वाद हातघाईवर आल्यानंतर....
"सर, धनंजयने ( नाव बदलले आहे) मला गालावर चापट मारली." आमच्या वसतिगृहातील नीलिमा (नाव बदलले आहे) संतापाने सांगत होती. साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
आमच्या म.ए.सो.वसतिगृहातील मुले मुली तरूण वयातील असतात. तारूण्यामध्ये अंगात धमक असते. त्यामुळे 'अरे' ला 'कारे' करण्याची काही जणांची प्रवृत्ती देखील असते. मुलामुलींचे असे आपापसात वाद कधी कधी होत असतात. काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण सुरू होते आणि ते हातघाईवर पोचते. मग अशावेळी दिवसभरात किंवा कधीकधी रात्री-अपरात्री माहिती कळते, फोन येतो. अशावेळी दोन्ही बाजूंचे ऐकून घेणे समजावून सांगा आवश्यक ती कार्यवाही करणे या गोष्टी होतात.
सुरूवातीला सांगितलेल्या प्रसंगाच्यावेळी प्रा.र.वि.कुलकर्णी सर वसतिगृहप्रमुख होते. त्यांच्या वसतिगृहप्रमुखाच्या दीर्घ अनुभवानुसार चौकशी सुरू केली. मुलामुलींकडून बेजबाबदार वर्तन घडले की त्यांच्या स्थानिक पालकांना ताबडतोब बोलावण्याची पद्धत आहे. कारण वसतिगृहाच्या मुलामुलींचे आई-वडील पुणे शहरापासून लांब राहत असतात. धनंजयबाबत त्याचे नातेवाईक वा परिचित कोणी नसल्यामुळे त्याने त्याच्या विभागप्रमुखांचे नाव स्थानिक पालक म्हणून दिले होते. पण धनंजय महाविद्यालयात तुलनेने नवीन असल्याने विभागप्रमुखांनादेखील फार काही सांगता आले नाही. मग कुलकर्णी सरांनी शिस्तीच्या दृष्टीने आवश्यक असा निर्णय घेतला आणि कार्यवाही केली.
अजून एक प्रसंग लक्षात आहे. दरवर्षी वसतिगृह दिन म्हणजे 'होस्टेल डे' मुले मुली उत्साहाने साजरा करतात. त्यानिमित्ताने आनंद मेळ्याचे(फन फेअर) आयोजन केलेले असते. एके वर्षी हा आनंद मेळा संपल्यानंतर आवराआवरी करताना वसतिगृहातील जुन्या दोन मुलांनी एका नवीन मुलाला मारहाण केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुलकर्णी सरांनी चौकशी केली आणि त्या परिस्थितीत जी शक्य होती ती कार्यवाही केली.
असे अजून काही प्रसंग स्मरणात आहेत. तरूण मुला-मुलींच्या ऊर्जेला योग्य वाट करून देणे हे नेहमीच आव्हानात्मक आहे. हे करण्यासाठी विविध उपक्रम, संवाद याची मदत होत असते.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment