सांगतो वडिलांची महती.....


      आमचे वडील कै. शिवलिंग कृष्णाजी गाडे यांना साखरवाडीत शिवलिंगशेठ आणि घरात बापू म्हणून ओळखले जाई. त्यांच्या अनेक आठवणी आहेत.


      आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे यांनी त्यांचे मूळ गाव बीबी ( आदर्की ता.फलटण जवळ) हे सोडून साखरवाडीत दुकानदारी सुरू केली. त्यांना चांगली धनप्राप्ती झाली. त्यातून दुकाने, शेतजमीन, घरे इत्यादी गोष्टी उभ्या राहिल्या.आमच्या बापूंच्या लहानपणी आठवड्यातून दर बुधवारी केस कापण्यासाठी म्हणून नाभिक आमच्या घरी येत असे आणि आजोबांसह सगळ्यांचे केस कापून गुळगुळीत टक्कल करीत असे. साधारणपणे बापूंनी त्यांच्या १६/१७ व्या वर्षी १९६४/६५ मध्ये दर आठवड्यात केस कापणार नाही असे सांगितले आणि तिथून स्वतः ते आणि अन्य भावंडे केस वाढवू लागले.
    
       बापूंना एसटीचे विलक्षण आकर्षण होते. त्यांना एस टी मध्ये नोकरी करायची होती. परंतु आजोबांच्या आग्रहामुळे त्यांनी दुकानदारी सुरू केली. पण एस टी चे आकर्षण कायम राहिले आणि फलटण एसटी आगार, तेथील व्यवस्थापक, चालक वाहक, अन्य कर्मचारी यांच्याशी त्यांचे सदैव चांगले संबंध राहिले.
      
       बापूंचा दुसरा विशेष गुण म्हणजे त्यांचा घड्याळाच्या वेळेबरहुकूम गोष्टी होण्याचा आग्रह असे. हातामध्ये असलेले घड्याळ अथवा घरामध्ये भिंतीवर असलेले घड्याळ यांच्याकडे त्यांचे सारखे लक्ष असे. वेळ सांगतादेखील ते काटेकोरपणे वेळ सांगत आणि त्या वेळा पाळल्या गेल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे.
        
         बापूंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा असणारा लोकसंपर्क. समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचा चांगला संपर्क होता. गावामध्ये, परिसरामध्ये कोणालाही अडचण असल्यास ते स्वतःहून मदतीला जात असत. त्यामुळे त्यांची अनेकांशी चांगली मैत्री होती. त्यांचे संपर्काचे माध्यम म्हणजे चहा. दिवसातून काही ठराविक वेळा साखरवाडी एसटी स्टॅंडवर असत तिथे कै. भीमाप्पा किंवा संगाप्पा यांच्या हॉटेलवर अगदी अर्धा अर्धा कप चहा, वेळ प्रसंगी भजी, फापडा इत्यादी गोष्टी अनेकांच्या सोबतीने चालत. या चहापानाचा माध्यमातून त्यांचा अनेकांशी संवाद असे. या संवादातून त्यांचे वेगवेगळे बेत ठरत असत.कधी एखाद्या सरकारी कामासाठी कोणालातरी भेटायला जाणे, एखाद्याच्या कौटुंबिक अडीअडचणी मध्ये त्याला मदतीला जाणे, कोणाच्या घरी असणाऱ्या सुखद अथवा दुःखद प्रसंगांमध्ये सहभागी होणे हे यातून आपसूक घडत असे. त्यांचा स्वभाव अगत्यशील असल्याने घरी अनेकांचे येणे जाणे असे.
       
       मोटरसायकलवरून प्रवास करण्याची पद्धत आणि आवड ही त्यांची आणखी एक आवडीची गोष्ट. विविध कारणांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी सहज फलटण, लोणंद, सातारा, वाई, पुणे अशा अनेक ठिकाणी ते मोटरसायकलवरून जात असत. सोबतीला अर्थातच मित्रांपैकी कोणीतरी असे. मोटारसायकलवर बऱ्याचदा त्यांचे मित्र मारुती रुपनवर हे बरोबर असायचे.
      
       त्यांचा वारकरी संप्रदायाशी असलेला घनिष्ट संबंध हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य . सातारा जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या अनेक कीर्तनकारांशी त्यांचा चांगला संबंध होता. त्यातून अनेक वेळा ही कीर्तनकार मंडळी साखरवाडीत आली की आमच्या घरी मुक्कामाला असत. दर वर्षी बापू नियमितपणे पंढरपूरला आणि आळंदीला दर्शनासाठी जात असत.पंढरपूरला आषाढात आणि कार्तिकात मुख्य वारीच्या आधी किंवा नंतर न चुकता जात.
     
          त्यांच्या अखेरच्या आजारपणातील घडामोडी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.२९-३० जानेवारी २००६ला शैलजाला घशाच्या संसर्गामुळे रूग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी आमची आई पुण्यात आली होती. त्याच दिवसात त्यांना अर्धांगवायूची पूर्वसूचना देणारा थोडा त्रास झाला. पण त्याचे गांभीर्य लक्षात न आल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ३ फेब्रुवारी २००६ ला पहाटे त्यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला.त्यांना साखरवाडीहून पुण्यात के. इ.एम. रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात आणले तेव्हा त्यांची शुध्द काही प्रमाणात होती. त्याही वेळी त्यांचे लक्ष हातात घड्याळ आहे असे समजून एकदा हाताकडे तर एकदा भिंतीवर घड्याळ आहे असे समजून भिंतीकडे जात होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि नंतर क्रमाक्रमाने त्यांची प्रकृती बिघडत गेली. मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांची शुद्ध हरपली आणि तातडीने कवटीवर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर अनेक दिवस अतिदक्षता विभागात, नंतर साधारण विभागात आणले गेले. शुध्द नसल्याने अन्नपाण्यासाठी नाकातून घातलेली नळी, सारखी सर्दी असल्याने ती बाहेर काढण्यासाठी केलेले टॅकेस्ट्रोमीचे ऑपरेशन आणि दिवसातून अनेकवेळा झालेले सक्शन यांचा त्यांना फार त्रास झाला. वेगवेगळी औषधे, उपचार या सगळ्याचा उपाय न होता दिनांक ६ मे २००६ ला सायंकाळी त्यांचे निधन झाले.

कै.बापूंचे पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक स्मरण...

Comments

  1. कै.शिवलिंग गाडे हे
    साखरवाडीच्या गुऱ्हाळ मालकांबरोबर नीरा येथील आमच्या पेढीवर येत असत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख