म्हणींचे म्हणणे
' दिव्याखाली अंधार' ही म्हण जेव्हा मी शाळेत असताना पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला प्रश्न पडला होता की असं कसं असू शकेल. दिवा म्हणजे त्यावेळी प्रामुख्याने बल्ब असायचे. ते वरती टांगलेले असत. त्यांच्या खाली उजेडच असायचा मग असे कसे? नंतर केव्हातरी लक्षात आले की या म्हणीतील दिवा म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा असला पाहिजे. अशा दिव्याखाली अंधारच असतो. पण या म्हणीमुळे 'जो विचार सांगतो त्याच्या जवळपास त्याचे अनुकरण होतेच असे नाही' हा बोध झाला.
म्हणी ह्या माणसांच्या आयुष्याच्या अनुभवातून तयार होतात आणि पिढ्यानुपिढ्या चालत राहतात. अगदी कमी शब्दात जास्त बोध करून देतात. मानवी जीवन हजारो वर्षे शेतीला, गावगाड्याला धरून स्थिर राहिले. त्यामुळे अनेक जुन्या म्हणी या जीवनानुभवाशी संबंधित आहेत. पण औद्योगिकीकरणाने शहरांची वाढ झाली. त्यामुळे जीवनानुभव बदलला. त्यामुळे या म्हणी आता कालबाह्य झाल्या आहेत असे वाटते.
अशी एक आता कालबाह्य झालेली म्हण म्हणजे, 'घरोघरी मातीच्या चुली'. ही म्हण मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा घरोघरी चुलीऐवजी स्टोव्ह हे सर्रास होते. आता हळूहळू हा प्रवास एलपीजीपर्यंत झाला आहे. त्यामुळे आता , ' घरोघरी एलपीजीची शेगडी ' असे म्हणायला हवे. अजून एक अशीच म्हण म्हणजे ' कुणाला कशाचं आणि बलुत्याला पशाचं ' . पूर्वी बलुतेदारी पद्धत होती. खळ्यात धान्य करताना शेतकरी आणि त्याचे कुटुंबीय अगदी गडबडीत असायचे. पण त्याचवेळी वार्षिक बेगमी करण्याच्या दृष्टीने बलुतेदारांचे लक्ष किती पसा (ओंजळभर) धान्य मिळते आहे इकडे असायचे. ही म्हण आता कालबाह्य झालेली आहे. त्याचे अजून एक रूप मी ऐकलं ते म्हणजे, ' कुणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं '. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे केशवपन करण्याची समाजाच्या काही स्तरात पद्धत होती. ती आता नसल्याने ही म्हणदेखील कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे आता ' कुणाला कशाचं आणि .......' हे ज्यानं त्यानं आपल्या अनुभवाने जोडावे.
काही म्हणींमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी तर मला अजून समजलेल्या नाहीत. उदाहरणार्थ ' बैल गेला नि झोपा केला ' यामधील झोपा म्हणजे काय ते मला अजून माहिती नाही.
बदलत्या काळानुसार नवनवीन म्हणी तयार होत असतात आणि समाजजीवन पुढे जात असते.
सुधीर गाडे पुणे
बैल गेला म्हणजे मरण पावला व त्यानंतर त्यासाठी झोपा म्हणजे गोठा तयार केला (ह्या अर्थी ही म्हण वापरली जाते)
ReplyDeleteधन्यवाद.🙏
Deleteखूपच छान आणि प्रासंगिक सुद्धा
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete