गुंतागुंतीचे आयुष्य

      काही दिवसांपूर्वी एका बैठकीत एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणाले, " बांधकामासाठी साहित्य पुरवणाऱ्यांचा एके ठिकाणी संप चालू आहे. त्यामुळे अपेक्षित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करता येणार नाही. म्हणून जादा दिवस गृहित धरले आहेत." हे ऐकल्यावर मनात विचार आला की आयुष्य किती गुंतागुंतीचे झाले आहे. कुठेतरी एखादी घटना घडते आणि त्याचे दूरवर परिणाम होतात.

   

       ( बांधकाम चालू असतानाचे प्रातिनिधिक छायाचित्र  )

       भारतात हजारो वर्षे जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आलेली आहे. पूर्वी ही गावे बऱ्यापैकी स्वयंपूर्ण होती. गरजेच्या बहुतेक सर्व गोष्टी गावातच तयार व्हायच्या. मर्यादित प्रमाणात बाहेरून गोष्टी आणाव्या लागायच्या. त्यामुळे बाह्य गोष्टी, घडामोडी यांचा थोडा परिणाम ग्रामजीवनावर व्हायचा. तसेच लोकांच्या एकूण गरजाही मर्यादित होत्या. त्यामुळे आयुष्य हे बऱ्यापैकी सरळसोट होते.

       पण औद्योगिक क्रांतीनंतर जगातील एकूणच परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. यंत्रांवर आधारित मोठे मोठे कारखाने सुरू झाले. घाऊक प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेल्या वस्तूंचे वितरण सगळीकडे होऊ लागले. वाहतुकीच्या साधनांमध्ये जसजशी प्रगती होत गेली तसतसे वितरण झपाट्याने होऊ लागले. त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यात उत्पादित झालेली वस्तू जगभर सहजपणे वितरित होऊ लागली.

      आता बहुतेक कुठल्याही छोट्या गावात गेलो तर तिथे जिल्हा, विभाग ,राज्य आणि देशातच नव्हे तर जगात उत्पादित झालेल्या अनेक वस्तू मिळू लागल्या आहेत. हे केवळ बांधकामाच्या क्षेत्रातच नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रांनाही लागू आहे. त्यामुळे पक्का माल बनविण्यासाठी आवश्यक कच्चा माल वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळवणे, त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे आणि तो नंतर जगाच्या कानाकोपऱ्यात वितरित करणे यासाठी एक गुंतागुंतीची, लांबलचक साखळी तयार झाली आहे. एखाद्या ठिकाणी कोणत्याही कारणाने अनपेक्षित अशी परिस्थिती निर्माण झाली की ही साखळी तुटते. याचा परिणाम उत्पादन किंवा वितरण किंवा दोन्हीवर होतो. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे जगात मोठ्या प्रमाणावर जनजीवनावर परिणाम होतो. अशी ही गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवली आहे. कशाचा काय परिणाम होईल हे नेमकेपणाने सांगता येणे अवघड झाले आहे.

   स्वावलंबी ग्रामजीवनाचा एक अजून पैलू आहे. काही वेळा साथीचे रोग पसरतात. पूर्वी त्याचा प्रसार आजच्या तुलनेत कमी प्रमाणात आणि मंदपणे होत असे. परंतु आता असे रोग किती झपाटयाने जगभर पसरतात याचा आपण कोविड महामारीत अनुभव घेतला आहे. त्याचे भयंकर परिणामदेखील भोगले आहेत. 

    परंतु जलदगतीने होणाऱ्या दळणवळणाचा चांगलाही परिणाम बघायला मिळतो. २०१६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला. लातूरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. तेव्हा आगगाडीतून लातूरला पाणी पुरवले गेले. कोविडची महामारी जशी झपाट्याने जगभर पसरली तशी ज्यावेळी प्रतिबंधक लस तयार झाली तेव्हा ती झपाट्याने सर्वत्र पोचवली‌ गेली.

     एकूणात आयुष्य हे गुंतागुंतीचे झाले आहे त्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेदेखील आहेत.


सुधीर गाडे,  पुणे 







Comments

  1. खरंय सर गुंतागुंत खूप झाली आहे. पण त्याचा सकारात्मक विचाररही आपण यात मांडला आहे. सर्वांनीच जर असा विचार केला तर गुंतागुंत किती असेल तरी जीवन सुखी होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख