केसांची कहाणी

    " ही पुढे आलेली बट फार कापायला नको." काही दिवसांपूर्वी केस कापायला गेलो असताना केशकर्तनकार गृहस्थ म्हणाले. " हो , ना! " मी म्हटलं. कारण पडलेलं टक्कल थोडं झाकायचं काम ही बट करते आहे हे त्यांना म्हणायचं होतं. थोडंसं हसू आलं.

     ( गेल्या वर्षीच्या एका कार्यक्रमातील छायाचित्र)

    एखादा माणूस पहिल्यांदा भेटला की सुरूवातीला नजरेत भरते त्याची उंची,आकारमान आणि असेल तर केशसंभार किंवा टक्कल! त्यामुळे पुरूषमंडळीदेखील स्वतःच्या केसांबाबत बऱ्यापैकी जागरूक असतात. वय वाढत जाते तसे केस हळूहळू पांढरे होत जातात. असे पांढरे होणारे केस काहीजणांना नको वाटतात. मग मेंदी लावणे, केसांना रंग लावणे असे प्रकार सुरू होतात. नियमितपणे रंग लावणारा एखादा माणूस एखाद्यावेळी रंग लावायला उशीर करतो. मग काही केस स्वतःचा नैसर्गिक रंग दाखवतात आणि बाकीच्यांना लक्षात येतं की त्या माणसाचे केस पांढरे झाले आहेत. काही जण फक्त डोक्यावरील केसांना‌ रंग लावतात आणि मिशांना‌ रंग लावत नाही किंवा लावायचे विसरतात. अशावेळी डोक्यावरील केस काळे आणि मिशा काळ्यापांढऱ्या असं थोडं गंमतीदार दिसतं. 

    १८ नोव्हेंबर २०२२ ला आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ' वज्रमूठ ' या महानाट्याची रंगीत तालीम होती. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची भूमिका करणारा विद्यार्थी तरूण होता. त्याने पगडी घातली होती आणि पांढरी दाढी लावली‌ होती. तेव्हा ते विसंगत वाटत होतं. तेव्हा चर्चा झाली आणि प्रत्यक्ष प्रयोगात फेटा बांधून त्याने डोक्यावरील सर्व केस झाकून टाकले होते. तेव्हा ते व्यवस्थित दिसले.

    मला वाटायचं की बऱ्याच पुरूषांना स्वतःचे केस पांढरे दिसू नये असे वाटते म्हणून ते रंग लावतात. पण मध्यंतरी परिचयाच्या एकाशी बोलणं झालं. तेव्हा लक्षात आले की त्याचे केस पांढरे दिसू नये हा त्याच्यापेक्षा त्याच्या पत्नीचा आग्रह जास्त आहे. जरा गंमत वाटली.

      कोविडच्या भयानक आपत्तीमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही बदल झाले. ते काही जणांच्या केस रंगवण्याच्या बाबतीतही झाले. माझ्या माहितीतील काहीजण कोविडपूर्वी नियमितपणे केसांना रंग लावत असत. पण आता त्यांनी ते सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या केसांचा नैसर्गिक रंग दिसतो.

     तरूण मुलांपैकी काहीजण केसांची वेगवेगळी रचना‌ करताना दिसतात. तसेच आता केसांना केवळ काळाच रंग लावला पाहिजे असे काही जणांना वाटते. त्यामुळे केसांना निळा,‌‌‌‌पिवळा,‌‌ हिरवा यापैकी अनेक रंग ते लावतात. त्यामुळे आपली वेगळी ओळख दिसते असे त्यांना बहुधा वाटते.

       माझ्या ओळखीच्या काहीजणांची काही वर्षांनी भेट झाल्यावर ते मला म्हणाले आहेत की केस कमी झाले. अशावेळी मी उत्तर देतो की, ही वडिलोपार्जित संपत्ती आहे.‌ ती वाढतच जाणार." मग ते हसतात.‌आमचे वडील कै.शिवलिंग कृष्णाजी गाडे यांनादेखील टक्कल होते. तोच वारसा आम्हा तिघा भावांना मिळाला आहे. पण तिघांना तीनप्रकारे टक्कल पडले आहे. माझे टक्कल बरेचसे वडिलांसारखे आहे.

   माणसाच्या टकलाची संस्कृतातही दखल घेतली गेली आहे. " खल्वाटो निर्धन: क्वचित्" असे म्हटले आहे. म्हणजे टक्कल असलेला माणूस क्वचित निर्धन असतो. पण प्रत्यक्षात काही टक्कल असलेली गरीब माणसेही भेटतात.

    माझ्या माहितीतील काहीजण टक्कल झाकण्यासाठी नेहमी टोपी घालतात तर काहीजण विग वापरतात. काही जणांनी हेअर ट्रान्सप्लांटदेखील करून घेतले आहे. टक्कल पडलेल्या तरूणाच्या आयुष्यावर ' बाला ' नावचा एक चित्रपट येऊन गेला आहे.‌आयुष्मान खुराणा या अभिनेत्याने त्यात टक्कल पडलेल्या तरूणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो टक्कल जावे म्हणून वेगवेगळे प्रयत्न कसे करतो हे गमतीदारपणे दाखवले आहे.

    बोलताबोलता कधी विषय निघतो. मी गंमतीत म्हणतो " माझे केस‌ कधी पांढरे होणार नाहीत." समोरच्याला आश्चर्य वाटते. मग मी म्हणतो, " पांढरे होईतोपर्यंत माझे केस राहणारच नाहीत." मग समोरचाही हसतो. पण अजूनपर्यंत माझ्या डोक्यावर बऱ्यापैकी केस टिकले आहेत. मला नेहमी आठवण होते ती माझे शाळेतील शिक्षक कै.ऐनापुरे सर यांची. ते म्हणायचे सकाळी आंघोळ केली की केस वाळले की मग तेल लावायचे. हे मी बऱ्यापैकी पाळले आहे. अजून एका व्यक्तिची आठवण होते ती म्हणजे पिंपळनेर, जि.धुळे येथील डॉ.शिंदे यांची. मी १९९९ ते २००१ या काळात धुळे जिल्ह्यात संघाचा प्रचारक होतो. सुरूवातीला एकदा पिंपळनेरला‌ गेल्यावर डॉ.शिंदे यांची भेट झाली. त्यांनी सल्ला दिला की अंगाला लावायचा साबण कधीही केसांना लावायचा नाही. त्यावेळी शॅंपू एवढ्या सहजपणे उपलब्ध होत नसे. शिकेकाई उकळून वापरण्याचा खटाटोप दरवेळी जमेल असे नसायचे. डॉ.शिंदे यांचा सल्लादेखील मी पाळला आहे.  या दोन्हीमुळे बहुधा अजून माझे केस बऱ्यापैकी शाबूत आहेत. अशी ही केसांची कहाणी!


सुधीर गाडे, पुणे 

Comments

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख