मनातलं जनासाठी भाग ३
हा छोटा ॲक्सिडेंट झाल्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. मुर्डीकाका क्लब हाऊसच्या जवळ फेऱ्या मारत होते. तेवढ्यात तिथं नेहमीप्रमाणे जमलेल्या e गृपमधल्या रमोलाचं लक्ष त्यांच्याकडे गेले आणि तिनं त्यांना हाक मारली, " मुर्डी अंकल हाय? कसे आहात?"
" मी मजेत.तुमच्या काय गप्पा चालल्यात वाटतं?" मुर्डीनीं उत्तर दिलं.
" या ना अंकल." हे रमोलाचं बोलणं ऐकून प्रफुल्ल मुर्डी त्यांच्याजवळ गेले.
" हा मनोज आमचा लीडर, हा विजयंत, ही निधी, ही सानिया, सुकेत आणि प्रत्युषशी तर तुमची ओळख झाली आहेच." रमोलाने सगळ्यांची ओळख करून दिली आणि सगळ्यांनी मुर्डीना हाय हॅलो केले.
" अरे, काल या अंकलनी माझी किती हेल्प केली माहितीये?" रमोला म्हणाली.
यावर मुर्डी म्हणाले " तुला अंकलची मदत झाली असं म्हणायचंय का?" मुर्डी म्हणाले.
"अहो अंकल, माझी हेल्प केली असंच म्हणतात ना सगळेजण."रमोला
यावर मुर्डीनी थोडा श्वास घेतला आणि म्हणाले, " हो,बरेचजण असंच म्हणतात हे खरं आहे पण ते बरोबर नाही.आपल्या मराठीवर आधी इंग्लिशचा आणि आता हिंदीचाही प्रभाव वरचेवर वाढत चाललाय.विशेषतः हिंदी चित्रपट आणि हिंदी माध्यमे म्हणजे हिंदी मीडियाचा प्रभाव लोकांवर पडतो आहे.त्यामुळं लोक हिंदी वळणाचं मराठी बोलू लागलेत, लिहू लागलेत.हिंदीमध्ये मेरी मदद की असं म्हणतात त्याचं मराठीत माझी मदत केली असं म्हणू लागले.पण ते खरं म्हणजे मला मदत केली असं म्हणायला हवं."
"असंय का, मला तर आयडियाच नव्हती." निधी उद्गारली.
मुर्डी पुढं सांगू लागले, " अशी अनेक उदाहरणे सहज सांगता येतील.अनेकवेळा आपण ऐकतो ' पत्रक जारी केले' पण ते ' पत्रक प्रसिद्ध केले' असं असायला पाहिजे. ' जेवण बनवलं ' असं नसून ' स्वयंपाक केला ' असं पाहिजे, ' असं नाही आहे ' नसून ' असं नाही ' असं हवं, ' शासनाचा फैसला ' असं नसून ' सरकारचा निर्णय ' , ' कार्यक्रम संपन्न झाला ' नसून ' कार्यक्रम साजरा झाला ', ' आपण नाही असं करायचं' असं नसून ' आपण असं करायचं नाही' , ' नाही केल्या पाहिजे ' असं नसून ' करता कामा नये' अशा अनेक गोष्टी आपल्या लक्षात यायला हव्यात."
" पण, अंकल त्यानं काय फरक पडतो? कारण कम्युनिकेशन म्हणजे स्वतःचं म्हणणं पोचवण ना?" मनोजनं विचारलं.
"तुझं बरोबर आहे." मुर्डीअंकल बोलू लागले, " संवाद हा आपलं म्हणणं , भावना, विचार पोचवण्यासाठी आहे.आणि माणूस हा नेहमी गटागटाने राहू इच्छितो, त्यामुळे संवाद हा आवश्यक आहेच.पण ज्याकाळी नियमबद्ध भाषा नव्हती त्याकाळी शब्दांचा कसाही वापर होत होता.पण त्यातूनच माणसांनी विचारपूर्वक निरनिराळ्या भाषा शोधून काढल्या. त्यालाही काही हजार वर्षे झाली.त्यामुळे त्या भाषा वापरण्याची एक पद्धत बनून गेली.ती तशी पाळली जावी इतकंच."
" इतर भाषाही एकमेकांचे शब्द घेतातच ना? मग मराठीतही आले काही तर मग काय बिघडलं?" सानियाने एकदम बिनतोड वाटणारा प्रश्न विचारला.
" हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. अनेक भाषांनी एकमेकांचे शब्द घेतले आहेत खरे. पण भाषा ही त्या मानवसमूहाच्या प्रभावाशी जोडलेली आहे.उदा.जिथं जिथं इंग्रजांनी राज्य केलं तिथं तिथं त्या भाषांमध्ये इंग्रजी शब्द जास्त दिसतात.त्या स्थानिक भाषांमधले काही शब्द इंग्रजीतही घेतले गेले. पण तटस्थ विचार केला की लक्षात येतं की कुणाचा प्रभाव जास्त आहे ते. त्यामुळं अन्य भाषेच्या प्रभावाने भाषेत बदल झाला तर तो कळतनकळत भाषेबरोबर विचार, कल्पना, आयुष्य यावरही प्रभाव टाकतो आणि हळूहळू त्या भाषेबरोबर लोकांचंही वेगळेपण संपून जातं आणि ते उरतं केवळ एक अनुकरण. ज्या मराठी भाषिकांनी एकेकाळी जवळजवळ सगळ्या भारतावर राज्य केले आणि ज्या मराठीबद्दल संत ज्ञानेश्वरांनी ' माझा मराठाची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके' असा आत्मविश्वास जागवला त्या मराठी भाषिकांनी अन्य भाषांवर प्रभाव टाकण्यासारखं कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा घ्यायची हा विचार केला पाहिजे ना? आणि हल्लीच्या जगात भाषा हेदेखील प्रगतीसाठी एक महत्वाचे साधन किंवा हत्यार म्हणून वापरता येईल असं अनेक तज्ञ मंडळी सांगत असतात तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही मंडळी असं म्हणतात की सध्याचं युग हे बाजारपेठेचं आहे. बाजारपेठेत ग्राहक हा सर्वात महत्वाचा. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण जर आग्रहानं आपल्या भाषेचा वापर केला तर भाषेला महत्व मिळेल." मुर्डी म्हणाले.
" अंकल, तुमचं म्हणणं वेगळं वाटतंय पण त्यातही काही पॉइंट आहे असं वाटतंय. आम्ही नक्कीच त्याचा काही विचार करू." विजयंत म्हणाला.
" हो हो जरूर विचार करा.आणि महत्त्वाचं म्हणजे काही ठोस कृतीही करा." मुर्डी म्हणाले.
सगळ्यांनी माना डोलावल्या आणि विचार करू लागले की ह्या अंकलना अजून काय-काय माहिती आहे. असा विचार करत करत सगळे पांगले.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment