती व्यक्ती आपला उत्कर्ष साधू शकते. याबाबत संत तुकाराम म्हणतात
" तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी "
हा जो आपुलाचि वाद आहे तो स्वतःशीच आहे . हा वाद आपण जितक्या चांगल्या पद्धतीने घालू तितकी प्रगतीची दारे उघडत असतात.
चित्रपटसृष्टीचे उदाहरण घ्यायचे तर साधारणपणे काही विशिष्ट प्रकारच्या कथा घेऊन चित्रपट बनवल्यास यश मिळवता येते अशी समजूत असल्याचे दिसते. परंतु नव्या पिढीतील आयुष्मान खुराणा या अभिनेत्याने जाणीवपूर्वक वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमधील भूमिका साकारल्या आणि चांगले यशदेखील मिळवले हे आपल्याला दिसते. 'द वॉल' या नावाने भारतीय क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू राहुल द्रविड हा उत्तम फलंदाज. परंतु आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर त्याने क्रिकेट संघामध्ये टिकून राहण्यासाठी यष्टिरक्षणाचेदेखील काम चांगले केले , तसेच कर्णधार पदही भूषविले. हे सगळे तो करू शकला ते त्याने स्वतःच्या मनाशी संवाद साधल्यामुळेच असे वाटते.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची ओळखणे हे अतिशय गरजेचे असते. अनेकदा स्वतःच्या सामर्थ्याची ओळख नसल्याने आयुष्यातील लहानमोठ्या संकटामुळे माणसे खचून जाताना दिसतात. अशा प्रसंगी स्वतःची ओळख सांगणारे संत तुकारामांचे शब्द लक्षात घ्यावे असे वाटते. ते म्हणतात
अणु रेणूनिया थोकडा तुका आकाशा एवढा
स्वतःच्या सामर्थ्याची ही ओळख व्यक्तीला झाली की ती खचून जात नाही . स्वसामर्थ्याची ओळख असणारी व्यक्ती नुकतेच आत्महत्येचे दुर्दैवी पाऊल जसे एका प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याने उचलले त्याच्या मार्गाने जाणार नाही. स्वसामर्थ्याची ओळख असलेली ही व्यक्ती प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक विठ्ठल कामत यांच्यामध्ये बघायला मिळते. जेव्हा त्यांनी जागतिक स्पर्धेसाठी आपल्या 'हॉटेल ऑर्किड'ची नोंदणी केली तेव्हा त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता. इतका विश्वास होता की प्रत्यक्ष पारितोषिक वितरणाच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी आपले नाव जेव्हा पारितोषिकासाठी पुकारले जाईल त्यावेळी कोणत्या पद्धतीने सामोरे जायचे याची तालीम केली. खरोखरच दुसऱ्या दिवशी त्यांच्याच हॉटेलला पारितोषिक मिळाले. त्यामुळे स्वतःची ओळख करून घेणे अतिशय गरजेचे आहे हे लक्षात येते.
जगामध्ये सध्या जे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत त्यापैकी एक प्रश्न हा पर्यावरणाचा आहे. पर्यावरणाचा विचार करताना संत तुकाराम म्हणतात
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे सुस्वरे आळविती
अर्थात वृक्षवल्ली, वनचर हे सगळे आमचे सोयरे म्हणजेच नातेवाईक आहेत. हा दृष्टीकोन ठेवला म्हणजे आपण आपल्याच माणसांची जशी काळजी घेतो तशीच काळजी आपण पर्यावरणाची देखील घेऊ. पाश्चिमात्य विचारांच्या दृष्टीने मनुष्याला सृष्टीच्या केंद्रस्थानी मानले आहे. सर्व सृष्टी ही मनुष्याच्या उपभोगासाठी निर्माण झाली आहे अशी मूळ कल्पना असल्याने मानवाच्या सुखासाठी नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर झाला. त्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. पण भारतात हे सोयरे असणारे वृक्ष वाचवण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन यासारखे अभिनव आंदोलन चालवले आणि जंगल वाचवण्यात यश मिळवले. राजस्थानमध्ये राहणारा बिश्नोई समाज परंपरेने वनचरांना आपले सोयरे मानतो त्यामुळे त्यांनी मौजमजेसाठी काळविटाची हत्या करणाऱ्या चित्रपट अभिनेत्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला. पर्यावरण हे आपले सोयरे आहेत हा दृष्टीकोन बाळगून आपण निसर्गाशी जुळवून घेत जगू लागलो की पर्यावरणाच्या समस्यांमधून मार्ग दिसू लागेल.
जगासमोर आणखीन एक प्रश्न उभा आहे तो म्हणजे दहशतवादाचा. स्वतःचाच विचार फक्त श्रेष्ठ अशी आडमुठी भूमिका घेऊन काही जणांनी जगात अत्याचाराचे तांडव चालवले आहे. अशा अत्याचारी लोकांना बळानेच धडा शिकवला पाहिजे. त्यावेळी संत तुकारामांचे शब्द आठवतात
भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी
काही वर्षांपूर्वी काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुराने थैमान घातले तेव्हा आपल्या लष्करी जवानांनी प्राणांची बाजी लावून नागरिकांना मदत केली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. परंतु जेव्हा याच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सामना होतो त्यावेळेला सैनिक कठोरपणाने अशा दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवतात. भारताचा द्वेष बाळगून जेथे दहशतवाद्यांचे प्रशिक्षण उघड-उघड सुरू होते अशा बालाकोट येथील दहशतवादी तळावर भारतीय लष्कराने हल्ला करून तो तळ उखडून टाकला तेव्हा त्यांनी ' नाठाळाचे माथी हाणू काठी ' याच शिकवणुकीचे आचरण केले.
सध्या जग कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. सरकारी यंत्रणा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जसे प्रयत्न करीत आहेत तसेच
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
या संत तुकारामांच्या उक्तीनुसार समाजातील अनेक व्यक्ती, संस्था , संघटना प्रयत्न करीत आहेत. पायपीट करत आपल्या घराकडे निघालेल्या मजुरांच्या जेवण खाण्याची व्यवस्था अशाच संस्था संघटनांनी केली. तेव्हा त्यांनी सेवाभावातून आपल्यातील ' साधुत्व ' प्रकट केले. कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या निराधार व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आलेली सेवाभावी माणसे ही संत तुकारामांच्या म्हणण्यानुसार ' भगवंताच्या मूर्ती ' आहेत.
परिस्थिती ज्यावेळी बिकट होते त्यावेळी भारतीय माणूस हा अध्यात्माकडे वळतो कारण अध्यात्म हीच भारताची वेगळी अशी एकमेव ओळख आहे. संत तुकाराम म्हणतात
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संसार ॥
संत तुकाराम यांनी जो दुष्काळ अनुभवला तोदेखील त्यांनी अध्यात्ममार्गात पुढे जाण्यासाठी सहाय्यक मानला. तसेच आपणदेखील सध्याचे संकट अध्यात्म मार्गात पुढे जाण्यासाठी सहाय्यक आहे असे मानून पुढे जाऊयात. भारताच्या अध्यात्मिक प्रवृत्तीचा जगाला परिचय करून देऊयात. जेव्हा जगाला या अध्यात्मिक प्रवृत्तीचा , विश्वबंधुत्वाचा अनुभव येईल तेव्हा निश्चितपणे जग हे भारताकडून मार्गदर्शन स्वीकारेल आणि प्रगतीपथावर पुढे जाईल.
छायाचित्र विकिपीडिया, कोकणी विश्वकोश
सुधीर गाडे, पुणे
👌👌👌👍👍👍👏👏👏सुंदर
ReplyDelete