सहलींचे अनुभव
" आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत का हे खात्रीने सांगता येत नाही,"प्रशांत भिरंगे म्हणाला. थंडीचे दिवस सुरू झाले होते.रात्र झाली होती. आजूबाजूला पाच सहा फूट वाढलेलं गवत होतं.आम्ही पायवाटेने राजमाची गडाच्या दिशेने चालत निघालो होतो. आमच्यापैकी केवळ प्रशांत भिरंगे हा त्यापूर्वी एकदा गडावर येऊन गेला होता.
गोष्ट बहुधा १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यातील आहे. त्यावेळी मी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो आणि मंगळवार पेठेत राहत होतो संघाच्या रचनेत त्या भागाला शाहूनगर असे नाव होते. त्या शाहूनगरातील प्रतापादित्य या सायम् शाखेचा मी मुख्य शिक्षक म्हणून काम करत होतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये नगराच्या शाखांतील बाल म्हणजेच विद्यार्थी स्वयंसेवकांची सहल राजमाची या गडावर घेऊन जायची असे आम्ही ठरवले. सहल घेऊन जाण्यापूर्वी आधीच्या एका शनिवारी चार-पाच कार्यकर्त्यांनी जाऊन गड पाहून यायचा असे ठरविले. प्रशांत भिरंगे , प्रशांत हिंगे बहुधा केदार लोणकर आणि मी असे आम्ही पुण्यातून चारजण संध्याकाळी लोकल ट्रेनने निघालो आणि लोणावळ्याला उतरलो तेथे थोडे खाऊन, चहा घेऊन चालायला सुरुवात केली. साधारण दोन-अडीच तास चालावे लागते याची कल्पना आम्हाला होतीच. त्याप्रमाणे गप्पा मारत आम्ही चालू लागलो. जवळपास दोन तास गेले. आम्ही चालता चालता प्रशांत भिरंगेला विचारू लागलो की अजून किती चालायचे आहे. अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ असे तो दोन-तीन वेळा तो म्हणाला. थंडीचे दिवस असल्याने दिवस लवकर मावळला आणि अंधार झाला. हळूहळू प्रशांतला आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत कि नाही याची खात्री वाटेनाशी झाली. अजून थोडे पुढे गेल्यावर तो म्हणाला मी पळत पुढे काही अंतर जातो आणि अंदाज घेतो. परत येऊन सांगतो. परत येऊन त्याने सांगितले की त्याला बरोबर रस्त्याने जात आहोत याची खात्री वाटत नाही. मग आम्ही त्याच ठिकाणी थांबायचे ठरवले. कारण रस्ता चुकला असेल तर अजून चुकणार नाही आणि बरोबर असेल तर काहीच नुकसान होणार नाही. सोबत डबे आणले होते. पाण्याच्या बाटल्या होत्या. आम्ही डबा खाल्ला आणि झोपायचे ठरवले. परंतु अशा ठिकाणी सर्वांनी एकदम झोपी जाणे योग्य नाही हे लक्षात आले. त्यामुळे आम्ही दोघा दोघांचे दोन गट केले. एका गटाने सुरुवातीला झोपायचे आणि दुसऱ्या गटाने जागायचे. नंतर आदलाबदल करायची असे ठरवले. त्याप्रमाणे प्रशांत हिंगे आणि केदार लोणकर सुरुवातीला झोपी गेले. मी आणि प्रशांत भिरंगे जागे राहण्याचा प्रयत्न करत होतो. मग भेंड्यांना सुरुवात झाली. अगदी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या खेळत वेळ काढला. आमची वेळ संपल्यावर प्रशांत हिंगे आणि केदारला जागे केले. ते उरलेला वेळ जागे राहिले. पहाटे उजाडल्यानंतर लक्षात आले की आम्ही बरोबर रस्त्यावरच होतो. साधारण वीस-पंचवीस मिनिटे चालल्यानंतर गड दिसला आणि आम्ही गडावर पोचलो. यामध्ये रस्त्याची खात्री चांगली चांगलीच झाली. नंतर बाल स्वयंसेवकांची सहल निर्विघ्न पार पडली. ही सहल कायमची स्मरणात राहील.
साखरवाडीत दहावीत शिकत असताना आमच्या वर्गातील आरिफ वारूणकर याच्या वडिलांनी फलटणमध्ये बांधलेल्या घराची पूजा होती त्यासाठी राहुल इंगळे आणि मी सायकल वरून फलटणला गेलो. बहुधा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे दिवस होते. कार्यक्रम संपून निघायला संध्याकाळ झाली. दिवस लवकर मावळला. तिघांच्याही सायकलला दिवा नव्हता. अंधारात काही दिसेना. आम्ही तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात हळूहळू सायकल चालवीत आम्ही पुढे जात राहिलो. वाटेमध्ये निंभोरे या गावात आमच्या कै. बापूंचे मित्र, दिगंबर धुमाळ यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडून बॅटरी घेतली आणि तिच्या उजेडात साखरवाडी पर्यंतचा प्रवास पूर्ण केला त्या काळात मोबाईल तर दूरच पण फोनची पण सुविधा नवती त्यामुळे अर्थातच घरी सर्वजण काही न कळल्याने काळजीत पडले होते आल्यावर अर्थात बोलणी बसली असली ही सायकल सहल.
सुधीर गाडे पुणे
Comments
Post a Comment