मनातलं जनासाठी भाग ६ ई व्यसन

       " काय मित्रांनो, कसं काय?" प्रफुल्ल मुर्डींनी विचारले. आज ई गृप जरा शांतच होता. नेहमीच्या ठिकाणी बसलेला असला तरी नेहमीचा उत्साह नव्हता. मुर्डींच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ' बरं आहे ' असं मनोज जेमतेम ऐकू येईल अशा आवाजात पुटपुटला. एकूण रागरंग लक्षात घेऊन मुर्डींनी विचारलं,‌‌'काय झालं? ' या प्रश्नावर थोडा वेळ कुणीच बोललं नाही. मग अगदी हळू आवाजात सानिया म्हणाली, ' काका,  समीरला रिहॅब सेंटरमध्ये दाखल केलं आहे?' ' कोण समीर? कसलं रिहॅब सेंटर?' मुर्डींनी चौकशी केली.  ' समीर, हा विजयंतचा आतेभाऊ आहे. तो नेहमी इथं येत असतो. पण त्याला मोबाईलचं ॲडिक्शन झालंय. म्हणून रिहॅब सेंटरमध्ये ठेवलं आहे.' 

    ' अरेरे, काय ही वेळ आली?' मुर्डी उद्गारले. काय झालंय हे त्यांच्या हळूहळू लक्षात येत होते. त्यांची समीरशी कधी भेट झाली नव्हती. म्हणून त्यांनी हळूहळू माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यातून त्यांच्या लक्षात आले की समीर हा एका कॉलेजात शिकत होता. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला एक चांगला मोबाईल फोन घेऊन दिला. तेवढ्यात कोविडची साथ सुरू झाली. सर्वत्र व्यवहार बंद पडले. शिक्षणही मोबाईलवर सुरू झाले. मग तर काय समीर अजूनच मोबाईलवर बिझी झाला. अभ्यासाबरोबरच अन्य गोष्टीत तो गुंतत गेला. आणि आज ही वेळ आली.

    मुर्डींनी हळूहळू बोलणे सुरू केले. ' काय रे मुलांनो, असं कसं तुमची पिढी व्हर्च्युअल जगात जगते?' ' अंकल, अहो या इंटरनेटवर इतक्या गोष्टी सहज होतात. बॅंकेचे व्यवहार, सर्व रिझर्व्हेशन्स , इतकंच काय जेवणही मागवता येतं' , प्रत्युष म्हणाला. ' हो आणि आमचं कॉलेजचं ॲडमिशनही आता इंटरनेटवरच होतं' सुकेत म्हणाला. 

' अरे पण यातून मुलं, मुली एकलकोंडी होतायत ना?' मुर्डी म्हणाले. ' एकलकोंडी म्हणजे काय हो अंकल ? ' रमोलानं विचारलं. ' एकलकोंडी म्हणजे फक्त स्वतःच्यामध्ये गुंतलेली, इतरांशी मुळीच संवाद न साधाणारी मुलं' मुर्डींनी उत्तर दिले. ' असं होय. समजलं.' रमोला उत्तरली.

   ' पण आता परिस्थिती गंभीर झाली आहे' मुर्डी सांगू लागले. ' मी नुकतीच एक बातमी वाचली. बंगळुरूच्या एका संस्थेने केलेल्या पाहणीत धक्कादायक निष्कर्ष निघाले आहेत.‌ मोबाईल वापरणारी जवळपास ७३ % मुलंमुली त्याच्या आहारी गेली आहेत. जवळपास ३०% जण नैराश्याने ग्रासले आहेत. '

    ' अरे बापरे म्हणजे समीरसारखीच बरीच मुलंमुली आहेत तर!' इतका वेळ शांत असलेला विजयंत पहिल्यांदाच बोलला. ' पण अंकल आजकाल तर बरंच लाईफ मोबाईलवर डिंपेंडंट आहे. मग काय करायचं?' मनोजनं विचारलं.

  ' अगदी महत्त्वाचं विचारलंस तू!' मुर्डी म्हणाले. ' असा विचार करायला  सुरुवात करणं हीच पहिली पायरी. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल या वर्चुअल जगात किती गुंतायचं आणि प्रत्यक्ष जगाला किती महत्त्व द्यायचं याचा निर्णय तुमचा तुम्हाला करावा लागेल वाट तुमची तुम्हालाच सापडेल.'

मुर्डींचं बोलणे ऐकून विजयंत म्हणाला, ' म्हणजे समीरला होप्स आहेत' ' अरे हो तर! म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है. हे विसरू नका कधीही.' मुर्डी म्हणाले आणि सर्वांना जरा बरं वाटलं.


 मुर्डी आणि इ गृप यांचं नातं आता कोणत्या वळणावर जाणार हे हळूहळू उलगडत जाणार होते.


सुधीर गाडे, पुणे 










Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख