स्वभावानुसार वर्तन

   बऱ्याच दिवसांपूर्वी एकदा सकाळी फिरायला गेलो असताना एका टी-शर्ट वर लिहिलेले वाक्य वाचले आणि ते मनात बसले. त्यावर लिहिले होते, 'Stay you, Stay True'  म्हणजेच स्वतःसारखे रहा, खरे राहा.



      आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे ती म्हणजे, ' व्यक्ती तितक्या प्रकृती'. हे अगदी खरे आहे.कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. त्यामुळे स्वतःच्या स्वभावाला सुसंगत असे वर्तन केले तर माणूस आनंदी राहतो. काही कारणांमुळे अथवा परिस्थितीमुळे स्वतःच्या स्वभावाशी विसंगत वर्तन करावे लागले तर माणूस दुःखी होतो.

     मी छत्रपती संभाजीनगरला प्रचारक असताना एक घडलेला प्रसंग या संदर्भात आठवतो. तेथील एका कार्यकर्त्यांचा तरुण मुलगा 'विपश्यना शिबिराला' जाऊन आला. विपश्यना शिबिरामध्ये 'आर्य मौन' पाळायचे असते म्हणजे शब्द उच्चारून बोलणे तर बंदच परंतु शक्यतो खाणाखुणांच्याद्वारेदेखील बोलायचे अथवा सांगायचे नसते. हा तरुण शिबिराहून परत आल्यानंतर एके दिवशी घराच्या कुंपणाच्या भिंतीवर उभा राहून मोठ्या मोठ्याने बोलू लागला. मग कुटुंबीयांना त्याची समजून घालावी लागली. बहुधा या मुलाचा स्वभाव अतिशय बोलका होता. परंतु शिबिरातील नियमांमुळे त्याला मौन पाळावे लागले. ते त्याच्या स्वभावाशी सुसंगत नव्हते म्हणून कदाचित त्याची अशी प्रतिक्रिया झाली असेल.

       काही माणसांना गरजेपोटी किंवा परिस्थितीमुळे आपल्या स्वभावाविरुद्ध वागणे भाग पडते. अशा माणसांची निश्चितच कुचंबणा होत असते. होणारी ही कुचंबणा टाळण्यासाठी जी परिस्थिती आहे ती बदलण्याची खटपट करणे किंवा परिस्थिती बदलण्याची वाट पाहत राहणे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तिसरा पर्याय अवघड आहे. तो म्हणजे स्वभाव बदलणे. ही अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. कारण असं म्हणतात, ' स्वभावाला औषध नाही'. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत अशा माणसांची कुचंबणा होतच राहते. स्वभाव बदलण्याचा पर्याय हा खूप अवघड असला तरी काही मोजकी माणसे ते करून दाखवतात. मी प्रचारक असताना सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमात राहिलो होतो. त्यावेळी माझ्या खोलीत माझ्या सोबत असणारा दुसरा कार्यकर्ता अतिशय मोजके बोलायचा. एके दिवशी मी त्याला विचारले , "इतके मोजके का बोलतोस?" त्यावेळी तो म्हणाला, " त्याच्या बोलक्या स्वभावामुळे कामामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. तेव्हापासून बोलण्याची सवय कमी करत आणली आहे." पण निश्चयपूर्वक स्वभावात बदल करणाऱ्यांची उदाहरणे अतिशय कमी आहेत.

     काही माणसांच्या बाबतीत त्यांचा मूळचा स्वभाव जाणूनबुजून झाकून वेगळा स्वभाव आहे असे दाखवण्याची वृत्ती दिसून येते. अशी माणसे काहीतरी मिळवण्यासाठी असे करतात. त्यामुळे काही जण फसतात. पण एका ंंइंग्लिश वचनाप्रमाणे , ' You can fool some people all the time, all people some time, but not all the people all the time'. त्यामुळे अशा माणसांचे दुटप्पी केव्हा ना केव्हातरी उघडकीला येते आणि मग त्यांची फजिती, क्वचित नामुष्कीदेखील होते.

      माणसांचा एक वर्ग असा असतो की ज्यांच्या आंतरिक प्रेरणा अतिशय स्वकेंद्री असतात. स्वतःच्या इच्छांपुढे त्यांना न्याय, नीती अशा गोष्टींची अजिबात चाड नसते. महाभारतामध्ये दुर्योधनाचे म्हणणे प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, ' जानामि धर्मं नच मे प्रवृत्ति, जानामि अधर्मं नच मे निवृत्ति'. अशा माणसांच्या स्वाभाविक वागण्यामुळे अन्य माणसांना, समाजाला त्रास होतो, नुकसान होते. बऱ्याच वेळा अशा माणसांना त्यांच्या वागण्याची शिक्षा देखील मिळते. ही अगदी टोकाची माणसे वगळली तर बाकी सर्वजण आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार वर्तन करून सुखी होऊ शकतात. इतरही सुखी होऊ शकतात. 

    काही माणसांचा स्वभाव भल्याबुऱ्याच्या सीमारेषेवर असतो. इतरांच्या दृष्टीने कधी चांगले तर कधी वाईट असे त्यांचे वागणे होते. या गटातील माणसांनी जर विवेकाने विचार केला तर त्यांचे वागणे सर्वांच्या दृष्टीने हितकारक होऊ शकते. 

     भौतिकशास्त्रात 'रेझोनन्स' अशी एक संकल्पना आहे. यामध्ये कंपित होणाऱ्या गोष्टीची एक नैसर्गिक वारंवारिता असते.( नॅचरल फ्रिक्वेन्सी). अशा गोष्टींमध्ये बाह्य प्रयत्नांनी कंपने निर्माण करता येऊ शकतात. (फोर्स्ड फ्रिक्वेन्सी) ज्यावेळी या दोन्ही वारंवारिता वेगवेगळ्या असतात त्यावेळची कंपने ही छोट्या प्रमाणावरती होतात. परंतु दोन्ही वारंवारिता ज्यावेळी समान असतात त्यावेळी सर्वात मोठे मोठी कंपने निर्माण होतात. ( काही वेळा ही कंपने विध्वंसकदेखील ठरतात.) हीच संकल्पना मानवी स्वभावालादेखील लागू करता येण्यासारखी आहे. स्वभाव आणि वर्तन यामध्ये समानता असेल तर माणूस जास्त क्रियाशील राहू शकतो.

  ' अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' असे म्हटले जाते. हे अंतरीचे बाहेर धावणे, हितकारक होणे लाभदायक आहे.


सुधीर गाडे, पुणे 

Comments

  1. माणसांचे स्वभाव आणि त्याप्रमाणे त्यांची वागणूक याचे अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत सोदाहरण केलेले वर्णन. खूपच छान.धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. Wonderful correlation of physics and psychology 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सलग शिक्षणाचे महत्त्व किती?

समासाच्या निमित्ताने...

जगभर विस्तारलेल्या रा.स्व.संघाच्या कार्याची संक्षेपात ओळख