बेधडकपणा

   (२८/०२/१९९५  रोजी लिहिलेले स्फुट)

 काही प्रसंगी वागताना आपण बेधडकपणे वागतो. परंतु थोडा काल गेल्यानंतर आपल्याला त्याच्यातले धोके, त्रुटी लक्षात येतात. तेव्हा मग मन चुकचुकू लागतं की ' अरे आपण असं वागायला नको होतं'. पण एकदा प्रसंग घडून गेला की मग फक्त उरते ती चुटपुट. जी सगळ्या बेधडकपणावर पाणी फिरवते.



      काही घटना एकदम अनपेक्षित रीतीने आपल्यावर येऊन आढळतात नि काही क्षण आपली प्रतिक्रिया काय हेच आपल्याला कळत नाही. काही क्षणानंतर मग आपण सावरतो. विचार करू लागतो. पहिल्या क्षणी त्या घटनेच्या खरेपणावर जो विश्वास बसलेला असतो तो एकदम उडाल्यासारखा वाटतो. पण मग पुन्हा विचार करताना तीच घटना आधीच्या घटनाक्रमाची अटळ परिणिती आहे असं लक्षात येतं. तेव्हा कुठं आपला त्या घटनेवर विश्वास बसतो. पण तरीसुद्धा अधून मधून ती घटना खरी नसावी अशी वेडी आशा डोकं वर काढत राहते नि वास्तवाचा फटका बसल्यावर पुन्हा खाली जाते. जीवाला हळहळ लावीत.

( २६/०४/२०२२ ला लिहिलेला मजकूर)

   हे जुने लिखाण वाचताना मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना घडलेला प्रसंग आठवला. शेवटच्या वर्षाला आम्हाला गटाने प्रकल्प करायचा होता. त्यासाठी आम्ही मित्रांनी एक गट बनवला. एके दिवशी आमच्या विभागप्रमुखांनी आम्हा सगळ्यांना त्यांच्या कक्षात बोलावला. सांगितले की आमच्यापैकी एकाने दुसऱ्या एका गटात जायचे आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या एका मुलीला आमच्या गटात घ्यायचे. नंतर कळले की आमच्याबरोबर तिला कुणी सोबत घेऊन प्रकल्प करायला तयार नव्हते. बराच वेळ चर्चा झाली. पण कोणीही गट सोडायला तयार नव्हते. अचानक मी सांगितले की मी गट सोडतो. मी गट सोडला. ती मुलगी माझ्याजागी गेली. मी दुसऱ्या एका गटात गेलो. वर्षभर या गटातील दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर सतत वादविवाद होत असे. तो मिटवताना आम्हा बाकिच्यांना खूप खटपट करावी लागत असे. वर्षाच्या शेवटी प्रकल्पाची तोंडी परीक्षा संपवून मी जेव्हा माझ्या खोलीवर परतलो तेव्हा माझ्या भावना अनावर झाल्या.  एका अर्थी बेधडकपणे मी जो निर्णय घेतला त्याचा हा परिणाम होता.


सुधीर गाडे,  पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख