धुळे: अजून काही आठवणी

 "इक दिन हाथी तो इक दिन घोडा,  इक दिन पैदल चलना जी" मी धुळ्यात असताना नाशिक विभागातील कार्यकर्त्यांची एक बैठक मातोश्री वृद्धाश्रमात झाली. ती संपल्यानंतर वाहन येण्याची वाट बघत असताना एक कार्यकर्ते हे गीत सुरेल आवाजात म्हणत होते. प्रचारकांच्या आयुष्याला हे गीत किती चपखल बसते. कारण समाजातील सर्व स्तरांमध्ये काम प्रचारकांना करावे लागते. वेगळ्या अर्थाने आयुष्यातील सर्व दिवस सारखे नसतात. सर्वच दिवस प्रेरणादायक नसतात. काही साधारण काही खारट काही तुरट तर काही कडू आठवणी घेऊन येत असतात.





मी ज्या वेळेला धुळ्यात प्रचारक होतो त्या वेळेला जिल्ह्याचे कार्यालय देवपूर मधील प्राध्यापक कॉलनीत संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक ज.मो. दीक्षित यांच्या बंगल्यात होते. त्यांचे चिरंजीव श्री. सतीश दीक्षित यांचे बारकाईने लक्ष असायचे. धुळ्यातील कार्यालयाची आठवण म्हणजे नळाचे पाणी कधीही यायचे. एकदा उन्हाळ्यात बरेच दिवस पाणी आले नाही म्हणून सतीशरावांनी पाण्याचा टॅंकर मागवला. पाणी बंगल्यातील विहिरीत ओतून घेतले. पण ते सर्व पाणी जमिनीत मुरून गेले हा एक वेगळाच अनुभव होता.

धुळ्यातील २६ जानेवारीचे दोन दिवस वेगवेगळ्या कारणांनी लक्षात राहिले आहेत. २६ जानेवारी २००० ला साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावी गेलो होतो. तेथील कार्यकर्ते श्री. चैत्राम पवार यांनी ग्रामविकासाचे विविध प्रयोग सिद्ध केले होते. त्यातील वनव्यवस्थापन केल्याबद्दल सरकारकडून मिळालेल्या पारितोषिकातून गावकऱ्यांनी गुऱ्हाळ उभे केले होते. त्या गुऱ्हाळाची सुरुवात त्यादिवशी झाली. या कार्यक्रमासाठी धुळ्याहून बजाज कंपनीच्या एम ८० गाडीवरून श्री. केशवराव नांदेडकर आणि मी असे दोघेजण गेलो होतो. श्री चैत्राम पवार यांनी आपल्या कामामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे. २६ जानेवारी २००१ ला गुजरातमध्ये भूज येथे भूकंप झाला. त्यादिवशी मी पिंपळनेर येथे होतो. तिथेदेखील भूकंप जाणवला. नंतर जसजशी तीव्रता लक्षात येत गेली तसे भूकंपग्रस्त परिसरात मदतीला तरुण कार्यकर्ते पाठवण्याची योजना केली आणि मदत साहित्य आणि तरुण कार्यकर्ते पाठवले. प्रचारकांना कार्यक्षेत्रातच राहण्याची सूचना होती त्यामुळे इच्छा असूनही जाता आले नाही. 

धुळ्यात असताना मला काही आजारपणाला देखील तोंड द्यावे लागले. शिंदखेडा येथे अखिल भारतीय कार्यकर्ते श्री. हस्तीमलजी यांच्या प्रवासात जिल्ह्यातील शाखा कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या वेळेस मला खूप ताप भरला होता. परंतु इंजेक्शन घेऊन त्या बैठकीत सहभागी झालो. बुटात बुटात खडा अडकून टोचून उजव्या पायाच्या अंगठ्याला कुरूप झाले होते. नंतर धुळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर स्वयंसेवक विवेकानंद चितळे यांनी छोटी शस्त्रक्रिया करून अंगठ्याचा थोडा भाग काढून टाकला. २००१ च्या उन्हाळ्यात धुळे शहरातील तरुणांची सहल सायकल वरून बोरकुंड जवळील एका मंदिरात काढली होती. त्यावेळेला माझ्या गुडघेदुखीची सुरुवात झाली होती. रात्रभर गुडघे दुखत होते. तेल मालिश, शेक घेणे असे करत कशीबशी ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी परत येताना सायकल एका स्वयंसेवकाला देऊन मी प्रा. भिकाजी बारसे यांच्या बरोबर गाडी वरुन परत आलो.

२००० च्या राष्ट्र जागरण अभियानात मी कपडे ज्यांच्याकडे इस्त्रीला टाकत असे आणि ज्यांच्याकडे केस कापायला जात अशा दोघांच्या घरी संपर्कासाठी आवर्जून गेलो होतो. त्यावेळी मी लंघण म्हणून सोमवारचा उपवास करीत असे. परंतु त्यांचे अगत्य पाहून तो उपवास त्या दिवशी मी निवडला होता.

धुळ्यातील आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील.

सुधीर गाडे, पुणे

Comments

  1. सुधीरजी, खुप छान ..
    आज दीक्षितांच्या घरचा अनुभव आणि सतीश दादांचे नाव वाचुन आनंद झाला.. सुंदर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख