बालपणीचा आनंद पुन्हा एकदा
काही दिवसांपूर्वी खरेदीला गेलो असताना ह्या गोळ्यांचे एक पाकिट घेतले.
लहानपणी या गोळ्या खूप आवडायच्या. या गोळीला दूध गोळी असे बहुधा म्हटले जायचे. मी शाळेत असताना बहुधा २५ पैशांना ही एक गोळी मिळायची. याबरोबरच आणखी एक गोळी मला आवडायची. ती म्हणजे खोबरा गोळी. त्यावेळी एकूणच गोळ्या बिस्किटे यांचे कमी पर्याय उपलब्ध असायचे. पण बाल वयात तशा एकूणच कमी अपेक्षा असतात आणि त्याकाळी एकूणच समाज म्हणून देखील कमी अपेक्षा असायच्या असे म्हणायला वाव आहे. पण अशा साध्यासुध्या गोष्टीतच आनंद वाटायचा. या दोन गोळ्यांसोबत अजून काही गोळ्या मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. त्या म्हणजे पेपरमिंट, लेमन अशा. ५ पैसे १० पैसे अशा किमतीत मिळणाऱ्या गोळ्या बालपणी आनंद देऊन जायच्या. मग कधीकधी मित्रांनी एकमेकांना गोळ्या घेऊन द्यायच्या. कुणीतरी आणलेल्या गोळ्या सगळ्यांनी वाटून घ्यायच्या. अशा मित्रांनी वाटून खाण्याच्या अजून बऱ्याच गोष्टी होत्या.
असाच एक स्मरणीय कार्यक्रम असायचा तो म्हणजे फोटो काढण्याचा. आजच्या काळात जवळपास सर्वांकडे मोबाईल फोन असल्याने आता फोटो काढणे फारच सुलभ झाले आहे. पण त्याकाळी साखरवाडी सारख्या गावांमध्ये फोटो काढण्याची सोय वर्षभर नसायची. पण वर्षभरातून काही दिवस फोटो काढणारे तंबू टाकून स्टुडिओ तयार करायचे आणि अशा स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढून घेणे हा एक कार्यक्रमच असायचा. मग तो दिवस ठरायचा. वेळ ठरायची. आई तयारी करून घ्यायची म्हणजे तिच्या शब्दात गंध पावडर करून घेते किंवा करून घ्या. मग त्या तंबूत गेल्यावर एखाद दुसरा पडदा पार्श्वभूमी म्हणून वापरला जायचा. त्या पडद्यासमोर बसून काही ठराविक पद्धतीने फोटो काढले जायचे. हे सर्व फोटो कृष्णधवल असायचे. तेव्हा ते फिल्मवर काढले जायचे. मग तो रोल संपल्यावर ३-४ दिवसांनी तो फोटो मिळायचा. असा मिळवलेला फोटो बघण्याचा आनंद काही औरच असायचा. असाच एक आमचा भावंडांचा शाळेत असतानाचा फोटो
नंतर काही वर्षांनी शाळेत वरच्या वर्गात गेल्यावर एनसीसीत प्रवेश घेतला. आता रंगीत फोटो काढणे सुरू झाले होते. साखरवाडीत आता बाराही महिने फोटो काढण्याची सोय उपलब्ध झाली होती. त्यावेळी एकदा आम्ही मित्रांनी एनसीसीच्या गणवेशात फोटो काढायचे असे ठरवले. मग एकेदिवशी तसे फोटो काढले. त्यापैकीच हा एक फोटो
( आता नेम कुणावर धरला आहे हे विचारू नका. कारण हा फक्त फोटोसाठी धरलेला नेम आहे.🙂)
काही दिवसांपूर्वी हे आणि अजून काही जुने फोटो सापडले आणि विलक्षण आनंद झाला. (सगळे फोटो देऊन लेखाची लांबी वाढवता आली असती. पण असो.🙂) बालपणीचे काही क्षण पुन्हा एकदा जगता आले. बालपणीच्या आठवणी या कायमच मनाला आनंद देऊन जातात.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment