धुळे जिल्ह्यातील अनुभव
दरवर्षी प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांची एकत्रित बैठक होत असते. या बैठकीमध्ये प्रचारकांची पुढील वर्षासाठी विविध ठिकाणी नियुक्ती होत असते. अशीच बैठक १९९९ सालच्या जून महिन्यात धुळे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. या बैठकीमध्ये माझी धुळे जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. १९९९ ते २००१ या दोन वर्षांमध्ये मला धुळे जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. या काळात विविध प्रकारचे प्रसंग अनुभवायला मिळाले. त्यापैकी काही प्रसंग या लेखाद्वारे मांडत आहे.
१९९९ मध्ये हिवाळी शिबिर दोंडाईचा येथे घेण्याचे ठरले. दोंडाईचा येथील एका महाविद्यालयात हे शिबिर सुरू झाले. अपेक्षित संख्येच्या जवळजवळ दुप्पट बाल स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले. परंतु पुरेशा प्रमाणात गण शिक्षक मात्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे आलेल्या मर्यादित तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने नियोजन करावे लागले. शिबिरात सहभागी झालेल्या बाल स्वयंसेवकांनी पैकी बरेचजण पहिल्यांदाच संघाच्या शिबिरात सहभागी होत होते. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी चे दुपारचे भोजन सुरू झाले आणि थोड्या वेळाने भोजन मंडपामधून सगळीकडून पापडी पापडी अशी बालांची ओरड ऐकू येऊ लागली. ( धुळे जिल्ह्यात पुरीला पापडी असे म्हणतात.) भोजनासाठी पुरी भाजीचा बेत केला होता. पूर्ण दुप्पट असणारी संख्या आणि नवीन स्वयंसेवकांना वाडपा संबंधीच्या सूचना व्यवस्थित लक्षात आल्या नाहीत. त्यामुळे वाढप योग्य पद्धतीने होत नव्हते. म्हणूनच हा पापडी पापडी असा गलका ऐकू येऊन लगला होता. मग काही वेळ वाढ थांबवून सर्वांना पुन्हा एकदा सूचना देऊन सर्व स्थिती आटोक्यात आणली. शिबिराच्या उरलेल्या कालावधीमध्ये पुन्हा असा प्रसंग उद्भवू दिला नाही. याच शिबिरामध्ये एकदा ध्वजारोहणाचा सराव चालू असताना ध्वज पंचवीस फुटी स्तंभावर अडकून बसला. प्रयत्न करूनही तो सहजासहजी निघेना. तिथेच उभा असणारा एक बाल स्वयंसेवक पुढे आला तो सरसर त्या ध्वजस्तंभावर चढला व त्याने अडकलेला ध्वज सोडवला. सर्वांनी त्याचे कौतुक केले. शिबिरानंतर त्याच्या गावी त्याच्या घरी जाऊन मी पुन्हा एकदा त्याचे कौतुक केले.
याच वर्षी विजयपूर (प्रचलित नाव निजामपूर) तालुक्यासाठी श्री वीरेंद्र पाटील यांची प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. सुरुवातीचे तीन महिने त्यांचा निवास विजयपूर येथेच होता. या काळात एकदा जिल्ह्याचे पोलीस आयुक्त विजयपूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी वीरेंद्र याला अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार कळल्याबरोबर मी तातडीने त्याची भेट घेतली आणि त्याला धीर दिला. नंतर विभाग प्रचारक श्री. रवीजी किरकोळे आणि अन्य जिल्हा कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पोलिस आयुक्तांची भेट घेण्याचे नक्की केले. जिल्हा संघचालक मा. आप्पासाहेब हजीरनीस, श्री. बाबा मोराणकर, श्री. केशवराव नांदेडकर, जिल्हा कार्यवाह श्री. ललितदादा पाठक, श्री. नानाभाऊ जोशी, श्री. रवीजी किरकोळे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित स्वयंसेवकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये पुन्हा असा प्रकार घडणार नाही असे आश्वासन पोलिस आयुक्तांकडून मिळाले. तसेच झालेला प्रकार गैरसमजातून घडल्याचे निष्पन्न झाले.
