शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीने वर्णिलेली शिवरायांची मुत्सद्देगिरी

 सा.विवेकच्या 'शिवऋषींची शिवसृष्टी' या चैत्र पौर्णिमा, शिवपुण्यतिथी १६/०४/२०२२ ला प्रकाशित अंकातील लेख


सरित्पतीचे जल मोजवेना, 

माध्यानीचा भास्कर पाहवेना,

मुठीत वैश्वानर साहवेना, 

तैसा शिवाजी नृप वर्णवेना



       या उक्तीप्रमाणे शिवरायांची थोरवी शब्दमर्यादेत बद्ध करणे अशक्य आहे. परंतु शिवचरित्र जनमानसात पोचवण्याचा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांनी याबाबतीत उत्तम असे वर्णन केले आहे. शिवरायांच्या अनेक गुणांपैकी त्यांच्या मुत्सद्दीपणाचे वर्णन बाबासाहेबांनी कसे केले आहे ह्याची मोजकी उदाहरणे पाहणे उद्बोधक ठरेल. पुढे अवतरणचिन्हात दिलेली वाक्ये बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाच्या सोळाव्या आवृत्तीमधील आहेत.

       स्वराज्य उभे रहावे ही ईश्वराची इच्छा आहे या श्रद्धेने स्वराज्याचा व्याप वाढवायला शिवरायांनी सुरूवात केली आणि सुरूवातीच्या टप्प्यात पेचप्रसंग उभा राहिला तो आदिलशाहने कपटाने शहाजीराजांना कैद केल्यावर. या प्रसंगात शिवरायांनी तोपर्यंत कुणालाही न सुचलेली युक्ती केली. वर्णन करताना बाबासाहेब लिहितात, ' आता बादशाह काय करील, ही काळजीही दाटली. राजे चिंताक्रांत झाले. पण लगेच त्यांची टाळी वाजली. सुचली युक्ती! ' शिवरायांनी दिल्लीचा बादशहा शहाजहानचा मुलगा मुरादबक्ष याला शहाजीराजे आणि आपण स्वतः चाकरीला तयार असल्याचे पत्र लिहिले. याचा परिणाम झाला. ' बादशाह आदिलशाह भांबावला. आता या पेचांतून अब्रूनिशी कसे सुटायचे? जर शहाजीला सजा फर्मावावी , तर मोंगलाचे भय शिवाजीने उभें केले आहे. जर शहाजीला तुरूंगातून सोडावें, तर दरबाराची इभ्रत जाते. आता काय करायचे?' या पेचातून सुटण्यासाठी शहाजीराजांची सुटका बादशाहला करावीच लागली. या वर्णनावरून लक्षात येते ती ऐन तारूण्यात शिवरायांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी. अनुभवी सरदार , वजीरांनी घातलेला पेच शिवरायांनी सहजासहजी सोडवला. वडिलांचे प्राण वाचले आणि स्वराज्यदेखील ! या प्रसंगाच्यावेळी शिवराय केवळ १९ वर्षांचे होते हे लक्षात घेतले पाहिजे.

       विजापूरचा महंमद आदिलशाह हा मृत्यू पावल्याची संधी साधून शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यात असलेले दाभोळ आणि आजूबाजूचा मुलूख काबीज केला. याची प्रतिक्रिया विजापूरकर नक्की देतील हे ओळखून शिवरायांनी शाहजहानचा दुसरा मुलगा औरंगजेब याच्याकडे आपले दूत सोनोपंत डबीर यांना पाठवले. लक्षात घेण्याचा मुद्दा की पूर्वी मुरादबक्षकडे पत्र पाठवले होते आता औरंगजेबाकडे दूत. ' औरंगजेबाकडे कशाकरिता? तर, आतापर्यंत विजापूरकरांचे जे जे किल्ले, मुलूख अन् दाभोळ बंदर आपण जिंकून घेतले आहे, त्याला दिल्लीच्या शाहजादा औरंगजेबाची मान्यता मिळविण्याकरिता. म्हणजे मुलूख जिंकला विजापूरच्या बादशाहाचा व त्याला मान्यता घेत होते दिल्लीच्या औरंगजेबाची!' 'महाराजांनी सोनोपंतांच्या मार्फत औरंगजेबाला निष्ठेचा धूपदीप दाखवला. मोरपिसांचा कुंचा त्याच्या तोंडावरून फिरवला आणि सातच दिवसांनी....' शिवरायांनी मोगलांच्या मुलूखात छापे घालून धनदौलत मिळवली. परत सोनोपंत औरंगजेबाकडे गेले. ' पंतांनी अगदी गंभीर मुद्रेने औरंगजेबाकडे नम्र प्रार्थना कथन केली. केलेल्या लुटीबद्दल महाराजांस किती दुःख होत आहे, हेंही सांगितले. पण लुटून नेलेली दौलत परत करतो असे चुकूनही या बिलंदर वकिलाच्या तोंडून वाक्य निघाले नाही ! ' औरंगजेबाने माफी केली.‌' ते कारण म्हणजे औरंगजेबाचा बाप शाहजहान बादशाह तिकडे आग्र्याच्या किल्ल्यांत आजारी पडला होता.‌' वाह रे मुत्सद्देगिरी!

      शिवरायांच्या वाढत्या पराक्रमाला पायबंद घालण्यासाठी पैजेचा विडा उचलून विजापूरहून अफजलखान चालून आला. शिवरायांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने तुळजापूर , पंढरपूरवर हल्ला केला. विजापूरच्या बादशाहाचे सरदार, शिवरायांचे सख्खे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकर यांनी पकडून ठार करण्याची तयारी सुरू केली. ' अखेर महाराजांनी एक उपाय योजला.‌ खानाच्याच सैन्यात नाईकराजे पांढरे म्हणून मातबर मराठा सरदार होते. तेवढेच एक सरदार, वजनदार, कदीम निंबाळकरांना जवळचे होते. पांढरेराजांच्या मनाला काही कौल लावून पाहावा, झाला तर उपयोग होईल, अशा आशेने महाराजांनी नाईकराजे पांढऱ्यांकडे एक विनंतीचे पत्र अत्यंत गुप्तपणे ताबडतोब पाठवून दिले.' पांढऱ्यांच्या रदबदलीमुळे मोठ्या रकमेच्या जामीनावर बजाजींची सुटका झाला. एक पेच मुत्सद्देगिरीने सुटला होता.



 दूरदर्शी शिवरायांनी आपले स्वतःचे आरमार उभे केले होते. जहाजातून ते स्वतः कारवारच्या स्वारीवर गेले. तेथे पोचल्यावर तिथल्या विजापूरचा सरदार शेरखान याने शिवरायांना हल्ला न करण्याचा निरोप दिला. त्यावर शिवरायांनी शहर सोडून जा, सूड घेण्यास मुभा द्या किंवा इंग्रजांची गलबते स्वाधीन करा असा निरोप पाठवला. ' म्हणजे संक्रांत आली इंग्रजांवरच! शेरखानाने सर्व विचार केला.' ' पण शेरखानानेच स्वतः पुढाकार घेऊन कारवारातील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमविली. इंग्रजांनीही ११२ इंग्रजी पौंडांच्या किमतीची रक्कम दिली. असा मोठा नजराणा शेरखानाने महाराजांस पाठविला.' लढाई न करता महाराजांनी मोठी संपत्ती मिळवली.

       औरंगजेबाने सरदार मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर आक्रमणाला पाठवले. यावेळी होणारी हानी लक्षात घेऊन शिवरायांनी विजापूरकरांकडे आपण एक होऊन मोंगली फौजेला तोंड देऊया असा प्रस्ताव पाठवला. ' आपल्या एका शत्रूची मदत मिळवून दुसऱ्या शत्रूचा पराभव करण्याची महाराजांची कल्पना व कोशिस मुत्सद्देगिरीची होती यात शंकाच नाही. परंतु विजापूर दरबारने हा महाराजांचा धूर्त डाव पार उडवून लावला.' विजापूरकरांनी मुत्सद्देगिरी दाखवली. ' महाराजांचे एक राजकारण फसले. परंतु मिर्झाराजे मात्र हादरले!' मुत्सद्देगिरीत नेहमी यश मिळतेच असे नाही पण काही ना काही परिणाम निश्चित होतो.

पुरंदरचा तह झाल्यानंतर शिवरायांना मिर्झाराजे यांच्याबरोबर विजापूरवर चालून जावे लागले. सुरुवातीला मिळालेल्या यशानंतर मात्र विजापूरच्या वेढ्यात प्रचंड पराभव होऊ लागला. दिलेरखान याबाबत शिवरायांवर संशय घेऊन त्यांचे प्राण घ्यायला टपला. त्यावेळी शिवरायांनी पन्हाळा किल्ला जिंकण्यास जातो असे मिर्झा राजांना कळवले. ' मिर्झाराजांना मनापासून समाधान वाटले. हायसेंच वाटले. शिवाजीराजांच्या प्राण रक्षणाच्या काळजीतून मिर्झा राजे सुटले. महाराजांनाहि दिलेरखानाच्या आंतरिक कपटाची जाणीव झाली असावी. महाराजांनी हा पन्हाळ्याचा डाव मधेच उकरून काढला, तो सर्व बाजूंनी इतका अचूक होता की, महाराज विजापूरची आघाडी सोडून का गेले याबद्दल कुशंका कोणाला येऊच नये!'

मिर्झाराजे यांच्या आग्रहाखातर शिवराय औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले. दरबारात बादशाहने अपमान केला. स्वाभिमानी शिवरायांनी प्रत्युत्तर दिले आणि ते कैदेत अडकले. मिर्झाराजे यांचा मुलगा रामसिंह शिवरायांना जामीन राहिला होता. त्याला जामिनकी रद्द करण्यासाठी शिवराय आग्रह करू लागले. ' महाराज एका कपटी व क्रूर माणसाच्या आणि एका विश्वासू, प्रेमी अन् मनाने थोर अशा माणसाच्या कैदेत पडले होते.' अखेर औरंगजेबाने रामसिंहाला जामिनकीतून मोकळे केले. 'रामसिंहाला अगदी हायसे वाटले! आणि महाराजांना त्याहूनही हायसे वाटले!' सुटण्याची खटपट चालू झाली. ' परंतु तरीही दरबारातील व शहरातील बड्या बड्या मंडळींशी महाराज प्रेमाचे संबंध ठेवीत होते आणि वाढवीतही होते आपल्या माणसांमार्फत महाराज त्यांच्यावर प्रेम करीत होते! अनेकांना भेटीदाखल काही ना कांही चिजा पाठवून, पैसे पाठवून प्रेमाची लागवड चालू होती!' शिवरायांनी औरंगजेबाच्या परवानगीने काही सोबत्यांना माघारी पाठवले आणि ते आजारी पडले! ' महाराजांचे हे दुखणे पाहून त्यांच्या सख्यासोबत्यांना मात्र मनांतून गंमत वाटत होती.‌महाराज हा एक नवीनच गनिमी कावा करीत होते.' शिवराय सुखरूप निसटले. परतीच्या प्रवासात त्यांनी संभाजी राजांना मथुरेत ठेवले. शोध संपावा म्हणून ' संभाजीराजे मरण पावल्याची कठोर अफवा महाराजांनी उठविली होती.' त्यामुळे शोधमोहीम थंडावल्यावर संभाजीराजे सुखरूप रायगडावर पोहोचले. आपले वकील रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत सुटावेत यासाठी शिवरायांनी औरंगजेबाला तहासाठी पत्रे लिहिली. 'आपण बादशाहची परवानगी न घेताच आग्र्याहुन निघून आलो याबद्दलही महाराजांनी न विसरता खेद व्यक्त केला.' ' महाराजांची ही पत्रे पाहून औरंगजेबाला जरा नवलच वाटले. प्रथम त्याला वाटले होते की हा बंडखोर आपल्यावर चिडून पळाला आहे, तेव्हा हा पुन्हा दंगा माजवील. पण हा तर अजूनही नम्र बंदा नौकरच म्हणवितो आहे तूर्त उत्तमच झालें.' ' तहाबरोबरच महाराजांनी रघुनाथपंत व त्र्यंबकपंत यांच्या सुटकेची मागणी केली औरंगजेबाने ताबडतोब मान्य केली व उभयता पंत शाही तुरुंगातून सुटले.' मुत्सद्दीपणामुळे मृत्यूच्या मगरमिठीतून शिवराय स्वतः सर्व सहकाऱ्यांसह सुखरूप परत आले. हा एकूणच प्रसंग शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा कळसच आहे असे वाटते.

शिवरायांनी राज्ययंत्रणेत मोठे बदल केले. वतनदारीची पद्धती बंद केली. परंतु त्यांचे दुहेरी व्याही पिलाजीराजे शिर्के यांनी आपल्या वतनाची मागणी केली. त्यावेळी नातू झाला की वतन देऊ असे शिवरायांनी त्यांना सांगितले. ' म्हणजे आपल्या दोघांनाही नातू झाला की त्यालाच वतने देऊ ! म्हणजे आणखी निदान दहा-बारा वर्षे तरी बोलूच नका महाराजांनी शहाजीराजांच्या तोंडाला कुलूप घालून टाकले ! ' जवळच्या नातेवाईकांशी वागतानाचा हा मुत्सद्दीपणा वेगळाच आहे.

 राज्याभिषेकानंतर शिवराय स्वराज्यविस्ताराला निघण्याच्या तयारीत असताना मोंगली सरदार बहादूरखान हा स्वराज्यावर चालून येण्याच्या तयारीला लागला. ' आणि मग महाराजांनी एक विलक्षणच गंमत केली. खास मराठी अकलेचा उतपटांग नमुना. बहादूरखानाशी महाराजांनी तहाची बोलणी सुरू करायचे ठरवले . ' ' बहादूरने महाराजांचा अर्ज औरंगजेबाकडे रवाना केला. महाराजांना खात्री होती की, हा आपला अर्ज औरंगजेबाकडे पोचायला व मंजुरीचे फर्मान यायला अजून तीन मास जरूर हवेत.' या कालावधीत मराठी सैन्याने कोल्हापूर आणि शिवरायांनी स्वतः फोंडा किल्ला, अंकोला, शिवेश्वर, काद्रा, कारवार हा मुलूख जिंकला. जेव्हा तह मंजूर झाल्याचे फर्मान आले तेव्हा बहादूरखानाचे ' वकील आले आणि महाराजांनी त्यांचे ऐकून त्यांना सरळ विचारले की, असा कोणत्या पराक्रमाचा दबाव तुमच्या खानसाहेबांनी आमच्यावर आणला आहे म्हणून आम्ही तुमच्याशी असला तह करावा ? ताबडतोब येथून चालते व्हा !' शिवरायांनी तहाची बोलणी करत असल्याचे भासवून त्याच काळात दुसरीकडे स्वराज्याचा विस्तार केला होता.

कर्नाटकातील मोहिमेवर कुत्बशाहाच्या भेटीला शिवराय निघाले.' महाराजांना कुत्बशाहाच्या भेटीतून आणखी एक फार मोठे राजकारण साधावयाचें होते. तें म्हणजे ' दक्षिणी पक्षांची एकजूट'.' आदिलशाही आणि कर्नाटकात पठाण वरचढ झाले होते. ' तेव्हा या पठाणांना दक्षिणेच्या राजकारणातून नामोहरम करण्यासाठी व तदनंतर दिल्लीच्या जबरदस्त मुघल बादशाहीशी टक्कर देऊन औरंगजेबालाहि नामोहरम करण्यासाठी महाराज ही ' थोरली मसलत' करत होते. औरंगजेब हा महाराजांचा शत्रू होता. तसाच तो कुत्बशाहीचा व विजापूरच्या आदिलशाहीचाहि भयंकर शत्रू होता. हे दोघे सुलतान जरी मुसलमान होते तरीही ते औरंगजेबाला नको होते. कारण त्याला हिंदुस्थानावर एकछत्री मुघली अंमल बसवावयाचा होता. महाराजांच्या नवोदित स्वराज्याला सर्वात जास्त धोका औरंगजेबाचाच होता . म्हणून प्रथम पठाणांना व नंतर औरंगजेबाला टक्कर देण्यासाठी महाराजांनी अशी अस्मिता निर्माण करण्यास सुरूवात केली की, ' दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणियांचे हाती राहिली पाहिजे. ' केवढा हा दूरदृष्टीचा मुत्सद्दीपणा !

शिवरायांनी आपले सावत्र बंधू एकोजीराजे यांच्याशी समेट घडवण्याचा प्रयत्न कर्नाटक स्वारीत केला. परंतु एकोजीराजांनी शिवरायांच्याकडे आलेले दुसरे सावत्र बंधू संताजीराजे यांच्यावर हल्ला केला आणि एकोजीराजांचा पराभव झाला. ' महाराजांना लढाईची वार्ता समजली. ही ऐकून सुख मानायचें की दुःख मानायचे हाच प्रश्न होता.' त्यांनी संताजीराजे यांना कळविले की एकोजीराजे आपलेच भाऊ आहेत त्यांचे राज्य बुडवू नका. दीपाबाई या एकोजीराजे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या गुणांचे शिवरायांना कौतुक वाटत असे. ' त्यांनी आपल्या वहिनीला बेंगळूर होसकोटे व शिरे हे प्रांत चोळी बांगडीसाठी देऊन टाकले . एकोजीराजांनाही जिंजीनजीकचा सात लाखांचा मुलुख महाराजांनी दूधभातासाठी देऊन टाकला. ' पराभवामुळे एकोजीराजे खिन्न झाले. ' त्यांचे हें अविवेकी वैराग्य व खिन्नावस्था महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी त्यांना एक अतिसुंदर पत्र लिहिले. ' घरातील पेच सोडवतानाही शिवरायांना मुत्सद्दीपणा दाखवावा लागला.

       यासारखे शिवरायांच्या चरित्रातील मुत्सद्देगिरीचे अनेक प्रसंग बाबासाहेबांनी आपल्या प्रभावी शब्दांत जिवंत केले आहेत. वाचकाला घडणाऱ्या प्रसंगी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित आहोत याचा अनुभव येतो. हे शब्द सामर्थ्य शिवशाहीरांचे! त्यासाठी त्यांना मानाचा त्रिवार मुजरा!


सुधीर गाडे पुणे

Comments

  1. अलौकिक . महाराजांचा विजय असो.

    ReplyDelete
  2. किरकोळ चुका आहेत. दुरुस्ती करून घ्या 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख