सामाजिक कार्यकर्त्यांसाठीचा आदर्श दीपस्तंभ
भारत वर्षाच्या अवनीतीची कारणमीमांसा करून त्यावर उपाय योजना करणारे पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांचे सर्व जीवनच हा सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी वस्तूपाठच आहे. या आदर्श जीवनाचे त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे चिंतन.
सामाजिक कार्यकर्त्यांची ध्येयनिष्ठा ही अभंग असावी लागते. कोणत्याही कारणाने यामध्ये तडजोड होणे अथवा करणे योग्य नाही. पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या जीवनातून ही गोष्ट आपल्या लक्षात येते. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केल्यापासून त्यांनी आपल्या जीवनात इतर कोणत्याही गोष्टींना प्राधान्य दिले नाही. १९३९ डॉक्टर विश्रांती व उपचाराकरिता बिहार मधील राजगीर या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अनुमतीशिवाय आणि अनुपस्थितीत हिंदू महासभेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या रामसेनेचे प्रमुख म्हणून त्यांचे नाव डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी घोषित केले. डॉ.मुंजे हे वडीलधारे व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक वेळा डॉक्टर हेडगेवार यांची पाठराखण केली होती. परंतु अशा पितृतुल्य व्यक्तिमत्वाने परस्पर नाव घोषित करावे आणि संघ कार्य हे जीवित कार्य स्वीकारल्यानंतर अन्य कोणतेही कामाशी आपला असा संबंध यावा हे डॉ. हेडगेवार यांना अनुचित वाटले. त्यांनी आपली याबाबतची अनिच्छा पत्राने नागपूरला कळवली आणि ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून आणली. एका संतवचनात बदल करून म्हणावे वाटते, ' ध्येयाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटी'. अशी अभंग ध्येयनिष्ठा कार्यकर्त्यांमध्ये असणे आवश्यक आहे.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून चांगले काम हातून घडायचे असेल तर व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही चुकीच्या सवयी , गोष्टी बदलणे आवश्यक असते. परंतु 'स्वभावाला औषध नाही' अशी म्हण सांगून काहीजण म्हणतात की माझा स्वभावच असा आहे तो मी बदलू शकत नाही. पण बदल घडायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करणे आवश्यक असते. डॉक्टर हेडगेवार आणि त्यांचे एकूणच घराणे अतिशय तापट होते परंतु संघ कामासाठी डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक आपल्या स्वभावात बदल घडवून आणण्याचे दिसून येते. संघ स्थापनेनंतर त्यांच्या तापटपणाचा अनुभव आल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करून बदल घडवणारे डॉक्टर हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे.
कोणतेही सामाजिक कार्य पुढे जायचे असेल तर कार्यकर्त्यांमध्ये अनुशासन असणे आवश्यक आहे. डॉक्टर हेडगेवार यांचे वर्तन याबाबत मार्गदर्शक आहे. १९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी सत्याग्रह करून मिठाचा कायदा मोडला. तेव्हाच्या मध्य प्रांतात जंगल सत्याग्रह करून कायदेभंगाची चळवळ करण्यात आली. डॉक्टर हेडगेवार यांनी यवतमाळजवळ लोहारा येथील जंगलात सत्याग्रह केला आणि त्यांना कारावास देण्यात आला. त्यांच्यासोबत तेव्हाचे संघाचे अन्य कार्यकर्तेदेखील होते. त्यापैकीच हे एक श्री अप्पाजी जोशी ते वर्धा काँग्रेस समितीचे पदाधिकारी होते. काँग्रेसने आपल्या सदस्यांसाठी कारावासात कोणतीही सवलत मागू नये असा नियम केला होता. आप्पाजी यांची रवानगी क वर्गात झाली तेथील हाल अपेष्टांमुळे त्यांची प्रकृती खालावू लागली. तेव्हा अन्य सहकार्यांनी कारागृह अधीक्षकाकडे सवलत मागावी असे आप्पाजी यांना सुचवले. परंतु आप्पाजी ते मानेत ना. तेव्हा याबाबत अन्य कार्यकर्त्यांनी आप्पाजी यांनी डॉ.हेडगेवारांशी बोलावे असे सुचवले. कारण सर्वांना माहीत होते की डॉक्टरांचे उजवे हात मानले जाणारे आप्पाजी त्यांचा शब्द मोडू शकणार नाहीत. जेव्हा हे बोलणे झाले तेव्हा काँग्रेसने सांगितलेले नियम पाळणे योग्य आहे असेच हेडगेवार यांनी सांगितले ते म्हणाले 'अनुशासनात हयगय म्हणजे चळवळीत गोंधळाचे भय'. इतिहासात हे अनेक वेळा दिसून आले आहे की ज्या कार्यात अथवा चळवळीत अनुशासनाचे पालन झाले नाही ती चळवळ एक तर अपेक्षित मार्गाने गेली नाही किंवा तिचा अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. डॉ. हेडगेवार यांचे विचार यासंदर्भात मार्मिक वाटतात.
सामाजिक कार्य पुढे जायचे असेल तर एक एक माणूस जोडत पुढे जावे लागते. केवळ तात्विक बांधिलकी कोरडी वाटते परंतु आंतरिक स्नेहामुळे त्याच्यात स्निग्धता येते. ह आंतरिक स्नेह कृतीद्वारे प्रकट होणे हे देखील महत्त्वाचे असते. डॉक्टर हेडगेवार यांच्यासोबत ज्यांचा संबंध आला अशा व्यक्तींचे एकत्रीकरण डॉक्टर हेडगेवार गेल्यानंतर अनेक वर्षांनी एकदा नागपूर मध्ये करण्यात आले. आयुष्याच्या अखेरीकडे झुकलेल्या त्या स्वयंसेवकांना डॉक्टरांबद्दल विचारले तेव्हा सर्वांनी सांगितले की 'डॉक्टर म्हणजे प्रेम'. १९३० च्या कारावासात श्री. दादाराव परमार्थ हेदेखील डॉ. हेडगेवार यांच्याबरोबर होते. त्यांना क्षयाचा त्रास सुरू झाला. या कारावासात डॉक्टरांनी आपल्यापेक्षा वयाने , अनुभवांने आणि एका अर्थाने अधिकाराने खूप लहान असलेल्या दादाराव परमार्थ यांची आवश्यक ती सर्व शुश्रुषा रात्र रात्र जागून केली. दादारावांची प्रकृती तर सुधारलीच पण ते या स्नेह बंधनात कायमचे बद्ध झाले त्यांनी आजीवन संघाचे कार्य केले. ' प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी'. अपारंपार त्याग करून डॉक्टर हजारो व्यक्तींच्या प्रेमाचे धनी झाले. संघकार्य वृद्धिंगत होत गेले. हे उदाहरण सदैव आचरणात आणण्याचे आहे.
अशाप्रकारे डॉक्टरांच्या अन्य गुणांचे देखील वर्णन करता येईल. निरपेक्षपणे पाहिले तर यामध्ये एक आचारसूत्र आढळेल. त्यामुळे असे म्हणावेसे वाटते की 'सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर्श दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार'. अशा दीपस्तंभाकडून प्रेरणा घेत आपल्या अंगीदेखील यापैकी जास्तीत जास्त गुण बाणवण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असला पाहिजे त्यातून हे दृश्य सर्वार्थाने प्रत्यक्षात येईल 'तुझे तेज अंगे शतांशे जरी उजाळून टाकू दिशा दाही दाही'.
सुधीर गाडे पुणे
(पूर्व प्रसिद्धी विश्व संवाद केंद्र फेसबुक पेज २२/०३/२०२३)
Comments
Post a Comment