सन २००० मध्ये संघाने देशभर 'राष्ट्रजागरण अभियान' करण्याचे ठरवले. या काळात धुळे जिल्ह्यात शाखांची संख्या समाधानकारक नव्हती. तरीही जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाच्या निमित्ताने संपर्क करण्याचे ठरवले. श्री रवीजी किरकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा कार्यकर्त्यांच्या मदतीने या अभियानाची तपशीलवार योजना आखण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सर्व मंडलांमधील गावे व वस्त्या याठिकाणी संपर्क करण्याची जबाबदारी असणारे कार्यकर्ते यांची यादी बनवण्यात आली. प्रत्यक्ष अभियानापूर्वी विविध स्तरावर बैठका, अभ्यासवर्ग यांचे आयोजन करण्यात आले आणि ही योजना सर्वांपर्यंत पोचवण्यात आली. महाविद्यालयीन तरूणांपासून ते ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक कार्यकर्ते या अभियानामध्ये उत्साहाने सहभागी झाले. आनंदाची गोष्ट अशी की हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी गावे, पाडे वगळता सर्व ठिकाणी हे अभियान करण्यात आले. या अभियानाच्या निमित्ताने मला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरील माणसांशी संपर्क करण्याची, संवाद साधण्याची संधी मिळाली वेगवेगळे अनुभव मिळाले त्यापैकीच हे काही अनुभव.
धुळे शहरातील वैभव पुरोहित आणि अन्य काही तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी शिरपूर तालुक्यामधील काही गावांमध्ये अभियान करण्यासाठी गेलो होतो. एका गावामध्ये गावातील लोकांना तिथल्या श्रीराम मंदिरामध्ये एकत्रित करून सर्वांना पुढील हिंदुत्व विचार मांडला. काही प्रश्नोत्तरेदेखील झाली. तिथून परतत असताना गावच्या वेशीवर काही तरुणांनी आम्हाला अडवले व चर्चा करायची आहे असे म्हटले. रात्र झाली होती पण एकूण रागरंग बघून थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता. तिथेच आम्ही चर्चेसाठी बसलो. तेव्हा ते तरूण म्हणाले, " आजही आम्हाला गावच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळे बंधू बंधू असे आम्ही कसे समजायचे?". यावर संघ कार्याच्या विस्तारा मुळेच या सर्व परिस्थितीमध्ये बदल होईल असा विचार त्यांच्यासमोर मी मांडला. या प्रसंगामुळे संघकार्य विस्ताराची गरज माझ्या मनात पुन्हा एकदा ठसली.
याच अभियानादरम्यान काही तरुण कार्यकर्त्यांबरोबर साक्री तालुक्यामधील काही गावांमध्ये प्रवास झाला. या प्रवासामध्ये एका गावी वृद्ध गृहस्थांची भेट झाली. त्यांचा एक पाय खूप सुजलेला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायात काटा घुसला होता. तो सहजासहजी बाहेर निघाला नाही. त्यामुळे तो काटा साक्रीला जाऊन डॉक्टरांकडून काढून घ्यावा लागणार होता. पण त्यासाठी पुरेसे पैसे जवळ नसल्याने ते करता आले नाही. परिणामी पाय खूप सुजला. या प्रसंगी झालेल्या गरिबीच्या दर्शनाने मन हेलावून गेले.
राष्ट्र जागरण अभियानाच्या वेळी धुळे शहरातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक कै. अण्णा पालवे यांची मुलगी साक्री तालुक्यातील एका वनवासी गावात राहत होती. म्हणून त्यांना ते वनवासी गाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संपर्क करण्याची जबाबदारी नकाशा बघून मी दिली. राष्ट्रजागरण अभियान संपल्यानंतर एकेदिवशी मी त्यांना भेटायला गेलो. भेटल्यावर अण्णांनी सांगितले की नकाशावर या गावांना जाण्याचा रस्ता दिसतो. परंतु डोंगराळ भागात असल्याने वाहतुकीची साधने नव्हती. त्यामुळे पायी चालत जाऊन या गावांमध्ये त्यांनी संपर्क केला आणि अभियान पूर्ण केले. कोणतीही अडचण न सांगता दिलेले काम पूर्ण करण्याची स्वयंसेवकाची वृत्ती त्यांच्या ठायी मला दिसून आली.
राष्ट्र जागरण अभियानाची यशस्वी रीतीने सांगता झाली. या दरम्यान वेगवेगळ्या गावांमध्ये नवनवीन तरूण ् संपर्कात आले. या तरुणांना संघ कार्याशी जोडण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी संघ परिचय वर्ग आयोजित केले. या वर्गांना ही चांगला प्रतिसाद मिळाला.
धुळे जिल्ह्यामध्ये काम करताना तिथल्या 'अहिराणी' भाषेशी परिचय झाला. काही दिवसानंतर मी प्रयत्नपूर्वक अहिराणी भाषेमध्ये थोडेफार बोलू लागलो. जेव्हा जेव्हा मी अहिराणी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तिथल्या स्वयंसेवकांना आनंद होत असे. या अहिराणी प्रेमातूनच पुढे विषय आला तो बौद्धिक वर्ग अहिराणी भाषेतून देण्याचा. २००१ मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा एकत्रित प्राथमिक वर्ग तळोदा येथे घेण्याचे ठरले. तेव्हा या प्राथमिक वर्गामध्ये एक तरी बौद्धिक वर्ग अहिराणी भाषेमध्ये व्हावा असा विषय मी मांडला. सर्वांचा त्याला होकार मिळाला. त्यावेळचे विभाग कार्यवाह श्री बाळासाहेब चौधरी यांनी अहिराणी भाषेतून बौद्धिक दिले. वर्गातील सहभागी स्वयंसेवकांना हा प्रयत्न विशेष भावला.
२००१ मध्ये संघ शिक्षा वर्गाच्या कालावधीत सर्व प्रचारकांनी वर्गात सहभागी न होता काही प्रचारकांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून शाखा सुरळीत चालू राहतील असा प्रयत्न करावा असे ठरवण्यात आले. मलाही धुळे जिल्ह्यात राहून काम करण्यास सांगितले गेले. या काळात ठीक ठिकाणी निवासी वर्ग सहली इत्यादी उपक्रमांची योजना करण्यात आली. यापैकी एक निवासी वर्ग शिंदखेड्याजवळील पाटण गावच्या देवीच्या मंदिरात ठरवला होता. या वर्गाला त्यावेळचे प्रांताचे सहसेवाप्रमुख श्री. गिरीशराव कुबेर यांनी भेट दिली. शिंदखेड्यामधून त्यांना वर्गाच्या ठिकाणी आणण्यासाठी मोटरसायकलची व्यवस्था केली होती. पण मोटर सायकल घेऊन येणाऱ्या स्वयंसेवकाला उशीर होतो आहे असे लक्षात येताच गिरीशरावांनी उपलब्ध असलेली सायकल घेतली व ते सायकल चालवत वर्गाच्या ठिकाणी पोचले. वेळ पाळण्याचा हा आग्रह मनावर ठसा उमटवून गेला.
माझ्या धुळे शहरातील वास्तव्याच्या काळात बाजीप्रभू प्रभात ही व्यावसायिक तरुणांची शाखा चांगल्या पद्धतीने चालत होती. याच शाखेच्या माध्यमातून नंतर मा.जिल्हा सहसंचालक झालेले कै. पुंडलिकराव सूर्यवंशी, श्री परमानंदजी राठोड यांच्यासारखे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने रूळले याचा विशेष आनंद वाटतो.
धुळे जिल्ह्यातील वनवासी क्षेत्रामध्ये क्रिश्चन मिशनऱ्यांचे धर्मांतराचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. या पार्श्वभूमीवर वनवासी बांधवांमध्ये जागृती व्हावी व आपल्या धर्मावर ची श्रद्धा बळकट व्हावी या हेतूने धुळे जिल्ह्यातील रोहिणी, ता. शिरपूर येथे डिसेंबर १९९९ मध्ये विशाल हिंदू संमेलन आयोजित करण्याचे ठरले. अशा प्रकारचे संमेलन धुळे जिल्ह्यात प्रथमच होत होते. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी धर्मजागरण विभागामध्ये काम करणारे प्रचारक श्री. नंदू गिरजे सुमारे महिनाभर या गावांमध्ये वास्तव्याला होते. या काळात त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये चांगला संपर्क केला. या मेळाव्याच्या तयारीसाठी त्यावेळचे प्रांताचे धर्मजागरण प्रमुख श्री. शरदराव ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या बैठका झाल्या. विश्व हिंदू परिषदेचे श्री संजय बोरसे श्री संजय पाठक शिरपूर मधील श्री दिलीप लोहार आणि अन्य कार्यकर्ते यांच्या मदतीने सर्व व्यवस्थांची योजना झाली. या मेळाव्याला सुमारे ३००० वनवासी बांधव उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये साध्वी शिवा सरस्वतीजी (राजस्थान) यांचे मार्गदर्शन सर्वांना लाभले. या मेळाव्यानंतर त्या परिसरामध्ये धर्म जागरणाच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच पुढच्या वर्षी पिंपळनेर परिसरात अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये भारताचे अनेक जवान धारातीर्थी पडले. अशा जवानांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने मानपत्र देण्याची योजना प्रांतामध्ये ठरविण्यात आली. धुळे तालुक्यातील विश्वनाथ या गावामधील कै. पंढरीनाथ सूर्यवंशी हा जवान या युद्धामध्ये हुतात्मा झाला. त्यावेळची जिल्हा कार्यवाह श्री. ललितदादा पाठक आणि मी त्या गावी जाऊन त्या जवानाच्या कुटुंबियांची भेट घेऊन आलो. ग्रामस्थांच्या मदतीने गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. एके दिवशी संध्याकाळी झालेल्या एका हृद्य कार्यक्रमात या जवानाच्या आई-वडिलांना हे मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रा प्रकाश पाठक यांचे हृदयाला हात घालणारे अत्यंत प्रभावी भाषण झाले.
या लेखनाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील अनेक आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते यांच्या आठवणी जाग्या झाल्या. सर्वांकडून मिळालेला स्नेह मी मनात सदैव जपला आहे. अजून अनेक कार्यकर्त्यांची नावे घेऊन प्रसंग सांगणे विस्तारभयास्तव शक्य होत नाही याचा खेद वाटतो. परंतु धुळे जिल्ह्यातील स्वयंसेवक त्यांचे कुटुंबीय यांनी जी मायेची पाखर माझ्यावर घातली याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
सुधीर गाडे, पुणे
खुपच छान...👍🙏🕉
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअप्रतिम सुधीरजी खूपच सुंदर आणि प्रेरणादायी असा आपला लेख आहे सर्वांनी आवर्जून पुन्हा पुन्हा वाचावा व आपल्या संग्रहात ठेवावा असा लेख आहे आपले पुनश्च अभिनंदन
Deleteसुरेख, अनेक जेष्ठ स्वयंसेवकांची नावे व प्रसंग अजूनही लक्षात आहेत.. 👌👌
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप प्रेरणादायी अनुभव आहेत...
ReplyDeleteतुमच्या सारख्या आदरणीय प्रचारकांनी आणि समर्पित गृहस्थी कार्यकर्त्यांनी संघाचे काम ज्या पद्धतीने वाढवत नेले याला तोड नाही...
शत् शत् नमन 🙏
धन्यवाद.
Deleteही प्रेरणा पूर्वसुरींची
उत्तम 💯
ReplyDelete🙏🙏
Deleteवा, खूप छान लेखन, स्फूर्तीदायी.
ReplyDelete🙏🙏
Deleteखूप छान, ह्यातले प्रेरक प्रसंग नक्कीच वाचकांच्या/ स्वयंसेवकांच्या कामात येतील.
ReplyDelete🙏🙏
Deleteसुधीर जी छान अनुभव , संभाजीनगर वर पण लिहा
ReplyDeleteप्रयत्न करतो.
