राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची पूर्वतयारी

          आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० स्वीकारले आहे. क्रमाक्रमाने या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. भारतकेंद्री शिक्षण,  कप्पेबंद पद्धती मोडून लवचिक पद्धतीने होऊ शकणारे शिक्षण ही या धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. ऐतिहासिक आणि प्रागैतिहासिक काळात भारताने ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली होती. परंतु याची पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातून मिळत नव्हती. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ही त्रुटी दूर करण्याची योजना करण्यात आली आहे. प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रगतीचे पुरावे आजदेखील पाहता येतात. उदा. गेली सुमारे दीड हजार वर्षे न गंजता उभा असलेला दिल्लीतील विष्णुस्तंभ. गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद या विषयांमध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहीर , सुश्रुत, चरक यांसारख्या विद्वानांचे योगदान तर सर्वमान्य आहे. या भारतकेंद्री धोरणाला प्रतिसाद देत आपण जागरूकपणे आपल्या देशातील प्राचीन प्रगतीची माहिती घ्यायला सुरूवात केली पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न वैयक्तिक तसेच सामूहिक स्तरावर करता येतील. अशा प्राचीन, ऐतिहासिक स्थळांना भेट, विविध पुस्तकांमधून यासंबंधीची अधिकची माहिती मिळवणे, तज्ञ व्यक्तिंची भेट आणि चर्चा यासारखे वेगवेगळे उपक्रम करता येतील.



      याबाबत आणखी एक मुद्दा भाषांबाबत. आपल्या देशातील भाषांच्या विविधतेइतकी विविधता जगात अन्य देशात क्धचितच आढळते. परंतु भारतात अन्य भाषांबाबतची द्वेषभावना, तिरस्कार क्वचितच आढळतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. याबाबत छोटे छोटे प्रयोग करता येऊ शकतात. विविध भाषांतील सोपीसोपी वाक्ये सहज शिकता येतील. विविध भाषांतील वाक्प्रचार, गीतांच्या ओळी समजावून घेता येऊ शकतात. 

    या शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावर मातृभाषेतील शिक्षणाला  प्राधान्य देण्यात आले आहे. आपल्या शाळेमध्ये आपण आपल्या मातृभाषेतच शिकतो. मातृभाषेतून शिकताना आपली भाषा अधिक समृद्ध कशी होईल , स्वत:ची शब्दसंपत्ती कशी वाढेल यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करू शकतो. तसेच मराठी भाषेमध्ये अद्ययावत ज्ञान , माहिती उपलब्ध होईल या दिशेने प्रयत्न करण्यामध्ये सहभाग घेऊ शकतो.

     या धोरणामध्ये कौशल्य निर्मितीलादेखील महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींच्यात वेगवेगळी कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी अगदी लहान वयापासून त्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. प्रस्तावित धोरणातील हा मुद्दा लक्षात घेऊन अशा प्रकारची कोणती कौशल्ये विकसित करता येतील यादृष्टीने विचार होऊ शकतो. यासाठी आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण , कौशल्याधारित व्यवसाय करणाऱ्या माणसांच्या भेटी , त्यांच्याशी चर्चा,  त्यातून वेगवेगळ्या कल्पना घेऊन  छोटे छोटे उपक्रम करता येतील. अशा प्रकारचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्यात श्रमप्रतिष्ठा हे मूल्यदेखील रुजेल असे वाटते. कौशल्याधारित व्यवसायांना आगामी काळात खूप महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये शालेय वयापासून रुजलेल्या कौशल्याचा मोठा उपयोग होऊ शकतो.

    या धोरणात मांडलेली शालेय संकुलांची कल्पना प्रत्यक्षात येत असताना परस्पर सहकार्याची, मदतीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या संस्थेच्या विविध उपक्रमांतून आपण १६१ वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांशी संपर्क आणि सहकार्य करीत असतो. हा परीघ आता विस्तारणार आहे. आपल्या संस्थेच्या विविध शाळांशी सहकार्य करण्याच्या अनुभव आपल्याला निश्चित उपयोगी पडेल.

     शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक शिक्षक शिक्षिका यांनी सरकारी योजना सुरू होण्याची वाट न पाहता स्वतःहून वेगवेगळे प्रयत्न सुरु केले पाहिजेत. अशा प्रयोगातून काही अनुभव नक्कीच जमा मिळेल. हा अनुभव ज्यावेळी धोरणाची अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळी उपयोगी ठरू शकतो. असे प्रयत्न करण्याची सुरुवात आपण लवकरात लवकर करूया.

सुधीर गाडे,  पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख