स्वारगेट - साखरवाडी एस.टी

ऑगस्ट २०१८ मध्ये बऱ्याच वर्षांनी स्वारगेटवरून संध्याकाळी ६ वाजता सुटणाऱ्या एस.टी. ने साखरवाडीला जायचा योग आला. त्या प्रवासात मनात सहजच जुन्या आठवणी दाटून आल्या.
१९८८ साली १० वी झाल्यानंतर ११ १२ वीला पुण्यात शिक्षणासाठी होतो त्यावेळेस ही एस.टी. माझ्यासाठी फार महत्वाची होती.त्यावेळी काय होतं आणि आता काय आहे असा विचार सुरू झाल्यावर, एकेक गोष्टी आठवू लागलो.त्यावेळी साखरवाडी ते पुणे तिकीट १८ किंवा १९ रुपये होतं. एसटीची बांधणीही वेगळ्या प्रकारची असायची.वाहकाला बसण्यासाठी जागा मागे असायची.आतमध्ये एका बाजूला तीन तर दुसऱ्या बाजूला दोन जणांसाठी बसण्याची जागा असायची.त्यावेळी ही एस टी स्वारगेट कात्रज, शिरवळ, भादे, भोळी,लोणंद, बडेखान अस करत रात्री ९ च्या सुमाराला साखरवाडीला पोचायची.
स्वारगेटहून सायंकाळी ६ ला निघणारी ही एस टी दुपारी १२.३०- १ च्या सुमारास फलटणहून निघायची.साखरवाडी, बडेखान, लोणंद, शिवाजीनगर ( ता.खंडाळा जि. सातारा) , मोर्वे, शिरवळ असे टप्पे घेत स्वारगेटला पोचायची.पण बऱ्याच वेळा या गाडीचे चालक वाहक हे अगदी आयत्यावेळी ठरायचे.त्यामुळे स्वारगेटला पोचेपर्यंत कधी कधी उशीर व्हायचा आणि पुण्याहून रात्री साखरवाडीला पोचणारी ही एकच गाडी असल्याने पुण्यात कामासाठी आलेले अनेक साखरवाडीकर अगदी आतुरतेने वाट पहायचे. मला तर आठवतंय एकदा बहुधा दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी निघालो होतो तेव्हा ही गाडी जवळपास ७ -७.१५ ला स्वारगेटहून निघाली.बर घरी येतोय हे आधी कळवल्यामुळे घरी आई बापूही वाट पहात असतील ही जाणीव सारखी अस्वस्थ करत होती.पण मोबाइलच काय साधा फोनहि नसल्याने घरी उशीर होतोय हे कळवायचे कसे हा प्रश्न होता.वाहतूक नियंत्रकाकडे आम्ही साखरवाडीकर एकेक जण जाऊन चौकशी करत होतो पण " अजून गाडी आली नाही, येईल एवढ्यात " याच्याशिवाय दुसरं काही उत्तर मिळेना.हवालदिल झालेलो आम्ही एकदाचे गाडीत बसलो तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला.

                                                                   ( आमचे बापू कै. शिवलिंगशेठ )

इकडे घरी आई बापू वाट पहात होते पण त्यांना आधीच माहिती होतं की आज उशीर होणार आहे.याचं कारण म्हणजे आमचे बापू कै. शिवलिंगशेठ यांची फलटण आगारातील बहुतेक सगळ्या चालक, वाहक , नियंत्रक यांच्याशी चांगली ओळख होती.त्यामुळे त्यांना गाड्यांची वेळापत्रके, वेगवेगळ्या ठिकाणांची अंतरे, तिथपर्यंत होणारे एसटीचे टप्पे यांची खडानखडा माहिती होती.नंतर केव्हातरी कळालं की त्यांना तरूणपणी एसटीत नोकरी करायची होती पण आमचे आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे यांच्यामुळे त्यांना दुकानदारीत पडावं लागलं. पण एसटीची ओढ त्यांची कधी कमी झाली नाही.त्यामुळे सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते.काही वेळा वडगावे नावाचे वाहक रात्री आमच्या घरी जेवायला असायचे.बहुतेक वेळा घरी आईने केलेली रात्रीची भाजी , पाण्याची कळशी ही वहिवाटीने या गाडीच्या वाहक, चालक यांच्याकडे पोचती व्हायची किंवा ते हक्काने घरून घेऊन जायचे.होळ सुरवडी या ठिकाणी घर असलेले भोसले, धुमाळ, नलवडे हे चालक सायकल घेऊन रात्री त्यांच्या घरी जायचे आणि पहाटे परत येऊन ही गाडी फलटणला घेऊन जायचे.
११ वीला शिक्षणासाठी येण्यापूर्वी मी ३-४ वेळाच सहल, गणपतीचे देखावे पाहणे , आजारी असलेले आमचे काका तात्या यांना भेटण्यासाठी पुण्यात आलो होतो ते घरच्या मांणसांबरोबर.पण आता मात्र शिक्षणासाठी इथं रहायचं होतं आणि तेपण वसतिगृहावर.काही कारणांमुळे प्रवेशाला उशीर झाल्यामुळे थेट प्रवेश मिळू शकला नाही.पण नंतर केंद्रीय प्रवेश पद्धतीने स.प.महाविद्यालयात आणि वसतिगृहात प्रवेश मिळाला.वसतिगृहात राहणं सुरू झालं.त्यामुळे घरची आठवण नेहमीच यायची.त्यात अजून एक गोष्ट म्हणजे इतके दिवस सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालं होतं आणि आता ११ वी शास्त्र शाखेचे शिक्षण इंग्लिश भाषेमधून.त्यामुळे तर अजूनच अडचण. इतक्या वर्षांनंतरही मला स्पष्ट आठवतं की सुरुवातीचे जवळपास दोन महिने रोज संध्याकाळी ५ सुमारास मनात चलबिचल सुरू व्हायची.रोज वाटायचं की भरावी बॅग आणि पकडावी ही ६ ची गाडी म्हणजे ९ वाजता घरी.आईच्या हातचं जेवायला मिळणार.मग काय आनंदीआनंद होईल.पण मनात सारखी चलबिचल होत असली तरी कोणत्या तरी निश्चयाने मी स्वतःला रोज अडवत असे.आणि नंतर जवळपास दोन महिन्यानंतर गणपतीउत्सवाला साखरवाडीला गेलो.त्यानंतर मात्र ही चलबिचल बऱ्याच अंशी कमी झाली आणि मी पुण्यात रुळलो.

                                                        ( स्वारगेट साखरवाडी एस.टी. )

त्यावेळी साखरवाडीहून सकाळी ८ वाजता स्वारगेटला एसटी असायची.ही सकाळची गाडी आणि संध्याकाळी स्वारगेटहून निघणारी ६ ची गाडी यांचा थेट स्वारगेटला किंवा साखरवाडीला जाणं एवढाच उपयोग नव्हता तर घरचा डबा, काही सामानसुमान हे मिळण्याची ती एक हक्काची सोय होती.याचं कारण रोज कोण ना कोणतरी पुण्याला येणारे साखरवाडीकर असायचे आणि कोणी नसलं तर वाहकचालक तर होतेच.काहीवेळा मीदेखील पुण्याहून साखरवाडीला काहीबाही पाठवायचो.
नुकत्याच केलेल्या या प्रवासामुळे या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

161 Comments


Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख