पुस्तक परिचय:- 'व्यासांचे शिल्प' नरहर कुरुंदकर
महाभारत हा ग्रंथ हजारो वर्षांपासून हिंदूंच्या श्रद्धेचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखन महर्षी व्यासांनी केले ही समाजाची श्रद्धा आहे. याच महाभारतावरील मराठी भाषेतील चिकित्सक लेखक नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला लिहिलेल्या लेखांचा संग्रह व्यासांचे शिल्प या नावाने २००२ मध्ये पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रसिद्ध केला. त्याची दुसरी आवृत्ती २०१५ मध्ये प्रसिद्ध झाली. तो नुकताच वाचनात आला.
सामान्यपणे हिंदू कुटुंबात समाजात महाभारत ग्रंथातील प्रसंगांचा संदर्भ देण्याची पद्धत आढळते. परंतु मूळ ग्रंथ नेमका कधी लिहिला गेला हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. काळाच्या ओघात या ग्रंथात विविध लेखकांनी भर टाकली. त्यामुळे मूळ ग्रंथाचे स्वरूप पालटूनच गेले. महाराष्ट्रामध्ये निळकंठ या सतराव्या शतकातील लेखकाने लिहिलेली प्रत अनेक वर्षे प्रमाण मानली जात होती पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेने डॉ. सुखटणकर यांच्या नेतृत्वाखाली १९२७ ला काम सुरू केले. ते सुखटणकर यांच्या निधनानंतरही चालू राहिले आणि १९६१ या वर्षी चिकित्सक आवृत्तीचे शेवटचे पर्व प्रसिद्ध झाले. या आवृत्तीतील महाभारत साधारण सन १००० च्या सुमारास प्रचलित होते असे मानण्यात येते. त्यानंतरही अनेक आधुनिक संशोधकांनी यावषयी विपुल लिखाण केले आहे. या सर्व संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की महाभारत ग्रंथामध्ये अनेक वेळा वेगवेगळी भर टाकली गेली. त्यामुळे चिकित्सक आवृत्तीतील महाभारत हे सन १००० च्या सुमारास चे आहे तेदेखील मूळ महाभारत मानता येणार नाही, त्यातही अनेक प्रक्षिप्त गोष्टी आहेत असे मानले जाते.
नरहर कुरुंदकर आणि तर्कशुद्ध पद्धतीने अनेक लेखकांनी महाभारतावर किंवा महाभारतातील पात्रांबद्दल मांडणी केलेल्या लेखनाची चर्चा, चिकित्सा करत अनेक मुद्दे मांडले आहेत. ज्या लेखकांच्या लेखनाची चिकित्सा नरहर कुरुंदकर यांनी केली आहे त्यामध्ये दाजीशास्त्री पणशीकर, इरावती कर्वे, कुरुंदकर यांचे मामा डॉ.ना.गो. नांदापूरकर , डॉ. सुशीला पाटील या लेखकांचा समावेश आहे. तसेच याशिवाय कुरुंदकरांनी वेळोवेळी लिहिलेले लेखदेखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
हे पुस्तक वाचत असताना अनेक गोष्टी उलगडत जातात. जनमानसातील प्रचलित समजुतीला धक्का देणाऱ्या गोष्टी या नवीन विचार करायला भाग पाडतात. यापैकी काही गोष्टी किंवा निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
• महाभारत ग्रंथापेक्षा रामायण ग्रंथाची प्राचीन आवृत्ती उपलब्ध नाही. महाभारत समाजाच्या श्रद्धेचा ग्रंथ होता याचे ज्या काळापासूनचे पुरावे उपलब्ध आहेत त्यापेक्षा खूप नंतरच्या काळात रामायण ग्रंथ समाजाच्या श्रद्धेचा होत गेला.
• प्रसिद्ध ययाती हा राजा पुण्यवान होता. वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीत रंगवलेले चित्र महाभारताला धरून नाही. देवयानीच्या स्वार्थी हट्टी स्वभावामुळे ययातीला शाप मिळाला. त्याचे विपर्यस्त चित्रण झाले आणि ते वाढत गेले.
• हरिश्चंद्र राजा सध्या सत्यवचनी म्हणून समाजमनात प्रतिष्ठित आहे. परंतु मूळ कथा तशी नाही. ती महाभारतात आढळत नाही.
• श्रीकृष्ण ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे.नंतर क्रमाक्रमाने त्या व्यक्तिरेखेला देवत्व आणि परमेश्वरत्व प्राप्त झाले. रुक्मिणीचे प्रेम होते म्हणून श्रीकृष्णाने तिचे हरण केले नाही तर व्यापक राजकारणाचा भाग म्हणून तिचे हरण केले. द्रौपदीची राज्यसभेत विटंबना झाली त्यावेळी श्रीकृष्णाने तिला वस्त्रे पुरवली ही कथा प्रक्षिप्त आहे.
• महाभारताच्या जुन्या ऐतिहासिक आवृत्त्यांमधील भगवद्गीता अठरा अध्यायांची नसून त्यापेक्षा कमी अध्यायांची आहे किंबहुना संपूर्ण भगवद्गीता हीच प्रक्षिप्त आहे.
• पांडव वनवासात असताना दुर्वास ऋषींनी परीक्षा पाहिली आणि भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय थाळी दिली ही कथा महाभारतात नाही.
दाजीशास्त्री पणशीकर यांच्या लेखनाची चिकित्सा करताना लिहिलेल्या पुढील ओळी विचार करायला भाग पाडतात.
'क्षमा आणि शांतता हीच उदात्त मूल्ये आहेत.आदरणीय आणि वंदनीय तीच असायला पाहिजेत. पण राष्ट्राच्या इतिहासात पराभवाच्या जळणाऱ्या स्मृतींनाही महत्व असते. सुप्त ज्वालामुखीप्रमाणे आतल्याआत खदखदणारा जो वैराचा दीप्त लाव्हा असतो , त्यालाही महत्त्व असते. पराभवाच्या स्मृती जतन करून शतकानुशतके जळणारी खदखदणारी मने नसती तर गुलाम राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याला अर्थच आला नसता. मानवी जीवन गुंतागुंतीचे आणि अनेक पातळींवरचे असते. मृत भूतकाळातच जे रमतात त्यांना पुढचा भविष्यकाळ घडवता येत नाही हेही खरे आहे; आणि मृत इतिहासातील जयगाथांचा अभिमान आणि पराभवांची शल्ये ज्या समूहमनात अस्तित्वात नसतात, त्यांना राष्ट्र म्हणून जगता येत नाही हेही खरे आहे.' (पान क्रमांक ७१)
एकूणच हा विचार प्रवर्तक असा ग्रंथ आहे.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment