मन


  ( १/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

आपला आपल्या मनावर खूप ताबा आहे हा समज किती तकलादू असतो नाही. थोडं फार जरी मनाविरुद्ध घडलं तरी तोल जातो नि वेडेवाकडे शब्द तोंडातून बाहेर पडतात. अथवा बाहेर नाही पडले तरी ते आतल्या आत धुमसत राहतात. थोड्या वेळाने आपोआपच बाहेर पडतात जशी कोंडलेली वाफ आवाज करत बाहेर पडते. कधी कधी वाटत राहतं की नाही आपला तोल सुटणार नाही. पण शब्दाला शब्द वाढत जातो नि संयम, विवेक इ. गोष्टी कधी मागे पडतात हेच कळत नाही. सर्व शाब्दिक चकमक संपल्यानंतर राहते ती कडवट चव नि आपलं मन आपल्या ताब्यात आहे भ्रमाचा फुटलेला भोपळा!

 (७/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

    माणसाचं मन एक गंमतीशीर गोष्ट आहे. कुठल्याही प्रसंगाबद्दल, गोष्टीबद्दल मनात काही ठोकताळे बनवलेले असतात.‌ त्याप्रमाणे सर्व काही होत असेल तर चांगलंच असतं. पण घडत नसेल तर मात्र मग मनाचं अस्तित्व प्रकर्षानं जाणवू लागतं नव्हे अस्वस्थ करू लागतं. आणि मनाची ही अस्वस्थता अशी बोट ठेवून दाखवतासुद्धा येत नाही नि तिच्याकडे दुर्लक्षसुद्धा करता येत नाही. मग मात्र विचारांच्या घुसळणीने डोकं बेजार होऊन जातं. कधी कधी इतकं की शारीरिक क्रियांवरसुद्धा परिणाम होतो. म्हणून मनाला आवर घालणं हेच सर्वात योग्य पण सर्वात कठीण असं काम आहे.

     ( १०/०३/ १९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

       वाट चुकलेल्या जनावराला चाबकानं फटकावून रस्त्यावर आणलं जातं. तसंच  बहकलेल्या मनांनाही वाटेवर आणण्यासाठी अधूनमधून शब्दांचे आसूड फटकारावे लागतात म्हणजे ते ताळ्यावर राहतं. पण 'अति सर्वत्र वर्जयेत् '. 

  (२६/०३/१९९५ रोजी लिहिलेले स्फुट)

    ' मन वढाय वढाय' असं बहिणाबाई म्हणते ते किती खरं आहे नाही. मन ओढाळ जनावरासारखं वाटेल तिकडं फिरत असतं. शरीर आणि मन यांची जोडी नेहमी बरोबरच राहिल याची खात्री नाही. शरीर एकीकडे नि मन भलतीकडे असं होतं तेव्हा किती त्रास होतो. आणि जर मन भलतीकडे जातंय, त्याला तिकडे जायला नकोय ही जाणीव सुईसारखी टोचत असेल तर त्रास आणखी वाढतो. याला उपाय? मनाला बांधावं कसं हाच प्रश्न आहे. त्याचं उत्तर मिळालं तर आणखी काय हवं?

 (२७/०४/२०२२ रोजी लिहिलेले स्फुट)

      ' टूटे मन से कोई खडा नहीं होता और छोटे मन से कोई बडा नहीं होता' असे भारतरत्न कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कवितेत लिहिले आहे. माणसाचं मन मोडून पडलं असेल तर काही करून दाखवण्याची उभारीच राहिलेली नसते मग प्रतिष्ठित, धनवान , अधिकारी आईवडीलांच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा तरूण वयातच टोकाचं पाऊल उचलतो आणि अडचणी, समस्या यांच्याशी झुंजणारा मुलगा तरूण वयातच अधिकारी बनतो. मन संकुचित असेल तर सर्व काही असूनही माणूस दुसऱ्यांची काही पर्वा न करता स्वतःच्या कोशातच गुरफटून राहतो. मन उदार असेल तर अभावग्रस्त असलेला माणूसही मोठं काम करून जातो.

   ' मन देवाचे पाऊल मन सैतानाचा हात ' असं कवी कै. सुधीर मोघे यांनी त्यांच्या गीतात म्हटलं आहे. माणसाच्या मनात सुष्टपणा आणि दुष्टपणा या दोन्ही गोष्टी कमी अधिक प्रमाणात असतात. दुष्टावा जास्त असेल तर पैशांच्या मोहाने उच्च विद्या विभूषित डॉक्टर गर्भातच शेकडो भ्रूणांची हत्या करतो. मनात सुष्टपणा जास्त असेल तर वेळप्रसंगी आपली कामाची वेळ संपली असतानादेखील देवघर येथील कर्मचारी रोपवेच्या अडकलेल्या कारमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मदत करत राहतात. अशा लोकांची संख्या जेवढी वाढेल तेवढा समाज अधिक सुखी, समृद्ध होत जातो. 

    

सुधीर गाडे,  पुणे

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख