लागली पैज
" लागली पैज शंभर रूपयांची!" माझा मित्र संजयकुमार तांबे म्हणाला आणि पैज लागली.
ही गोष्ट १९९० मधील आहे. त्यावेळी आजच्यापेक्षा १०० रूपयांना जास्त किंमत होती. मी तेव्हा पुण्यात स.प.महाविद्यालयात शिकत होतो आणि वसतिगृहात राहत होतो. त्यावेळी माझे काका कै. विष्णुपंत गाडे हे राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. मलाही राजकारणाच्या चर्चांमध्ये आजच्यापेक्षा जास्त रस होता. माझा तेव्हाचा वर्गमित्र संजयकुमार तांबे याचे वडील कै.गणपतराव तांबे उर्फ बापू हे देखील राजकारणात सक्रिय होते. आम्हा दोघांच्या घरी राजकारणाची पार्श्वभूमी असल्याने दोघांनाही राजकीय चर्चांमध्ये खूप रस होता. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली होती. या पार्श्वभूमीवर कोणाला किती जागा मिळणार याबाबत आमची जोरदार चर्चा चालू असताना एकदम पैजेचा विषय निघाला आणि पैज लागली. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यावेळी ही खूपच मोठी रक्कम होती. पण लागली पैज!
बहुधा युतीला जास्त जागा मिळणार की नाही याबाबत ती पैज होती. काही दिवसानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि निकाल लागले. माझा अंदाज वस्तुस्थितीच्या खूप जवळ होता त्यामुळे मी पैज जिंकली. संजयने मला शंभर रुपये देऊ केले. आम्ही सर्व मित्र मिळून टिळक रस्त्यावर चिमण्या गणपती बोळाच्या सुरूवातीला दिनशॉ आईसक्रीमचे दुकान होते. तेथे गेलो आणि त्या पैशातून आईस्क्रीम खाल्ले.
त्या वयात मला पैज लावायला बरेच वेळा आवडायचे. स.प.महाविद्यालयात असतानाच अजून एक पैज मी साखरवाडीचा मित्र कौस्तुभ (भास्कर) वाळिंबे याच्याबरोबर लावली होती. आमच्या गणिताच्या पुस्तकात कोणता धडा कितव्या क्रमांकावर आहे याबाबत ती पैज होती. या पैजेत हरणाऱ्याने दुसऱ्याला पावभाजी खाऊ घालायचे असे ठरले होते. पण ती पपैज मी हरलो. कौस्तुभला पेशवे उद्यानाच्या जवळ एका ठिकाणी पावभाजी खाऊ घातली.
नंतर हळूहळू ही पैज लावायची आवड कमी झाली. आणि आता मी पैज सहसा लावत नाही. पैजेच्या बाबतीत कवी अनंत फंदी यांच्या
'बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको या गीतातील शब्द आठवतात.
विडा पैजेचा उचलु नको
उणी तराजू तोलू नको
सुधीर गाडे, पुणे
सुरेख...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुधीर जी मस्त अनुभव
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअतिशय सात्विक सहजसुंदर कथाकथनसदृष्य खिळवून टाकणाऱ्या शैलीतील लेखन.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteविद्यार्थी जीवनात बऱ्याच वेळा पैज लावण्याचा मोह होत असतो. पैजा लावल्याही जातात. परंतु जीत हार एवढी गंभीरपणे घेतली जात नाही. बहुदा जिंकणारा त्याचा विजय नेहमीच्या मित्रांच्या आणि पैज हारणाऱ्याला बरोबर घेऊन साजरा करतो. गाडे सरांनी अतिशय सुंदर
ReplyDeleteलेख लिहिला आहे. रसाळ आणि ओघवती भाषाशैली मुळे नकळत आपण आपल्या भूतकाळात म्हणजे विद्यार्थी जीवनातल्या आठवणीत रममाण होतो. गाडे सरांचे काका स्व. विष्णुपंत गाडे यांची आणि माझी, गुळाच्या व्यापाराच्या निमित्ताने चांगली ओळख होती. सरांच्या वडिलांनाही मी ओळखत होतो. धन्यवाद गाडे सर.
नमस्कार.
Deleteधन्यवाद