Deleteखूप छान शब्दांकन... आपले अनुभव आमच्यासाठी प्रेरणादायी...
ReplyDelete🙏🙏
Deleteवा छान व अनुकरणीय अनुभव !
ReplyDelete🙏🙏
Deleteखुप छान....
ReplyDelete🙏🙏
Deleteश्री.सुधिरजी अतिशय सुंदर शब्दांत सर्व आठवणी लिहिल्या आहेत... खूप छान... धन्यवाद.
ReplyDeleteनमस्कार.
Deleteयेवढी सुंदर माहिती लिहिली आहे. पण इतकी वर्षे धुळे जिल्ह्यातील या भागात काम करताना तुम्हाला अस कधी वाटले का की मनमाड-इंदूर रेल्वे लाइन या जिल्ह्या साठी महत्त्वाची आहे?
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteह्याविषयी मला फार समजले नाही. मी काही विचार केलेला नाही.
खूपच छान अनुभव कथन
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteनमस्कार !
ReplyDeleteआपण धुळ्याला प्रचारक असतांना कधी भेट झाल्याचे स्मरणात नाही.त्याच कालखंडात मी बजरंगदलाच्या सक्रीय कामात होतो.माझ्याकडे जिल्हा संयोजक म्हणून दायित्व होते.असो, मला असे नेहमीच वाटते की, परिवार क्षेत्रात विविध जबाबदारी घेवून काम करणाऱ्या स्वयंसेवकांशी केव्हातरी जिल्हा प्रचारकांनी संपर्क ठेवायला हवा.तसे फारसे घडत नाही असा माझा अनुभव आहे. कदाचित हा केवळ माझाच अनुभव असेल.या विषयाची मी प्रतिवादी नाही.एक स्वभाविक अपेक्षा मी व्यक्त केली आहे. सध्या २०२१ साल चालू आहे.परंतु जिल्हाप्रचारकांनी स्वत:हून जिह्यातील जबाबदारी घेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवून काम केले तर संघ दृष्ट्या काम उभे राहू शकेल असे वाटते. कामात असणारा कार्यकर्ता कायम सक्रीय कामात राहतोच असे नाही,पण तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी संघाची एक अद्भुत दृष्टी घेवून काम केले तर तेही काम संघकाम होईल.
नमस्कार.
Deleteमुद्दा महत्त्वाचा आहे. तिथल्या अधिकाऱ्यांशी कृपया प्रत्यक्ष चर्चा करावी.
छान! मला धुळे निवास सोडुन पंचवीस-तीस वर्ष झाली. हा लेख वाचल्यानंतर बालपणीच्या काळातील अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक डोळ्यासमोर उभे राहिले. आपल्या सारख्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी चिवटपणे संघकाम रुजवले आणि वाढवले आहे.
ReplyDeleteनमस्कार.
Deleteहोय. सातत्य, चिकाटी
माझे घर संघ कार्यालया समोर असल्याने आलेल्या प्रत्येक प्रचारकाशी जवळून परिचय असे तसा तो सुधीरजिशी पण होता,या लेखामुळे सर्व जुन्या आठवणी जमुन आल्या ,फार आनंद झाला .
ReplyDeleteसंजय बोरसे
नमस्कार
ReplyDeleteप्रचारक म्हणून कार्य करताना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. आपले अनुभव आम्हालाही शिकवून जाणारे आहेत. प्रचारक म्हणून अनुभव घेतलेल्या सर्वांनी आपले अनुभव लिहून इतरांपुढे ठेवयला हवे असे प्रकर्षाने वाटते..
ReplyDeleteमाझ्यासाठी संस्मरणीय दिवस होते ते.
Deleteधन्यवाद
माझ्यासाठी संस्मरणीय दिवस होते ते.
Deleteधन्यवाद
शिक्षक, फार कमी लिहिले आहे. मी स्वतः तुमचा खूप सहवास लाभलेला स्वयंसेवक आहे. एक पुस्तक लिहून होईल इतके तुमचे धुळ्याचे अनुभव आहेत. शुभेच्छा.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete