रवींद्रनाथ : विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत
२०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष जवळपास ऑनलाइन अभ्यास करण्यातच गेले. फार थोडा काळ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन शिकता आलं. परंतु समाज म्हणून आपण नाइलाजाने या सर्व परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. अजून किती काळ ही परिस्थिती राहील ह्याबाबत अनिश्चितता आहे. पण आपण सर्वजण धीराने, निश्चयाने यापुढेही काम करत राहूया.
माणसासाठी शिक्षण ही कायमच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी शिकणं आणि शिकवणं हे नेहमी चालू ठेवणं आवश्यक आहे. यासाठी भारतातल्या अनेक महान व्यक्तिंनी शिक्षणाबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. या व्यक्तिंपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे रवींद्रनाथ ठाकूर होय. भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिले नोबेेल पारितोषिक विजेते म्हणून ते आपल्याला माहिती आहेत. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी शिक्षणतज्ञ हा एक पैलू आहे. विद्यार्थ्यांकडे कोणते गुण असावेत याबाबत त्यांनी अनेक मुद्दे सांगितले आहे. त्यापैकी आपण काही मुद्दे पाहूया.
रवींद्रनाथांनी निसर्गाला "ईश्वराची संहिता "(manuscript of God) म्हटलं आहे. निसर्गाशी जवळीक साधत शिक्षण व्हावं असा त्यांचा आग्रह आहे. विद्यार्थ्यांना कुतूहलाने निसर्गाचं निरीक्षण करावे, त्यातून माहिती मिळवावी, ज्ञान घ्यावं त्याचबरोबर इतिहास परंपरा याची माहिती मिळवावी असे ते सांगतात. मित्रांनो आपण त्यांचं हे सांगणं लक्षात घेऊन चौकस वृत्तीने निरीक्षण करत निसर्गाकडून शिकण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे.
रवींद्रनाथांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच कौशल्य शिक्षण, गुणांची जोपासना करावी यावर आग्रहपूर्वक भर दिला आहे. त्यामुळे शिकत असताना तुम्ही शिकतानाच कोणतंतरी एक हस्तकौशल्य शिकण्याची खटपट करायला हवी. तसेच एखाद्या कलेचं शिक्षण घ्यायचा प्रयत्न करत रहायला हवं. यासाठी मदत करायला शाळा सदैव तयार आहेच. पण तुम्हीदेखील त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
विद्यार्थ्यांकडून अजून एक महत्त्वाची अपेक्षा रवींद्रनाथांनी व्यक्त केली आहे. शिकत असताना विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळावी असं ते सांगतात. शिस्त ही प्रगतीसाठी आवश्यक असते हे तर तुम्हाला माहिती आहे पण ही शिस्त जर स्वतःहून स्वीकारली तर ती जास्त प्रभावी ठरते हा सगळीकडेच येणारा अनुभव आहे. त्यामुळे ही स्वयंशिस्त पाळण्याचा तुम्ही मनापासून निर्धार केला पाहिजे.शाळा शिक्षक तुमच्यावर जो विश्वास टाकतात तो योग्य ठरावा यासाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
'शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट विश्वातील सर्व अस्तित्वाशी आयुष्य सुसंवादी बनवणं' हे असले पाहिजे असं रवींद्रनाथ म्हणतात. ही विश्वबंधुत्वाची कल्पना आहे. ही कल्पना मनात ठेवत विद्यार्थ्यांनी भारताची परंपरा समजावून घेऊन त्याप्रमाणे देशप्रेम हे अंगात भिनवलं पाहिजे.
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच रवींद्रनाथांनी भारत समर्थ व्हावा हे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहूया. हे उद्दिष्ट रवींद्रनाथांनी त्यांच्या कवितेत पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहे. ती आपल्याला मार्गदर्शक आहे.
ध्येय रूढींना नाही थारा जेथे, विचारी अखंड निर्मलताा
मुक्त अशा स्वर्गातच होवो, मम जागृत देश आता
प्रेरणेनेे तव साध्य जेथे, नवोन्मेषाची व्यापकता
मुक्त अशा स्वर्गातच होवो, प्रभु रे, मम जागृत देश आता
सुधीर गाडे, पुणे
रवींद्रनाथ टागोर व इतर अनेक शिक्षण तज्ञांनी सुचवलेली आदर्श शिक्षण पद्धती न अंगीकारता ब्रिटिशांनी रुढ केलेल्या शिक्षण पद्धतीवर आपण वाटचाल करत आहोत त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया. चीन यांच्या सारखी प्रगती आपण करू शकलो नाही.
ReplyDeleteहोय खरं आहे.
Deleteहोय खरं आहे.
Delete