मनातलं जनासाठी भाग ९ कलेची चोरी
उत्सवाचे धामधुमीचे दिवस चालू होते. बोस्टन काऊंटीमध्ये एकच लगबग सुरू होती. ई गृपही अगदी मन लावून सगळ्यात सहभागी होत होता. तयारी जोरात चालली होती. सगळे एकत्र जमले होते तेव्हा एकदम विजयंत म्हणाला, " कसले चीप आहेत लोक! आपली आयडिया ढापली." " हो ना. स्वतःला काही नवीन विचार करायला नको. त्यामुळे आपलं आयतं मिळालं ते उचललं. " रमोला उद्गारली. " काय रे, काय एवढे चिडलायत? " प्रफुल्ल मुर्डींनी विचारले. " बघा ना अंकल, आमच्या आयडियाची उचलेगिरी करून काम चालू आहे ह्या शेजारच्या लोकांचं." मनोजने उत्तर दिले. " आम्ही ठरवलं काय सजावट करायची. ते कुठून तरी या लोकांनी पाहिलं आणि लगेच कॉपी केली. " निधी बोलली. " इतका राग आलाय ना या लोकांचा. काय करू नी काय नको असं वाटतंय." सानिया म्हणाली.
आता एकूण रागरंग मुर्डींच्या लक्षात आला. ते म्हणाले, " अरे मित्रांनो ही तर कल्पनेची चोरी झाली. हे होत आलंय. पैशांची, दागदागिन्यांची चोरी करणारे तर अनेकजण आहेत. पण कलेची चोरी करणारेदेखील काही जण असतात." आता ई गृप लक्ष देऊन ऐकू लागला. " कलेची चोरी, म्हणजे कशाची चोरी झाली, अंकल?" प्रत्युषने विचारले. " अरेच्चा, तुम्ही ती बातमी वाचली नाही वाटतं. " मुर्डी म्हणाले. " कुठली बातमी? तुम्हीच सांगा , अंकल" सुकेत म्हणाला.
" सांगतो.सांगतो." मुर्डी सांगू लागले." एका चित्रकलेच्या महाविद्यालयात पूर्वी भरवलेल्या चित्रांच्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या चित्रांमध्ये किरकोळ बदल करून , त्यावर स्वतःचं नाव लिहून एकक चित्रकाराने प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये त्या चित्रांचं राजरोसपणे प्रदर्शन भरवले. " " कमाल आहे, या चित्रकाराची!" निधी उद्गारली. " तोदेखील कलाकारच आहे ना? मग कशाला अशी चोरी करायची?" रमोलाने विचारले. " स्वतःच्या कलेवरून स्वत:ला प्रसिद्धी मिळत नसेल बहुधा त्याला." मनोजनं अंदाज बांधला. " किंवा त्याच्या हातात तेवढी कला नसेल. " सुकेत म्हणाला. " पण मग ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांनी आपली चित्रे नेली का नाहीत?" प्रत्युषची शंका. " अरे त्या स्पर्धेच्या आयोजकांनी विजयी चित्रे परत मिळणार नाही असा नियम केला होता. " मुर्डींनी उत्तर दिले. " मग आयोजकांनी ती चित्रे सांभाळून ठेवायला नको का? त्यांचीदेखील चूक आहे." सानिया म्हणाली. " हो ना. आता या चित्र चोरणाऱ्या चित्रकाराने मी आयोजकांकडून चित्रे विकत घेतली असा दावा केलाय." " आता काय बोलायचं, कपाळ!" विजयंत म्हणाला. " पण मग त्यानं विकत घेतलेल्या चित्रात बदल का केले. स्वतःचं नाव का दिल?" मनोज म्हणाला.
" कलेच्या क्षेत्रात चोरी कशी होऊ शकते? " प्रत्युषने विचारले. " कारण कलाकार हा प्रतिभावान असतो ना? आपल्या प्रतिभेचा वापर करून त्यानं कलानिर्मिती करायची असते ना?" मुर्डी सांगू लागले, " बरोबर आहे तुझं. पण स्वतःच्या मर्यादांची जाणीव एखाद्याला होते. आपल्या क्षमतेवर प्रसिद्धी, पैसा मिळणार नाही असं त्याला वाटतं . पण प्रसिध्दी ,पैसा याची हाव सुटते आणि मग करतो असा उपद्व्याप. प्रामाणिकपणा हा सर्वच ठिकाणी महत्त्वाचा आहे याकडे दुर्लक्ष करतो असा माणूस." " पण मग आता याचे काय परिणाम होणार?" निधीने विचारले. " आता या प्रकाराची चौकशी होईल. नक्की कोण दोषी आहे हे शोधलं जाईल. दोषीवर बंदी घातली जाईल आणि ज्या प्रसिद्धी आणि पैशामागे हा चित्रकार लागला होता ते दोन्ही त्याला मिळणार नाही. एका अर्थाने तो आता आयुष्यातून उठला. " मुर्डी म्हणाले. " पण मग मूळ चित्रे ज्यांची आहेत त्यांना ती परत मिळणार का? " सुकेतचा प्रश्न. " मिळतील .मिळतील. " मुर्डी म्हणाले. तोच विजयंत म्हणाला, " एकंदरीत काय उचलेगिरी ही अजून काही ठिकाणी होते तर.अरे या डिस्कशनध्ये बराच वेळ गेला.आता परत कामाला लागूया." " होय मित्रांनो. मीही जमेल ती मदत करतो तुम्हाला." मुर्डी म्हणाले आणि सगळे कामाला लागले.
सुधीर गाडे, पुणे
छान सर...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteनुकत्याच आलेल्या बातमीवर एक सुंदर आणि छान लेख, अभिनंदन सर
ReplyDeleteधन्यवाद
Delete