राष्ट्रपती भवन वर्णन
" ३४० एकड परिसर में फैले हुए राष्ट्रपती भवन में ३४० कमरे हैं।" राष्ट्रपती भवनातील आमची मार्गदर्शिका सांगत होती. गुरुवार दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ला मा.राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांची भेट संपवून आम्ही निघत असताना त्यांनी स्वतःहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आम्हाला राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था करा. थोड्या वेळात आमच्यासाठी मार्गदर्शिकेची व्यवस्था करण्यात आली आणि आम्ही राष्ट्रपती भवनाची फेरी सुरू केली.
तत्पूर्वी आम्ही राष्ट्रपती भवनाच्या ३७ क्रमांकाच्या दरवाज्यातून आत येतानाच त्या वास्तूची भव्यता जाणवत होती. तळमजल्याचे छत जवळपास २५ फूट उंच होते. लालसर दगडात बांधलेले गोल स्तंभ, कॉरिडॉरमधील अर्धवर्तुळाकार छत, जाताना काही खांबावर कोरलेले भगवद्गीतेतील श्लोक हे त्यांची छाप पाडत होते. मोबाईल सुरक्षा अधिकाऱ्यांनी जमा करून घेतल्याने आमच्याकडे फक्त जगातील सगळ्यात भारी कॅमेरा होता तो म्हणजे आमच्या डोळ्यांचा. त्या डोळ्यांनी ती भव्यता, ते वास्तू सौंदर्य आम्ही साठवून ठेवत होतो.
आमच्या मार्गदर्शिकेने आमच्या फेरीत माहिती सांगण्याची सुरूवात पहिल्या मजल्यावरील भोजनगृहापसून (बँक्वेट हॉल) पासून केली. पहिल्या मजल्यावरदेखील छताची उंची अंदाजे २५ फूट आहे. भोजनगृहाच्या त्या भव्य दालनात राष्ट्रपतींच्या अधिकृत औपचारिक भेटीसाठी आलेल्या राष्ट्रप्रमुखांसाठी मेजवानीचे आयोजन केले जाते. एका वेळी जास्तीत जास्त १०४ जण जेवायला बस शकतात एवढी व्यवस्था आहे. गरजेप्रमाणे टेबल खुर्च्या मांडल्या जातात. या दालनात माजी १० राष्ट्रपतींची भव्य ( साधारण ८×१५ फूट) तैलचित्रे लावलेली आहेत. यापैकी ठराविक तैलचित्रांवर वेगवेगळ्या रंगाचे दिवे लावलेले आहेत. त्यांच्या संकेतानुसार भोजनवाढपाचे नियोजन केले जाते. राष्ट्रपती आणि पाहुणे राष्ट्रप्रमुख यांच्या खुर्च्यांची जागा ठरलेली असते. या खुर्च्यांमागे उभे राहून मुख्य वाढपी(बटलर) सर्व नियंत्रण करत असतो. त्यामागे असलेल्या दरवाजातून तयार अन्नपदार्थ आणले जातात आणि वाढले जातात. भोजनबेत सात टप्प्यांचा (सेवन कोर्स मील) असतो. राष्ट्रपतींच्या आसनामागे असलेल्या बाल्कनीत वाद्यवृंद बसलेला असतो. वाढल्या जाणाऱ्या पदार्थांनुसार हा वाद्यवृंद भारतीय तसेच अन्य संगीताचे वादन करतो. माजी राष्ट्रपतींच्या तैलचित्रांच्या वरच्या पट्टीत सौ.प्रतिभाताई पाटील शेखावत राष्ट्रपती भवन असताना लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी तारेने कलाकुसर तयार केली आहे. यात त्यावेळच्या सर्व राज्यांचे (तेलंगण वगळता) नकाशांच्या रचनेत मोकळी जागा सोडली आहे. मार्गदर्शकीने सांगितल्यावरच ते आमच्या लक्षात आले.
या दालनातून बाहेर पडून आपण अशोक दालनाकडे जाऊ लागलो की त्या मार्गावर उरलेल्या माजी आणि आजी राष्ट्रपतींची तैलचित्रे लावलेली आहेत. तसेच सर्वांचे अर्धपुतळे बसवलेले आहेत.
या पॅसेजमधून आपण पोचतो अशोक दालनात. हे ब्रिटिशांच्या काळात बॉलरूम म्हणून वापरले जाई. आता येथे राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित झालेल्या व्यक्तिंसाठी चहापानाचे आयोजन केले जाते. याच्या भव्य छतावर मध्यभागी साधारण २५×३० फुटांचे चित्र लावलेले आहे. तत्कालीन पर्शियाच्या राजाने स्वतःचे शिकार करतानाचे १६ भागांचे हे चित्र इंग्लंडच्या राजाला दिले. ते बोटीने भारतात आणून मग छतावर लावण्यात आले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ठिकाणी उभे राहिलो तरी शिकार करणारा राजा आपल्याकडे पाहतो आहे असे वाटते. या चित्राच्या सर्व बाजूंनी फ्रेस्को पेंटिंग करण्यात आले आहे. या सर्व चित्रांमध्ये पर्शियन भाषेतील काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत. मूळची बॉलरूम असल्याने गॅलरीमध्ये वाद्यवृंदाला बसायला जागा आहे.
त्यानंतर आपण बघतो तो मा.राष्ट्रपती ज्या कक्षात अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटतात तो कक्ष. या कक्षात सामान्य नागरिकांना प्रवेश मिळत नाही. समोरच्या बाजूला बैठक कक्ष आहे. या कक्षात राज्यपाल कुलगुरू यांची बैठक आयोजित केली जाते. या कक्षात देखील सामान्य नागरिकांना प्रवेश मिळत नाही.
त्यानंतर आपण बघतो तो दरबार कक्ष. याच ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचा शपथविधी झाला होता. दर वर्षी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पुरस्कारांचे वितरण याच ठिकाणी होते. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या मागे पाचव्या शतकातील गौतम बुद्धांचे शिल्प लावलेले आहे. तसेच या कक्षाच्या समोरच्या बाजूला होती वऱ्हांड्यामध्ये बैलाचे शिल्प लावले आहे. ही दोनही शिल्पे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी लावून घेतली आहेत. या कक्षाबाहेर समोरच जयपूर स्तंभ बघायला मिळतो. हा तत्कालीन जयपूरच्या राजांनी ब्रिटिश शासकांना भेट दिला होता.
याच मजल्यावर ज्यांनी राष्ट्रपती भवनाची वास्तूरचना केली तसेच नवी दिल्लीचे नगर नियोजन केले त्या ल्यूटन यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. ल्यूटन यांना गोलाकाराचे आकर्षण होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी गोल स्तंभ, गोल घुमट बघायला मिळतात. या परिसरातील सर्व इमारतींचे जोते(प्लिंथ) एकाच उंचीचे आहे. त्या काळात उपलब्ध असणारे तंत्रज्ञान बघता ही फार मोठी गोष्ट आहे. रायसीना टेकडीवर असलेल्या राष्ट्रपती भवनच्या पहिल्या मजल्याच्या जोत्याची उंची ही खालच्या बाजूला असलेल्या इंडिया गेटच्या कमानी एवढी आहे. १९११ मध्ये दिल्ली दरबार झाल्यानंतर राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणायची असे ब्रिटिशांनी ठरवले. सुरुवातीला चार वर्षात बांधकाम पूर्ण करण्याची योजना होती पण पहिल्या महायुद्धात उशीर झाला आणि साधारण १९२९ मध्ये काम पूर्ण झाले. त्यानंतरचे व्हाईसरॉय या वास्तूत राहिले.
आता मुगल गार्डन साठी जिना उतरत असताना मा. राष्ट्रपती यांना सहस्त्रपाणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली गेली आहे ती बघायला मिळते. या मूर्तीचे एकशे आठ हात वेगवेगळ्या योग मुद्रांमध्ये आहेत. प्रभावळीत असणारे हजार हात हे आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहेत. मा.राष्ट्रपतींना भेट दिल्या गेलेल्या वस्तूंचे संग्रहालय सुरुवातीला राष्ट्रपतीभवनात होते ते आता वेगळ्या ठिकाणी केले आहे. पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता.
खाली उतरल्यावर १५ एकरांमध्ये पसरलेले मुगल गार्डन बघायला मिळते. विविध प्रकारचे देशी विदेशी वृक्ष फुलझाडे कारंजी या बागेमध्ये आहेत. मा.वेंकटरमण यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांसाठी ही बाग खुली केली. फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये या बागेतील देशी विदेशी फुले विविध रंगांची उधळण करत असतात. यावेळी ही बाग पाहता येते. मा.प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रपती भवन नागरिकांसाठी खुले केले. राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईट वर जाऊन आरक्षण करून आपल्याला राष्ट्रपती भवन पाहता येऊ शकते.
राष्ट्रपती भवनात अधिकृत दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रप्रमुख यांच्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. बहुतेक वेळा आशिया खंडातील राष्ट्रप्रमुख याच ठिकाणी उतरतात. पाश्चिमात्य राष्ट्रप्रमुख मात्र हॉटेलात राहणे पसंत करतात.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात चौकोनी कारंजे आहे. साधारण दोन १५ फुटी स्तंभांवर बसवलेल्या सोनेरी नागांच्या फण्यातून कारंजे उडत असते. तळमजल्यावरील पॅसेजमध्ये गेल्या काही वर्षांत फ्रेस्को पेंटिंग करण्यात आले आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
मा. राष्ट्रपती ज्यावेळी दिल्लीत असतात त्याचवेळी सर्वात उंचावरील घुमटावर राष्ट्रध्वज दिवसभर फडकावला जातो. राष्ट्रीय शोकाच्यावेळी तो अर्ध्यावर उतरवला जातो.
ब्रिटिशांनी स्वतःच्या सत्तेचे, संपत्तीचे, सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी बांधलेली ही विशाल वास्तू आता कोट्यावधी भारतीयांच्या लोकशाहीतील सर्वोच्च अधिकारपदाचे प्रातिनिधीक दर्शन घडवते.
सुधीर गाडे, पुणे
सुरेख वर्णन
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम लेख...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVery nice sir
ReplyDeleteधन्यवाद
Deleteराष्ट्रपती भावना चे सर तुम्ही खूप छान वर्णन केले आहे, राष्ट्रपती भवन मला पत्रकार म्हणून एकदा आणि विद्यार्थी म्हणून एकदा असे दोनदा पहाण्याची संधी मिळाली. तरीही लयूटन्स ने नियोजनबध्द उभारलेल्या दिल्लीतील या जुन्या इमारती पहाण्याची हौस काही भागात नाही. आता नवीन इमारती बांधल्या जात आहेत त्यांचीही उत्सुकता नक्कीच आहे.
ReplyDeleteअरे व्वा.
Deleteधन्यवाद
खूपच सुंदर वर्णन.धन्यवाद सर.
Deleteधन्यवाद
Deleteखूप छान वर्णन केलेल्या हे राष्ट्रपती भवनाचे. जणूकाही मी स्वतः राष्ट्रपती भवनात सैर करत आहे असे वाटले.
ReplyDeleteधन्यवाद
Delete