काचेचे पेले
" काचेचे पेले आणू का? " वेटरने विचारले आणि आम्ही बुचळ्यात पडलो. काही क्षणानंतर खुलासा झाला. आमच्या डोक्यात प्रकाश पडला की काचेचे पेले म्हणजे तुम्ही दारू पिणार आहात का असे तो विचारतोय. आम्ही सांगितले की काचेचे नको स्टीलचे पेले आण.
मी साताऱ्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाची ही गोष्ट. बहुधा दुसऱ्या वर्षाला असताना एके दिवशी रात्रीच्या जेवणासाठी माझे मित्र प्रशांत डोंगरे, भास्कर वाळिंबे, स्नेहदीप करंदीकर, अभिजीत पंतोजी, संजय गायकवाड, सचिन उपाध्ये, मी एका ढाब्यावर गेलो. त्यावेळी हा प्रसंग घडला.
अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टी वारंवार कानावर पडायच्या. त्यातली एक म्हणजे अभियांत्रिकीचा अभ्यास खूप असतो. त्यामुळे रात्रभर जागून अभ्यास करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे अभियांत्रिकीला शिकायला गेल्यावर सिगारेट प्यायची सुरूवात आपसूकच होते. मी मनाशी निश्चय केला की अभ्यासाचं नियोजन करायचे आणि करावं लागलं तर रात्री १२ पर्यंतच जागरण करायचं. तसेच व्यसनांपासून दूर रहायचं. मला दोन्ही गोष्टी जमल्या. आई,कै.बापू, संघ यांच्या संस्कारामुळे व्यसनांपासून त्यावेळीही दूर राहिलो आणि आजही दूर आहे.
स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले असताना त्यांनी असे म्हटले की, " भारतात लाखामध्ये एका व्यक्तीला व्यसन असेल." परंतु इंग्रजांनी भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढावे यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. स्वामीजी याबाबत म्हणाले, " कशाला दारूचा व्यापार करणारे इंग्रज भारतभर आपली माणसे आतापर्यंत पाठवत आलेत? कशासाठी? तर खास तिथल्या लोकांमध्ये नशा आणणाऱ्या मद्यांची आवड निर्माण करण्यासाठी. त्यांना दारूचे धडे देण्यासाठी आणि माझ्या पाहणीनुसार मला तर वाटते हे धडे गिरवण्यासाठी अधिक चांगले विद्यार्थी त्यांना कुठेही मिळणार नाहीत." या पद्धतशीर प्रयत्नांचा परिणाम भारतातील लोकांवर नक्कीच झाला आहे.
काचेच्या पेल्यांचा प्रसंग मला आजही चांगलाच आठवतो. आपल्या देशात महात्मा फुले, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान व्यक्तिंनी व्यसनांपासून दूर राहण्याचा कळकळीने उपदेश केला. परंतु दिवसेंदिवस व्यसनांचे प्रमाण समाजात वाढतानाच दिसते आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेलेल्या दिसतात. काही सर्वेक्षणांनुसार व्यसनांची लहान वयातच सवय लागल्याचे आढळून आले आहे. ही फार मोठी चिंताजनक बाब आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापक कक्षात बसलो असताना थिनर पिऊन झिंगलेल्या ९ वीच्या विद्यार्थ्याला सेवक घेऊन आल्याचे मी पाहिले आहे. तसेच स्त्री पुरूष असाही भेद व्यसनांच्या बाबतीत फार राहिला नाही. मोठ्या शहरातून सहजपणे उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांच्या उलाढालीतून दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो असे सांगितले जाते. हेच दहशतवादी निष्पाप लोकांच्या जिवावर उठतात. दुर्दैवाने समाजातील काही वर्गाने व्यसन हे खोट्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते दारूच्या व्यसनामुळे घराघरांची कशी धूळधाण होते हे दाखवून देत आहेत पण सरकार मात्र महसूल मिळतो म्हणून दारूविक्रीला प्रोत्साहनच देताना आढळते. आणि वर सरकार म्हणते की आम्हाला महात्मा गांधींच्या विचारांवर वाटचाल करायची आहे.
मी गंमतीने अनेक वेळा सांगतो की संघाचे कार्यकर्ते कुठेही एकमेकांना भेटले की "बसूया एकदा." असं म्हणतात. साधारण २०-२५ वर्षांपूर्वी आजूबाजूचे लोक आश्चर्याने बघायचे. पण आता संघाचे कार्यकर्ते " बसूया एकदा" असं म्हणाले की आता बहुधा आजूबाजूच्या लोकांना वाटतं की " हे आपल्यासारखेच आहेत." समाजातील हा बदल चिंता वाढवणारा आहे. व्यसनांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे करत असताना महात्मा फुले यांनी ते पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यांनी नगरपालिकेच्या दारूचे गुत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. महात्मा फुले यांचे विचार लक्षात ठेवले पाहिजे, " दारूच्या व्यसनामुळे आरोग्यास अपायकारक तर आहेच पण नैतिक आचरणास बाधक आहे."
सुधीर गाडे, पुणे
Nice article,sir
ReplyDeleteधन्यवाद
Deleteव्वा खूपच छान प्रबोधन केले आहे सुधीरजी
Deleteधन्यवाद
Deleteवा सुधीरजी सुंदर लिखाण प्रेरणादायी आहे.🚩🌷🌷🙏🌷🌷🚩
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसर,तुमचे लिखाण अनुभवातून आलेले असल्याने नेहमीच भावते.विचार करण्यास भाग पाडते.
ReplyDeleteनिदान आमच्या पिढीपर्यंत आमचं घर निर्व्यसनी आहे.पण, वेगाने बदलत जाणाऱ्या या जगात आपल्या मुलांची पिढी अशीच राहिल का? अशी धास्ती वाटते.
आपण संस्कार तर चांगलेच करतो पण ही कवच कुंडले टिकून राहण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडतो?
तुमच्या लेखाची मी नियमित वाचक आहे.कृपया वरील प्रश्र्नांबद्दल मार्गदर्शन करावे.
आपल्यासारखे विचारी लोक हेच आशेचे किरण आहे. संस्कारांमागची, मूल्यांमागची कारण परंपरा मनमोकळ्या चर्चेद्वारे नव्या पिढीला समजावून देत राहिले पाहिजे. त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊन योग्य वाटल्यास बदलही स्वीकारले पाहिजे. यातून अपेक्षित परिणाम होईल असे वाटते.
Deleteखुप छान लेख आपल्या लेखातुन संस्कार आणी प्रेरणा दोन्ही मीळतात 🙏🙏💐
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखूप सुंदर लेख सर
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान 👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअतिशय बोधप्रद. खरोखरच त्याबाबतीत जागे होण्याची ही अंतिम वेळ आहे आत्ताच जर आपण जागे झालो नाही तर समाजाचा कडेलोट अटळ आहे.
ReplyDeleteजेष्ठ, तरूण, शिक्षक ,डॉक्टर,
लोकप्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र बसून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतीत कसुन आणि तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत.
धन्यवाद.
Deleteअगदी योग्य मुद्दा मांडलात.