अन्नविचार

    २०१३ साली स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्यासंबंधी लिहिलेल्या आणि त्यांच्या व्याख्यानांच्या काही पुस्तकांचे वाचन केले. त्यात एक पुस्तक वेगळेपणाने लक्षात राहिले ते श्री.शंकर यांचे " अज्ञात विवेकानंद " हे पुस्तक. त्यात विवेकानंद बद्दल वेगवेगळी माहिती लिहिली आहे. त्यातील एक प्रसंग. एकदा विवेकानंदांनी गमतीने आपल्या शिष्यांना विचारले की जगात असा कोणता देश आहे जिथे साधू,  राजा आणि आचारी यांना एकच शब्द आहे. नंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिले की आपला भारतच तो देश आहे. ' महाराज ' या शब्दाने आपल्याकडे या तिघांनाही संबोधले जाते. याच पुस्तकात असा उल्लेख आहे की स्वामीजींच्या लहानपणी त्यांच्या घरी आणि बहुधा त्यांच्या परिचितांच्या घरी जेवताना पाणी उजव्या हाताने प्यायची पद्धत होती. स्वामीजींनी खटपट करून ही पद्धत बदलली. 


      गुणांचा सागर असलेल्या स्वामीजींना स्वतः स्वयंपाक करून आग्रहपूर्वक आपले गुरूबंधू आणि शिष्य यांना खाऊ घालायला आवडायचे. बेलूर येथील मठाचे बांधकाम चालू असताना स्वामीजींनी तिथे काम करणाऱ्या संथाळी मजूरांना एके दिवशी बोलावून आग्रह करकरून जेवायला वाढले. पक्वान्नांचे ते रूचकर जेवण करून सर्वजण अगदी तृप्त झाले. ' नरसेवा ही नारायणसेवा ' हा संदेश आचरणाऱ्या स्वामीजींनी उद्गार काढले " आज माझा नारायण माझ्याकडे जेवला ".
   
       स्वामीजींच्या एका व्याख्यानात त्यांनी अन्न दोष हा मुद्दा मांडला आहे. तो मांडताना त्यांनी अण्णा तीन प्रकारचे दोष असू शकतात असे म्हटले १) जातिदोष २) आश्रयदोष ३) निमित्तदोष

१) जातिदोष म्हणजे अन्नाचा किंवा अन्नपदार्थाचा स्वतःचा स्वाभाविक गुणधर्म. उदाहरणार्थ कांद्याचा वास लपू शकत नाही तसेच कारले हे कडूच असते. आपल्या मराठी भाषेत म्हणूनच आहे ना की कितीही तुपात कळलं किंवा साखरेत घोळले तरी कारलं हे कडू ते कडूच. यालाच जातिदोष असे म्हटले आहे. हा दोष मला समजला .
२) आश्रयदोष म्हणजे जी व्यक्ती स्वयंपाक बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असते तिच्या विचार आणि व्यक्तिमत्त्वाचा परिणाम त्या अन्नावरती होतो. ज्या वेळेला हे भाषण मी वाचले त्यावेळेला या मुद्द्याबद्दल मनात थोडी शंका होती.
३) निमित्तदोष म्हणजे अन्नात काडीकचरा केस इत्यादी पडतात आणि अन्न खराब होते. हा दोषदेखील समजला.
       पहिला आणि तिसरा हे दोष तर समजले पण दुसरा दोष काही समजला नाही. नंतर काही काळाने वेगवेगळ्या प्रसंगी दुसऱ्या दुसऱ्या बद्दल समजले आणि समाधान झाले. स्वामीजींचे भाषण मी वाचल्यानंतर काही दिवसांनी एका दैनिकात एका महिलेच्या आठवणी छापून आल्या होत्या. त्यात त्या महिलेने आपण आपल्या आजीकडून चांगला स्वयंपाक करायला कसे शिकलो याबद्दल लिहिले होते. त्यात तिने लिहिले होते की सर्व गोष्टी आजीने सांगितल्या प्रमाणे होऊन देखील करून देखील आजीच्या हाताची चव काही त्या स्वयंपाकाला आली नाही. तेव्हा तिने आपल्या आजीला विचारले की तिच्या स्वयंपाकाला आजीच्यासारखी चव का आली नाही. तेव्हा त्या आजीने उत्तर दिले की स्वयंपाक करताना मी पदार्थ सर्व जिन्साँग बरोबर थोडा माझा जीवदेखील घालते त्यामुळे ही चव येते. अर्थात आजीला असे म्हणायचे होते की मी मी स्वयंपाक करताना अतिशय आपुलकीच्या भावनेने स्वयंपाक करते आणि त्यामुळे पदार्थांना चव येते. हा अनुभव वाचल्यानंतर दुसरा दोष काहीसा समजला.

       हा लेख वाचनात आल्यानंतर काही वर्षांनी एका राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरातील व्याख्यानासाठी  गाडीतून जाताना गप्पांच्या ओघात हा विषय निघाला. तेव्हा गाडीचे चालक म्हणाले की पूजेसाठी केल्या जाणाऱ्या प्रसादाचे म्हणजे शिऱ्याचेच उदाहरण घ्या. तेच जिन्नस तसेच घेऊन परत शिरा केला तरी प्रसादाची चव त्यात येत नाही. आश्रयदोष थोडा अजून समजला.

    योगायोगाने वरील प्रसंग घडल्यानंतर काही महिन्यांनी माझ्या परिचयाच्या प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला जेवायला बोलावले होते. तेव्हा बोलताना विषय निघाल्यावर ते म्हणाले की त्यांचादेखील हाच अनुभव आहे. जेव्हा त्यांच्या हॉटेलातील आचारी प्रसन्नचित्त असेल तर पदार्थ अतिशय चांगले होतात पण जर काही कारणाने एखाद्या दिवशी आचारी घुश्शात असेल तर त्यादिवशीचे पदार्थ बिघडतात. आमचे बोलणे ऐकून आश्रयदोषाचा मुद्दा मला संपूर्णपणे स्पष्ट झाला.

    आश्रयदोषा बद्दल एक गोष्ट सांगितली जाते. एक अतिशय सज्जन माणूस होता. तो पापभीरू होता. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तो दूर राहत असे. एके दिवशी एका घरी भोजनाच्या आमंत्रणावरून तो गेला.  भोजन केल्यानंतर अचानक त्याला त्या घरातील एक मौल्यवान वस्तू चोरावीशी वाटली. तो चोरी करणारच होता पण त्याची सद्सदविवेकबुद्धी जागी झाली आणि त्याने चोरी करणाऱ्याचे टाळले. नंतर बारकाईने विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले की ज्याच्या घरी भोजन समारंभ होता त्याने वाईट मार्गाने पैसा मिळवला होता. त्या घरात शिजवलेल्या त्यामुळे आश्रयदोष निर्माण झाला आणि सज्जनाला चोरीची इच्छा झाली. 

    आपल्या देशात अन्नदानाचे अतिशय महत्व आहे. विविध प्रसंग निमित्ताने आप्तपरिचित यांना भोजन देण्याची, मंदिरांना अन्नदानासाठी निधी देण्याची पद्धत आहे. पूर्णब्रह्म असलेले हे अन्न शिजवताना, त्यात सहभागी होताना आपण अधिक आत्मीयतेने सहभागी होऊया आणि अन्नातील आश्रयदोष टाळूया.


सुधीर गाडे

Comments

  1. खूप महान व्यक्तिमत्व, स्वामी विवेकानंदाच्या संबंधात किती लिहावे आणि किती वाचावे याला काही मर्यादाच नाही. आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचेच म्हटले तर गेल्या दहा हजार वर्षात असा महान पुरुष झाला नाही आणि आगामी दहा हजार वर्षात होणार नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख