एकसुरीपणा
( २३/०२/१९९५ यादिवशी रात्री १०:२० वाजता लिहिलेले स्फुट)
काही वायूंचं वर्णन करताना रसहीन रंगहीन चवहीन असं केलं जातं. आयुष्याचंही असंच काहीतरी असावं. एकदा का सगळं मार्गी लागलं की मग सर्व दिवस एकाच रंगाचे असतात. तोच दिवस तीच कामं फक्त वरच नाव बदलायचं. त्याच त्याच पायवाटेवर पुन्हा तीच तीच पावलं उमटवीत चालायचं. ते सुद्धा त्याच त्या ठिकाणाकडं. झालाच तर कधीमधी थोडासा बदल. त्याच त्या गोष्टींबद्दल चर्चा नि गप्पा. तरीसुद्धा या सर्व गोष्टी सारख्याच तन्मयतेनं करत राहिलं पाहिजे आणि आहे त्यातून आनंद शोधायला शिकलं पाहिजे.
( हा मजकूर लिहिला तेव्हा मी दमणमध्ये एका कंपनीमध्ये साचेबद्ध स्वरूपाचे काम करत होतो. तोपर्यंत मी विंदा करंदीकर यांची 'तेच ते' ही कविता वाचली नव्हती. नंतर बऱ्याच वर्षांनी ती वाचली. त्यातही याचसारख्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुढील मजकूर १८/०४/२०२२ ला लिहिला आहे.)
काही बाबतीमध्ये हा एकसुरीपणा आवश्यक असतो. काही गोष्टी परत परत त्याच पद्धतीने कराव्या लागतात. त्यातून काही गोष्टी निर्माण होतात किंवा साध्य होतात. रोज काहीतरी नवे करण्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. उदाहरणार्थ शरीर कमावण्यासाठी अथवा काही आजारावर मात करण्यासाठी त्याच त्याच प्रकारच्या व्यायाम परत-परत करावा लागतो. विद्यार्थी जीवनात काही गोष्टी चांगल्या स्मरणात राहण्यासाठी परत परत म्हणाव्या लागतात, लिहाव्या लागतात.
माणसाच्या आयुष्यामध्ये असणारा हा एकसुरीपणा घालवण्यासाठी छंद ,आवड यांची खूप खूप मदत होते. छंद जोपासण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे काहीतरी नवीन घडत राहते. व्यक्तीला जी आवड आहे ती पुरवण्यासाठी सवड काढावी लागते. या दोनही बाबतीमध्ये समानशील व्यक्तींची ओळख होते. एक वर्तुळ बनते. त्याने नव्या प्रकारचे अनुभवदेखील मिळतात. यातूनच एकसुरीपणा दूर होतो. बहुधा पु.ल.देशपांडे यांचे असलेले वाक्य याबाबत लक्षात ठेवायला हवे. " तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या ती तुम्हाला जिवंत ठेवेल दुसऱ्या रुपयाचे फूल घ्या ते तुम्हाला का जगायचे ते शिकवील."
सुधीर गाडे, पुणे
फारच छान. फक्त शेवटची ओळ जरा काहीतरी चुकतंय असं वाटतंय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हंटले आहे का? दुसऱ्या रुपयाचे पुस्तक घ्या ते तुम्हाला का जगायचे ते शिकवील."
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमला हे वाक्य नेमके कुणाचे आहे याची खात्री नाही. तुम्ही संदर्भ दिलात तर बरे होईल.