कै.आबा कुलकर्णी यांचे पुण्यस्मरण
"सुधीर, चहा प्यायला जाऊया." मी साताऱ्यात शिकायला असताना अवचित आबाची हाक यायची. आणि मग चहाच्या निमित्ताने गप्पागोष्टी व्हायच्या. जाड भिंगाचा चष्मा, मोठ्याने बोलायची सवय, खांद्यावर थाप टाकून बोलणे ही त्याची वैशिष्ट्ये.
साखरवाडी (ता.फलटण) या गावचा मी मूळचा स्वयंसेवक. शिक्षणाच्या निमित्ताने १९९० ते १९९४ ही चार वर्षे साताऱ्यात राहत होतो.याच दरम्यान माझा कै. विनायक शंकर कुलकर्णी म्हणजेच आबा यांचा परिचय झाला आणि बघता बघता या परिचयाचे दृढ संबंधांमध्ये रूपांतर झाले. या लेखाच्या निमित्ताने विचार करू लागलो की खरंच याचं काय बरं कारण असेल? इतक्या वर्षांनंतर पुन्हा विचार करताना असं वाटतं की माझ्यासारख्या बाहेरगावहून आलेल्या स्वयंसेवकाला आबांनी लावलेला जिव्हाळा वयाचं अंतर बाजूला सारून मी आणि माझे महाविद्यालयातील मित्र यांच्याशी केलेली मैत्री हीच त्याची प्रमुख कारणे असावीत. आबा आणि मी किंवा आबा आणि आम्ही मित्र यांच्या बाबत आठवू लागलो आणि अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
आम्ही शिकत असताना सातारा शहरातील महाविद्यालयीन तरूणांची सहल वासोटा किल्ल्यावर काढली होती. या सहलीमध्ये आम्हा सर्वांचीच आबाशी चांगली जवळीक झाली. आबाचं गमतीदार बोलणं , बरोबरीच्या नात्याने सर्वांशी वागणं, आमच्यापैकी काही जणांच्या संघकामाविषयी असणाऱ्या शंकांचं समाधान करण्यासाठी त्यांच्याबरोबर केलेली मनमोकळी चर्चा , सहलीतील वेगवेगळे कार्यक्रम या सगळ्यामुळे ही सहल अतिशय संस्मरणीय अशी झाली. आमची अशीच एक सायकल सहल सातारा जिल्ह्यातील औंध येथे काढली होती. तेव्हा आबासुद्धा आमच्या बरोबर सायकल चालवत औंध पर्यंत आला होता. या सहलीच्या वेळी आमच्यापैकी एक दोघांना सायकल चालवण्याचा अजिबात सराव नव्हता. त्यांच्यासह टप्प्याटप्प्यांनी आम्ही सर्व औंधला पोचलो. तेथील मंदिरामध्ये दर्शन, तलावामध्ये पोहणे ,तुडुंब जेवण असं सगळं झाल्यावर आता सगळ्यांना परत सायकल चालवत जाणं शक्य नाही असं ओळखून सायकली मेटॅडोर मध्ये टाकून आबाच आम्हाला परत घेऊन आला.
आबाची व्यक्तिशः माझ्याशी खूपच जवळीक होती. मी तेव्हा आबाच्या घराजवळच खोली घेऊन राहत होतो व संघ कार्यालयाच्या मैदानावरील सेनापती सायम् शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून काम करत होतो. अनेक वेळा मला चहा पाजण्यासाठी म्हणून आबा माझ्याकडे येत असे. त्यानिमित्ताने अनेक विषयांवर गप्पा गोष्टी होत असत. अनेक वेळा मी आबाच्या घरी जात असे. काही वेळा त्यांच्याकडे जेवण नाही करत असे. या जवळीकीमधून मला आबाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू कळाले. त्याच्या कुटुंबियांची विशेषतः आईची रूढी-परंपरांवर असलेली भिस्त, आबाची संघ कामावर असलेली दृढ श्रद्धा, श्री.दादा इदाते कराडला फार्मसीच्या शिक्षणासाठी राहिले असताना त्यांच्याशी झालेली आबाची जवळीक , यातून आबाने जाणीवपूर्वक घेतलेला आंतरजातीय विवाहाचा निर्णय, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी कुटुंबियांचे परिश्रमपूर्वक केलेले मनपरिवर्तन , प्रत्यक्ष विवाह, मी समाजाचेच काम केले म्हणून विवाहाच्या निमित्ताने असलेले सरकारी अनुदान नाकारणे, विवाहानंतर वहिनींनी दिलेली समजूतदार साथ, तो ज्या वीज महामंडळामध्ये नोकरी करत होता तिथे निश्चयपूर्वक भ्रष्टाचारापासून राखलेले अंतर,स्वत:च्या घरासाठी लाच न देता परवानग्या मिळवण्याचा निर्णय, त्यासाठी घालवलेला प्रचंड वेळ, त्याचे ज्ञानेश्वरीचे पारायण व निरूपण अशा अनेक बाबी मला आमच्या जवळीकीमधून कळाल्या. तसेच या जवळीक इथूनच आबाचे माझ्या कुटुंबीयांची चांगले संबंध निर्माण झाले. या संबंधांच्या आधारावरच त्याने काही वेळा माझ्या ज्या चुका झाल्या त्या प्रेमाने समजावून सांगितल्या.
आबाची संघ काम करण्याची शैलीसुद्धा याच काळात जवळून अनुभवायला मिळाली. संघ कामासाठी सदैव असणारा उत्साह, कार्यकर्त्यांची संच बांधणी व्हावी यासाठी असणारे त्याचे डोळस प्रयत्न, काही कारणांनी संघकामापासून दूर गेलेल्या तरुण कार्यकर्त्यांना पुन्हा संघ कामात बसवण्यासाठी त्याने केलेली धडपड, १९९३ च्या संघबंदीच्या काळात केलेले वेगवेगळे उपक्रम( यामध्येच सातारा नगर वाचनालयात माझं भाषण ठरवलं होतं), आम्हा तरुणांना उत्साह मिळावा म्हणून केलेले प्रयोग( अचानक निरोप देऊन संघ कार्यालयात रात्री साडेदहा अकरा वाजता जमून सज्जनगडापर्यंत पायी चालत जाणे, पहाटे तिथून परत येणे) , अनेक कार्यकर्त्यांच्या घरी आम्हाला स्वतःहून सांगून जेवायला जाण्यास लावणे,आम्हाला संघ कामाची स्पष्टता अधिक अधिक यावी यासाठी केलेले उपक्रम (श्री. दादा इदाते ,श्री.गिरीश प्रभुणे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सहवास व गप्पागोष्टी) १९९३मध्ये साताऱ्यामध्ये झालेल्या संघाच्या प्रांतिक बैठकीच्या व्यवस्थेसाठी केलेले तपशीलवार नियोजन ,त्याची योग्य अंमलबजावणी अशा अनेक गोष्टी माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या आहेत. तसेच या सगळ्या कामांमध्ये असलेला विनयावहिनींचा मनापासूनचा सहभाग विसरता येणे शक्यच नाही. या सगळ्यामुळे माझ्या विचारांमध्ये अधिकाधिक स्पष्टता आली.
संघ कामासाठी सदैव धडपडत राहणाऱ्या आबाच्या आयुष्याची दुर्दैवी अखेर मात्र मनाला चटका लावून गेली. विनया वहिनी बाहेरगावी गेल्या असताना स्वत:च्या औषधांकडे दुर्लक्ष केल्याने आबाचा घात झाला. त्याला पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेथे कोमामध्ये असलेल्या आबाला मी जवळपास एक दीड वर्षाच्या अंतराने बघितले तेव्हा मी त्याला ओळखूच शकलो नाही. त्याला भेटून आल्यानंतर पुण्यातील कार्यकर्त्याच्या घरी ( कै. रवींद्र महाबळेश्वरकर) जाऊन मी बांध फुटून रडलो.१२ डिसेंबर १९९६ ला आबाचे निधन झाले. आबाच्या मृत्यूनंतर मी भास्कर वाळिंबे, सचिन उपाध्ये, पंकज बढे, प्रशांत डोंगरे पुण्याहून साताऱ्याला गेलो. तिथे अंत्यसंस्काराच्यावेळी आमचा सर्वांचाच शोक अनावर झाला. मोठा भाऊ गेल्याचे दुःख आम्हाला झाले.
कै. आबाला विनम्र श्रद्धांजली!
स्मृतींना आदरांजली 🙏
ReplyDelete🙏🙏
Deleteआबा ही लहान स्वयंसेवकांमध्ये अतिशय प्रिय असा होता. मला आठवते आणीबाणी संपल्यानंतर कराडला भवानी सायं शाखा सुरु झाली. त्या शाखेवर आबा येत असे. काय जवळीक होती ते माहिती नाही. पण अक्षरशः आम्ही सर्व मुले आबाच्या अंगाखाद्यावर नाचत असू. आणि त्याचा आनंदाने उजळलेला चेहेरा अजूनही लक्षात आहे.
ReplyDeleteवेगवेगळे कार्यक्रम करणे हे आबाचे वैशिष्ट्य. असेच संघ कार्यालयावर हल्ला झाला आहे असा निरोप पाठवून केलेले स्वयंसेवकांचे एकत्रीकरण, १००० बालांचा रक्षाबंधन कार्यक्रम, रात्री बैठक संपल्यावर जवळपास दोन किमी जाऊन हायवे वर चहा प्यायला जाणे, इत्यादी वेळी आबाला कशाचाही कधी कंटाळा नव्हताच. कै आबाच्या शेवटच्या दिवसात मी आणि मिलिंद परांजपे सावली सारखे होतो. तो परत यावा असे खूप वाटे पण ईश्वरच्छे पुढे इलाज नाही हे खरे. कै आबाला विनम्र श्रद्धांजली
🙏🙏
Deleteरामजन्मभूमी शिला पूजनवेळी भवानी सायं च्या मैदानावर १०० जणांच्या (जोडप्यांच्या?) हस्ते शिलापूजन झाले होते, त्यात आबाची भूमिका प्रमुख होती
ReplyDeleteबरं. मला माहित नव्हते.
Delete👌👌🙏🙏
ReplyDelete🙏🙏
Delete