असामान्य प्रतिभावंताची माणुसकी
संघाचे चौथे सरसंघचालक प.पू. राजेंद्रसिंहजी तथा रज्जूभैय्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त लिहिलेला लेख ( पूर्व प्रसिद्धी २४ जुलै २०२१ , विश्व संवाद केंद्र, पुणे) .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अद्भुत संघटना आहे. संघामध्ये असामान्य व्यक्तिंपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण सहजपणे बंधुतेचा व्यवहार करतात. असामान्य व्यक्ती आपले असामान्यत्व मागे सोडून सर्वांच्या सुखदुःखाशी समरस होतात. अशाच असामान्य व्यक्तिंपैकी एक म्हणजे संघाचे चौथे सरसंघचालक प.पू. राजेंद्रसिंहजी तथा रज्जूभैय्या. प्रतिभावंत असणाऱ्या रज्जूभैय्यांना नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रमण यांनी महाविद्यालयीन परीक्षेत 'रमण परिणामावरील प्रात्यक्षिकासाठी' १०० पैकी १०० गुण दिले आणि आपल्याबरोबर संशोधनासाठी बंगळुरू येथे आमंत्रित केले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांनी रजूभैय्या यांच्यातील शास्त्रज्ञाची गुणवत्ता ओळखून त्यांना भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात संशोधक म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. परंतु पूर्ण विचारांती 'संघाचे काम हेच आपले जीवनध्येय' नक्की केलेल्या रज्जूभैय्यांनी निग्रहपूर्वक या प्रस्तावांना नकार दिला. जगद्विख्यात शास्त्रज्ञांनी ज्यांच्या प्रतिभेची पावती दिली त्या रज्जूभैय्या यांची असामान्य प्रतिभा सर्व स्वयंसेवकांच्याबरोबर व्यवहार करताना कधीही आडवी आली नाही. याचेच दर्शन त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंगांमधून होते.
१९४५ मधील संघ शिक्षा वर्गात एक स्वयंसेवक 'रेड फीवर(scarlet)'ने आजारी पडला. त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार सुरू झाले परंतु, त्याचा परिणाम दिसत नव्हता. आता एक दुर्मिळ इंजेक्शन अतिशय आवश्यक आहे असे डॉक्टरांचे मत पडले. रज्जूभैय्यांनी सगळीकडे प्रयत्न केले आणि रामकृष्ण मठाच्या आश्रमातून परदेशातून आयात केलेले हे इंजेक्शन मिळवून दिले. याचबरोबर तीन दिवस सलग अहोरात्र स्वतः त्या स्वयंसेवकाची काळजी घेतली आणि त्याला आजारातून बरे केले.
एकदा रज्जूभैय्या प्रसिद्ध सत्पुरुष स्वामी चिन्मयानंद यांच्याबरोबर 'विक्रमशिला एक्सप्रेस' या रेल्वेगाडीतून भागलपूर येथे जात होते. रात्र झाल्यानंतर सर्वजण आपापल्या बर्थवर झोपी गेले. सकाळी जेव्हा स्वामींना जाग आली त्यावेळी त्यांनी पाहिले की रज्जूभैया त्यांच्या बर्थवर अंग चोरून एका कोपऱ्यात बसले आहेत आणि ९-१० वर्षांचा एक मुलगा बर्थवर शांतपणे झोपला आहे. स्वामीजी काही बोलणार हे लक्षात आल्यानंतर रज्जूभैय्यांनी खुणेनेच स्वामीजींना शांत राहण्यास सांगितले. नंतर थोड्या वेळाने तो मुलगा जागा झाल्यावर रज्जूभैय्यांनी सांगितले की, पहाटे ते ज्यावेळी प्रसाधनगृहात गेले त्यावेळी त्यांना हा मुलगा रेल्वेच्या डब्याच्या दांडीला पकडून प्रवास करताना दिसला. त्यावेळी रज्जूभैय्यांनी त्याला बोलावून आपल्या जागी झोपायला सांगितले होते. थोड्यावेळाने एका स्थानकावर कार्यकर्त्यांनी सर्वांसाठी दूध आणले तेव्हा रज्जूभैय्यांनी त्या मुलाला आग्रहपूर्वक ते दूध प्यायला दिले. पाटणा येथे गाडी पोहचल्यानंतर तेथील कार्यकर्त्याला रज्जूभैय्यांनी त्या मुलाला घरी सुखरूप पोहचवण्यास सांगितले.
१९९४ मध्ये कर्नाटकातील बल्लारी येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये रामगोपाल संड यांच्या मुलीवर रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार सुरू होते. या उपचाराचा खर्च आठ लाख रूपये येणार होता. यापैकी पाच लाख रूपये सुरूवातीलाच भरायचे होते. एवढे पैसे जमवणे रामगोपाल यांना शक्य नव्हते. त्यांनी आपली अडचण रज्जूभैय्या यांच्या कानावर घातली. त्यानंतर लगेचच रामगोपाल यांना देशभरातील कार्यकर्ते, स्वयंसेवक यांच्याकडून मदत देण्यासंबंधी फोन येऊ लागले. त्यापैकी दोन जण तर त्यावेळी आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री होते. या सर्वांच्या मदतीने अपेक्षित रक्कम उभी करणे रामगोपाल यांना शक्य झाले.
आपले असामान्यत्व बाजूला ठेवून संवेदनशीलपणे व्यवहार करणाऱ्या रज्जूभैय्या यांचे हे जीवन प्रसंग समजल्यानंतर असे वाटते की भगवद्गीतेतील उपदेश त्यांनी आत्मसात करून आचरणात आणला होता तो म्हणजे "अलौकिक नोहावे लोकाप्रती".
प.पू.रज्जूभैय्यांना विनम्र अभिवादन!
प्रा.सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment