शिवरायांचे सलगी देणे कैसे असे

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विलक्षण आहे.अनेक वेगवेगळे पैलू त्यांच्या जीवनात दिसतात. त्यात त्यांनी जोडलेली माणसे आणि त्यांना दिलेले हिंदवी स्वराज्याची प्रेरणा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर असलेले अनेक जण त्यांनी स्वराज्याच्या कामात जोडून घेतले हे तर आहेच. शिवरायांशी शत्रुत्व करणाऱ्याकडची माणसे त्यांनी पारखून स्वराज्याच्या कामात जोडली हा एक वेगळा महत्वाचा पैलू आहे.
समोपाचाराचे सर्व प्रयत्न संपल्यावर जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यावर हल्ला चढवला. त्या लढाईत त्वेषाने लढणारे मुरारबाजी देशपांडे महाराजांच्या पारखी नजरेने लगेच हेरले. त्या लढाईत जय मिळवल्यानंतर महाराजांनी मुरारबाजी यांना स्वराज्याच्या कामात सहभागी होण्याची साद घातली. मुरारबाजी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते स्वराज्याच्या कामी रुजू झाले. १६६५ मध्ये त्यांनी गाजवलेला पराक्रम इतिहासात नोंदवला गेला आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर असलेल्या त्यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरचा आवेश पाहण्यासारखा आहे. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन कवीने केले आहे.
मातेच्या स्वातंत्र्यास्तव धडही लढते संग्रामात
किंवा
मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर हृदयाची
असेच दुसरे उदाहरण आहे ते बाजीप्रभू देशपांडे यांचे. भोरजवळची वतनं असणारे जेधे आणि बांदल हे परस्परांचे त्याकाळात पिढीजात वैरी होते. त्यापैकी कान्होजी जेधे हे शहाजी राजे यांच्या आज्ञेने शिवरायांच्या मदतीला आले. सिंध गावचे रहिवासी असलेले बाजीप्रभू बांदलांच्या सेवेत होते. एका लढाईत त्यांचा पराक्रम महाराजांनी हेरला आणि त्यांना स्वराज्याच्या कामात जोडून घेतले. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून महाराज विशाळगडाकडे निघाले तेंव्हा बाजीप्रभू यांनी
"तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला "
असा महाराजांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला.त्यांच्या पावन रक्ताने घोडखिंड ही पावनखिंड झाली. त्यानंतरचा प्रसंग महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराज त्यानंतर स्वतः बाजीप्रभू यांच्या गावी गेले. वेशीवर पायउतार होऊन चालत त्यांच्या घरी गेले. कुटुंबियांचे स्वतः सांत्वन केले. घरच्या वारसाला सेवेत रुजू करून घेतले. बाजीप्रभू यांच्या घरी दरमहा निश्चित रक्कम पोचेल अशी व्यवस्था केले. हेच ते "शिवरायांचे सलगी देणे". असं केवळ बाजीप्रभू यांच्याच बाबतीत केवळ नाही तर स्वराज्याच्या कामी बलिदान पावलेल्या प्रत्येक व्यक्तिची महाराजांनी काळजी घेतली.


               ( बाजीप्रभू देशपांडे )
यात अजून एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मुरारबाजी, बाजीप्रभू यांनी महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला यात त्यांचही मोठेपण दिसून येतं. अन्यथा महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद न देणारी चंद्रराव मोरे यांच्यासारखी उदाहरणेही शिवचरित्रात दिसतात.
शत्रूच्या गुणी माणसांना स्वराज्याच्या कामात जोडून घेणे , त्यांच्या बलिदानानंतर कुटुंबियांची काळजी घेणाऱ्या महाराजांच्या या वैशिष्ट्याचे वर्णन समर्थ रामदासांनी योग्य शब्दात केले आहे.
" शिवरायांची सलगी देणे कैसे असे"

( छायाचित्र सौजन्य इंटरनेट)
सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख