महाबळेश्वरकर पती पत्नी
कै. रवींद्र सदाशिव महाबळेश्वरकर आणि कै. शर्मिला रवींद्र महाबळेश्वरकर
( फोटो शंतनू अगदी लहान असतानाचा २००४ मधील)
पुण्यात १९९५ ते १९९७ मध्ये मी एका खाजगी कंपनीत नोकरीला होतो. त्या दरम्यान या दोघांची आणि माझी पहिली भेट झाली. त्यावेळी मी मंगळवार पेठेत रवीचे मित्र श्री.प्रकाश मुळे यांच्या खोलीवर राहत असे. महाबळेश्वरकर त्यावेळी असणाऱ्या शाहू नगराचे कार्यवाह होते. बऱ्याच वेळा दाढी वाढवत असल्याने महाराज आणि नगर कार्यवाह असल्याने कावा या नावाने ओळखले जात.
रवी हा एक कलंदर मनस्वी असा माणूस होता. सुरुवातीला लौकिक शिक्षण कमी असल्यामुळे रवी गाडी दुरुस्तीचे काम करीत असे. दोन चाकी गाड्या तो सफाईने दुरुस्त करत असे.त्याच दरम्यान एका गाडीदुरुस्ती केंद्रावर प्रशिक्षक म्हणून काम करत असे. आयुष्यात काही काळ केवळ संघासाठी द्यायचा असे ठरवून रवी काही महिने विस्तारक होता. परत आल्यानंतर रवीने पुणे जनता बँकेत सेवक म्हणून नोकरी सुरू केली. परंतु त्याचबरोबर लौकिक शिक्षण वाढवण्याचाही प्रयत्न केला. काही वर्षांच्या प्रयत्नाने पदवी मिळवली आणि तो जनता बँकेत लेखनिक म्हणून काम करू लागला.
रवीला कलंदर असं म्हणण्याचं कारण त्याची विचार करण्याची, वागण्या-बोलण्याची पद्धती एकदम वेगळी होती. तो गाड्या दुरुस्त करायचा, घड्याळं, वेगवेगळी यंत्रंदेखील तो दुरुस्त करू शकत असे. एवढंच नव्हे तर काही वेळेला माणसांचे प्रश्न विलक्षण पद्धतीने सोडवायचा. पहिल्या भेटीत रवीची एक वेगळीच प्रतिमा मनावर उमटायची. पण जसजसं त्याच्याजवळ जाऊ, त्याच्या संपर्कात येऊ त्यावेळी त्याचं वेगळं रूप समोर येत असे. मी शाहूनगरात असताना शाखा मुख्यशिक्षक म्हणून काम करीत असे. त्याच नगरात टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. तिथे आपले अनेक स्वयंसेवक त्यावेळी राहत असत. त्यापैकी एका स्वयंसेवकाच्या मनावर परीक्षेच्या आदल्या दिवशी खूप ताण आला. आपली परीक्षेची तयारी अपुरी झाली असं त्याला वाटू लागलं. तो एकदम निराश झाला आणि त्यावेळी अशा परिस्थितीत भेटण्याचं एक हक्काचं घर म्हणजे रवीचं. तो रवीकडे आला आणि रडू लागला. रवीनं त्यांच्याशी संवाद सुरू केला. संवाद संपताना या स्वयंसेवकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि तो परीक्षेला गेला. आता तो एक प्रथितयश डॉक्टर म्हणून समाजात काम करतो आहे.
कराड, सातारा येथील कै. आबा कुलकर्णी यांचादेखील मला जवळचा सहवास लाभला. १९९६ साली त्यांच्या शेवटच्या आजारपणात ते रुबी हॉस्पिटल मध्ये होते. त्यावेळी त्यांची मरणासन्न अवस्था पाहून मी अतिशय अस्वस्थ झालो. तिथून तडक रवीच्या घरी आलो आणि मनाचा बांध फुटून ढसढसा रडलो. मनाच्या प्रक्षुब्ध अवस्थेत रवीने आणि वहिनींनी अगदी आपुलकीने सांत्वन केले. नंतर ज्यावेळी मी प्रचारक म्हणून काम करण्याच्या निर्णय घेतला त्यावेळी रवी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. चार वर्षे प्रचारक म्हणून मी काम करत असताना रवी आणि वहिनी अधूनमधून साखरवाडीला जात असत आणि आई-बापू यांची बोलणी ऐकून घेत असत.
रवीच्या बरोबर वहिनींशी देखील जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला होता. रवीचा कलंदर स्वभाव, घरात असणारी आर्थिक ओढाताण आणि संतानप्राप्तीसाठी चाललेले प्रयत्न या सगळ्यांमध्येदेखील वहिनींचा अगत्यशील स्वभाव टिकून होता. घरी आल्यागेल्या सर्वांशी आपुलकीने बोलणे, आदरातिथ्य करणे आणि जमेल त्या पद्धतीने संघ कामात सहभागी होणे चालू असे.
रवीने ज्योतिषशास्त्राचा देखील थोडा अभ्यास होता. त्याने स्वतःच्या आणि वहिनींच्या पत्रिकेचा अभ्यास केला होता. आपल्याला उशिरा का होईना संतान प्राप्ती होणार आहे असा त्याचा निष्कर्ष असल्याने त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने त्यांना संतानप्राप्ती होऊ शकली नाही.या दोघांच्या पोटी संतान नसले तरी त्यांनी त्यांच्या परिचयाच्या सर्वांवर मायेची पाखर धरली.
माझ्या लग्नाच्या वेळी रवी आणि वहिनी दोघे ही एक-दोन दिवस आधीच साखरवाडीला आले होते. माझ्याबरोबर माझी चुलतबहीण सौ.रोहिणी हिचेदेखील लग्न त्याच गणपती मंडपात होणार होते. लग्नाच्या आदल्या दिवशी माझा भाऊ सचिन यांची मुलगी कै.मानसी जुलाब आणि उलट्यामुळे आजारी पडली. तिला घेऊन सचिन आणि त्याची बायको सौ.अनिता डॉक्टरांच्याकडे फलटणला गेले. ते दोघे डॉक्टरांच्याकडून आल्यानंतर महाबळेश्वरकरवहिनींनी काळजीपूर्वक मानसीकडे लक्ष दिले.
लग्न झाले त्यानंतर काही दिवसांनी आम्ही ( मी आणि सौ.शैलजा )पुण्यात एकत्र राहू लागलो. मला भाड्याचे घर मिळाले नव्हते आणि त्याच दरम्यान शैलजा पुण्याला येणार होती.योगायोगाने रवी आणि वहिनी काही निमित्ताने बाहेरगावी जाणार होते. या दोघांनीही आग्रहपूर्वक मला आणि शैलजाला त्यांच्या घराची चावी दिली आणि त्यांच्या घरी राहायला लावले. आमचा मुलगा चि.शंतनूच्या जन्मानंतर देखील स्नेहसंबंध असेच चालू राहिले.
अनेक आठवणी मनामध्ये घर करून आहेत. आम्हा दोघांना रवी आणि वहिनी यांचा आधार वाटायचा. एकमेकांकडे जाणेयेणे व्हायचे. रवीच्या अखेरच्या आजारपणात त्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी दोन-तीन दिवस आधी मी, सौ.शैलजा आणि चि. शंतनू त्यांना घरी भेटायला गेलो होतो. शंतनूला त्यावेळी त्याच्या एका घड्याळासाठी सेकंद काटा हवा होता. वेदना होत असतानादेखील रवीने त्याच्याकडचा सेकंड काटा शोधून दिला. तीन-चार दिवसांनीच २३/४/१५ ला भल्या सकाळी निरोप आला आणि रवी रूग्णालयातच गेल्याचे कळाले.आम्हा दोघांनाही मोठं माणूस गेल्याचे दुःख झाले.
नंतर वहिनींकडे अधून मधून जाणे होत असे. अचानक एके दिवशी संध्याकाळी वहिनींच्या अपघाताची आणि त्यांना दीनानाथ रुग्णालयात ठेवल्याची बातमी कळाली. लगेच रात्रीच मी आणि सौ.शैलजा त्यांना बघण्यासाठी गेलो. वहिनी बेशुद्ध अवस्थेत होत्या. ते वहिनींचे अखेरचे दर्शन.त्यांचं १४/२/१७ ला रुग्णालयातच निधन झालं.
या दोघा पती-पत्नीबद्दल आमच्या दोघांच्याही मनात खूप आपुलकी आणि आधाराची भावना होती. अधून मधून प्रसंगाने निमित्ताने दोघांचीही आठवण मनाला विव्हळ करीत असते.
या दोघांनाही विनम्र अभिवादन.
सुधीर गाडे, पुणे
विनम्र अभिवादन
ReplyDelete🙏🙏
Deleteरवी महाबळेश्वरकर सारखी व्यक्तिमत्वे आजकाल फार दुर्मिळ झालेली आहेत. यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. त्यामुळे रवी सारख्या व्यक्तिमत्वांची स्मृती चिरंतन राहते.
ReplyDeleteहोय
Delete