विसरणारा मी

  मध्यंतरी एका कार्यक्रमात एका वकिलांची भेट झाली. मी त्यांना माझी ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले, ' मी तुमच्या घरी येऊन गेलो आहे.' पण मला काही आठवले नाही. नंतर त्यांनी तपशील सांगितल्यावर मला लक्षात आले. 



   माझ्याबाबतीत असे हल्ली तर बरेचवेळा होते. मला माणसांची नावे, तपशील विसरायला होतो. गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी बऱ्याच वेळा गंमतीने म्हणतो, 'माझी मेमरी व्होलटाइल आहे.  ( संगणकातील तात्पुरत्या माहितीच्या साठ्याला व्होलटाइल मेमरी म्हणतात.) नाव परत विचारले तर रागावू नका.' एकदा  तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला मी म्हटले, ' अरे तास आहे आत्ता.' तो म्हणाला, 'सर, मी बारावी झालो आता.' बऱ्याच वेळा मी नावे विसरतो,‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ एकाच्या नावाने दुसऱ्या विद्यार्थ्याला हाक मारतो. अशीही गडबड होते. तरी हजेरी घेऊन मी नावांची उजळणी करत असतो.

     शाळा , महाविद्यालयातील सोबती, गावचे लोक,  संघाचे वेगवेगळ्या ठिकाणी सोबत काम केलेले, करणारे स्वयंसेवक यांचीही नावे तपशील विसरायला होतो. अवचित काही जणांची नावे तपशील लक्षात राहतो.

        बरेच वेळा अनेकांची भेट अगदी ५-१० मिनिटांसाठी होते. मग पुढची भेट अनेक दिवसांनी किंवा  महिन्यांनी किंवा वर्षांनी भेट झाली की मला नाव वगैरे आठवत नाही. मग ते म्हणतात ' ओळखलं का?' मी प्रयत्न करतो. काही इतर प्रश्न विचारून अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. मग कधी मी सांगतो की , ' नाही ओळखलं.' थोडा अनुभव असा आहे की ग्रामीण भागात विसरलो म्हटलं तर लोक फार मनावर घेत नाहीत. पण साधारणपणे 'नाही ओळखलं' असं म्हटलं की काहीजण ते समजून घेतात तर काही जणांना त्यामुळे दुखावल्यासारखे होते. पण ईलाज नसतो. काही वेळा त्या व्यक्तिची परत त्याच परिसरात भेट झाली की नाव आठवते. पण एखादी व्यक्ती वेगळ्या ठिकाणी भेटली की मात्र तिचे नाव आठवत नाही. मला असेही अनुभव आले आहेत. 

    स्मरणाची गंमत अशी आहे. मध्ये एकदा मी ११ वीत शिकत असतानाच्या प्रसंगाबद्दल मी लिहिले पण त्यावेळी माझ्या सोबत असलेल्या मित्राला तो प्रसंग आता आठवला नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना घडलेल्या दुसऱ्या एका प्रसंगाबाबत लिहिले तेव्हा त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या दुसऱ्या मित्राला तो प्रसंग आठवला नाही. मी धुळे जिल्ह्यात प्रचारक असतानाचा एक प्रसंग सहकारी कार्यकर्त्याने मला सांगितला पण मला तो आठवला नाही.‌ त्यामुळे प्रसंगाची तीव्रता वेगवेगळ्या व्यक्तिंना वेगवेगळी भासते. त्यामुळे स्मरण राहते किंवा रहात नाही. वयानुसारही स्मरण कमी होत जाते. काही वेळा व्यक्तिचा चेहरा आठवतो, अन्य तपशील आठवत नाही.

  यात अजून एक भर पडली आहे ती म्हणजे फेसबुकवर झालेल्या ओळखींची. त्यातल्या बरेचजणांशी प्रत्यक्ष भेट होण्याची वेळ आलेली नसते. केव्हातरी भेट होते तेव्हा ती व्यक्ती म्हणते, ' आपण फेसबुक फ्रेंड आहोत.' मग हो हो , हो ना,‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ हो का  असं उत्तर द्यावं लागतं. 

    विस्मरणाचे तोटे असले तरी काही वेळा विस्मरण हवेहवेसे वाटते. अपमान, उपेक्षा, दुःख यांचे विस्मरण व्हावे असे वाटते. आपल्या चुका, फजिती इतरांनीही विसराव्यात असे वाटते. पण मानवी मन मात्र ते जास्त लक्षात ठेवते. अशा प्रसंगाची धार काळ जातो तसा हळूहळू बोथट होत जाते. पण विस्मरण पूर्णपणे होत नाही.

   समाजमाध्यमांवर एक विनोद अधूनमधून येत असतो.‌ 'आमच्या लहानपणी दोन रट्टे बसले की सगळं आठवायचं. त्यासाठी बदाम खाण्याची आवश्यकता नव्हती.' हा विनोद बाजूला ठेवला तरी स्मरण वाढवण्याचे वेगवेगळे प्रयोग आहेत. त्यापैकी काही करता येतील. एखाद्या नवीन व्यक्तिची ओळख झाली की तिची इतर अधिक माहिती घ्यायची. एखादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची. याचा फायदा होऊ शकतो. मी प्रयत्न करत राहतो पण यशही येतं. अपयशही येतं. असो.

सुधीर गाडे,  पुणे





Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख