कार्यक्रमांतून प्रशिक्षण

            म.ए.सो.वसतिगृहाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी जेव्हा भेटतात तेव्हा ते ज्या गोष्टींची आठवणीने चौकशी करतात त्यामध्ये चौकशी असते ती वसतिगृहातील कार्यक्रमांची!

       वसतिगृहात गुरूपौर्णिमा, रक्षाबंधन, शिक्षकदिन, गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा, वसतिगृह दिनाच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन , शिवजयंती असे अनेक कार्यक्रम होत असतात. या सर्व कार्यक्रमांची तयारी, कार्यक्रम पार पाडणे या बहुतेक सगळ्या गोष्टी मुलेमुलीच करत असतात.

         ही तयारी करताना मुलेमुली अनेक गोष्टी नकळत सहजपणे शिकत असतात. यामध्ये कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे, एकमेकांची ओळख होते, परस्परांना सहकार्य करणे, छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर त्यावर उपाय शोधून काढणे, संघभावना निर्माण होणे, नेतृत्वगुण विकसित होणे, संवादकौशल्य वाढणे यासारख्या गोष्टी होतात.

           गणेशोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा, प्रश्नमंजूषा, अंताक्षरी, गायन स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा, विविध गुणदर्शन कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम असतात. साधारणपणे याच स्पर्धा वसतिगृह दिनाच्या निमित्ताने होतात. त्यात भर पडते ती खोली सजावट आणि मजला सजावट स्पर्धेची. पण गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की यानिमित्ताने ज्या मुला-मुलींचे वसतिगृहातील पहिलेच वर्ष आहे त्यांना यानिमित्ताने एकमेकांची, जुन्या मुलामुलींची ओळख होते आणि एक आपलेपणाचा अनुभव येऊ लागतो. घरची वारंवार आठवण होऊन येणारा अस्वस्थपणा कमी होऊन ते रुळू लागतात. 

       या स्पर्धांच्या निमित्ताने मुला-मुलींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करायला मिळते. बाकीच्यांकडूनही कळत नकळत काही शिकायला मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. व्यक्तिमत्व हळूहळू फुलू लागते. 

     शिकत असताना या सर्वांची फारशी जाणीव बहुधा विद्यार्थीविद्यार्थिनींना होत नाही. पण ज्यावेळी ते आपल्या व्यावसायिक आयुष्याला सुरूवात करतात त्यावेळी त्यांना याचे महत्त्व समजते.

          या सगळ्यात काही गमतीदेखील घडतात. एकदा कार्यक्रमासाठी आलेल्या वक्त्यांनी पाणी पिण्यासाठी समोरच्या तांब्यावरील भांडे उचलले पण तांब्या रिकामा! मग धावपळ करून त्यांना पाणी आणून दिले गेले. तेव्हापासून सूचना देताना मी 'पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या आणि भांडे' असे सांगायला सुरूवात केली.

           एकदा गंभीर प्रसंग घडला. व्यासपीठावरील विजेच्या एक्स्टेंशन बॉक्सला हात लागून मिहिर तपस्वी हा गुणी विद्यार्थी विजेचा धक्का लागून खाली पडला. सौ.शैलजाने जवळ जाऊन त्याची चौकशी केली. पण मला त्यावेळी त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. त्याची खंत अजूनही वाटते. पण दैव चांगले की मिहिरला गंभीर इजा झाली नाही.

    या कार्यक्रमांच्या, स्पर्धांच्या मुळे मुला-मुलींच्या ऊर्जेला वाव मिळतो. विधायक कामात शक्ती खर्च होते. युवकांच्या उत्साहाने आम्हालाही आनंद मिळतो.


सुधीर गाडे,  पुणे


Comments

  1. Very true...enjoyed a lot of program in 5 yrs stay in hostel.

    ReplyDelete
  2. नक्कीच सर... वसतिगृहातील विविध कला, स्पर्धा, गणेशोत्सव आठवडा याचा व्यक्तिशः माझ्या व एकंदरित आम्हा सर्वांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे..🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख