बदल स्वीकारले

    "सर, मला वाटते आपल्या वसतिगृहातील गणेशविसर्जनाची पद्धत आपण बदलली पाहिजे." महाविद्यालयाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षाला असलेला नीलेश मोडक त्या वेळचे वसतिगृहप्रमुख प्रा. र.वि. कुलकर्णी यांना सांगत होता. त्याच्या सुवाच्च अक्षरांमध्ये त्याने तसा अर्जदेखील लिहून आणला होता. साधारण २००८ मधील ही घटना आहे.

        वसतिगृहाच्या कामकाजाच्या पद्धती,उपक्रम सणवार हे आधीच्या अनुभवातून बऱ्यापैकी ठरलेले असतात. वसतिगृहातील विद्यार्थी हे अनेकवेळा नवनवीन विचार मांडत असतात. अशा नवनवीन विचारांची चर्चा करून त्यातील काही विचार कल्पना यांचा समावेश आम्ही म.ए.सो.च्या वसतिगृहाच्या उपक्रमांमध्ये करत गेलो आहोत. त्यापैकीच ही एक घटना.

       म.ए.सो.च्या वसतिगृहामध्ये दरवर्षी तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. पहिल्या दिवसाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वसतिगृहापर्यंत काढली जाते. अनेक वर्षे तिसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या बाजूलाच असलेल्या मुठा नदीमध्ये गणेश विसर्जनाची पद्धत होती. तीदेखील ढोल ताशा यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत काढण्याची पद्धत होती. परंतु त्यावर्षी नीलेश मोडक आणि त्याचे मित्र मैत्रिणी यांनी पुढाकार घेऊन ही पद्धत बदलण्याची सूचना केली. कुलकर्णी सरांनी चर्चा करून ही पद्धत स्वीकारली. वसतिगृहातील गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची असतेच. त्यावर्षी त्या मूर्तीचे विसर्जन पहिल्यांदाच वसतिगृहाच्या मनोरंजनगृहात एका पाण्याच्या बादलीत करण्यात आले. पुढच्या वर्षीपासून तळमजल्यावरील बागेत पाण्याची बादली ठेवून त्यात विसर्जन करण्याची पद्धत सुरू झाली ती अजूनही चालू आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी केलेली सूचना स्वीकारली गेली.

       अशीच एक सूचना वसतिगृहाची विद्यार्थिनी मधुरा ताथोडे ( आताची मधुरा ताथोडे औटी ) हिने केली. पूर्वी वसतिगृहातील मुलींकडे लक्ष देण्यासाठी सेविका नियुक्त करण्यात आली होती. परंतु त्या सेविकेच्या निवृत्तीनंतर अनेक वर्षे अशी वेगळी सेविका नव्हती. मधुरा हिने सूचना केल्यानंतर त्या वेळचे वसतिगहप्रमुख डॉ.एन.एस.उमराणी सर यांच्याशी चर्चा करून, नंतर वसतिगृहाच्या व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने वसतिगृहासाठी मेट्रन ही व्यवस्था प्रत्यक्षात आली. मुलींकडे लक्ष देण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो. गेल्या पाच सहा वर्षांपासून ही व्यवस्था चांगली रुळली आहे.

      व्यवस्थापनाच्या दृष्टीने नवीन सूचना पुढे येणे त्यांचा विचार होणे आणि काही सूचना प्रत्यक्षात येणे हा एक चांगला पायंडा म.ए.सो. वसतिगृहात आहे.


सुधीर गाडे, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख